कर्क : (कॅन्सर). भारतीय राशिचक्रातील चवथी रास. पुनर्वसूचा चवथा चरण (चतुर्थांश) आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे कर्क राशीत येतात. खेकडा हे तिचे प्रतीक आहे. कर्क राशीत गुरू उच्चीचा मानतात. तिचा स्वामी चंद्र आहे. तिच्यात सहाव्या प्रतीपर्यंतचे [→प्रत] सदतीस तारे आहेत, मात्र एकही तारा चौथ्या प्रतीपेक्षा अधिक तेजस्वी नाही. सर्व राशींमध्ये या राशीतले तारे सर्वांत अंधुक असून तिच्या मध्यभागी असलेला अंधुक ताऱ्यांचा गुच्छ डोळ्यांनी दिसू शकतो. त्याला प्रीसेपी किंवा एम ४४ म्हणतात. १२ मार्चच्या सुमारास रात्री ९ वाजता ही राशी मध्यमंडलावर असते. १६ जुलैला निरयन (संपातचलन लक्षात न घेता) व २२ जूनला सायन (संपातचलन लक्षात घेऊन) राशीत सूर्यप्रवेश होतो. २२ जूनपासून दक्षिणायन सुरू होते.

पहा : राशिचक्र संपात.

ठाकूर, अ. ना.