भाद्र : हिंदू कालगणनेतील सहावा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. याचे वैदिक नाव नभस्य हे आहे याच्या शुद्ध तृतीयेस स्त्रिया हरितालिका व्रत करतात या व्रतात पार्वतीची सखीसह पूजा करून फक्त फलाहार घ्यावयाचा असतो शिजवलेले अन्न खात नाहीत. शुद्ध चतुर्थीला वरद किंवा गणेश चतुर्थी म्हणतात व या दिवशी गणेशाची मातीची बनविलेली मूर्ती घरात आणून पूजा करावी, असे सांगितले आहे. या दिवसापासून अनंत (शुद्ध) चतुर्दशीपर्यंत विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करतात. शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात या दिवशी स्त्रिया ऋषींची पूजा करतात आणि बैलाच्या श्रमाने उत्पन्न झालेले अन्नपदार्थ वर्ज्य करून उपवास करतात. षष्ठीला सूर्यपूजन करण्याचा व कार्तिकस्वामीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. नवमीपासून पौर्णिमेपर्यंत भागवत सप्ताह करतात. द्वादशीला वामनाची पूजा करतात. पयोव्रत म्हणजे या द्वादशीपासून महिनाअखेरपर्यंत दूध वर्ज्य करतात. चतुर्दशीला अनंतव्रत असून त्या दिवशी विशिष्ट गोफाची पूजा करतात.

भाद्रपदाच्या दुसऱ्या पंधरवड्याला पितृपक्ष म्हणतात व पित्याच्या मृत्यू – तिथीच्या दिवशी सर्व पितरांसाठी महालयश्राद्ध करतात. या पंधरवड्यात चंद्र भरणी नक्षत्री असतो तेव्हा भरणीश्राद्ध करतात. वद्य षष्ठी ही चंद्रषष्ठी असून त्या दिवशी चंद्राची पूजा व उपवास करतात. वद्य नवमाला अविधवा नवमी म्हणतात व त्यादिवशी मृत सुवासिनींचे श्राद्ध करतात तर त्रयोदशीला पितृश्राद्ध असते आणि अमावस्येला अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात.

जैन धर्मीयांचे पर्युषण या महिन्यात येते. ते आत्मशुद्धी करण्याला हा पर्वकाळ अतिशय अनुकूल असल्याचे मानतात व या काळात उपवास करतात. दिगंबर भाद्रपद शुद्ध ५ ते १४ तर श्वेतांबर श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुद्ध ४ असा या पर्वाचा काळ मानतात. [⟶ पर्युषण पर्व].

भाद्रपदात अगस्त्य ताऱ्याचा उदय होऊन तो दक्षिण आकाशात पहाटे दिसू लागतो. या महिन्यात कन्यासंक्रांत असते म्हणजे सूर्य (सु. १६ सप्टेंबरास) कन्या राशीत प्रवेश करतो.

ठाकूर, अ. ना.