प्रश्वा : (प्रॉसियान). लघुलुब्धक (कॅनिस मायनर) या तारकासमूहातील सर्वांत तेजस्वी (आल्फा) तारा. हा आकाशातील आठ क्रमांकाचा तेजस्वी तारा असून त्याची दीप्ती सूर्याच्या सातपट आहे. जानेवारी ते मे या काळात हा आकाशगंगेच्या कडेशी दिसतो [ विषुवांश ७ ता. ३७ मि. २२ से. क्रांती ५° १९’ १६ दृश्य प्रत ०·३४, निरपेक्ष प्रत २·७ व अंतर सु. ११ प्रकाशवर्षे ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति प्रत]. हा पिवळसर तारा असून त्याचा वर्णपटीय प्रकार F5, दीप्तिवर्ग IV-V (मध्यम म्हातारा) व पृष्ठीय तापमान ७,०००° के. आहे. [⟶ तारा]. तो दर मिनिटाला सु. २४० किमी. वेगाने सूर्याकडे येत आहे. १८४० साली एफ्. डब्ल्यू. बेसेल यांना प्रश्वा ताऱ्याला एक लहानसा सहचर असावा, असे वाटले होते कारण त्याला अतिरिक्त सूक्ष्म गती आढळत होती. पुढे १८९६ मध्ये जे. एम्. शेबरली यांनी लिक वेधशाळेतून त्याचा शोध लावला. प्रश्वा ताऱ्यापासून तो ४”·४ अंतरावर असून प्रश्व्याभोवतीचा त्याचा आवर्तनकाल सु. ४० वर्षे आहे त्याची दृश्य प्रत ११ व निरपेक्ष प्रत १३ असून तो लघुतम तारा आहे. त्याची निजगती १”·२५ आहे. सहचराच्या अस्तित्वावरून प्रश्व्याचे पुरातनत्व सूचित होते. हा F5 प्रकारच्या ताऱ्यांच्या प्रमुख श्रेणीतून उत्क्रांत होण्यास सुरुवात झाली असावी. प्रश्व्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १·७६ पट व सहचराचे वस्तुमान ०·६५ पट असावे.

  प्राचीन काळापासून प्रश्वा माहीत असून त्याचे उल्लेख प्राचीन साहित्यात सापडतात. बॅबिलोनियन व ईजिप्शियन लोक प्रश्वा व व्याध यांची पूजा करतात.

  आर्द्रा(बेटलज्यूझ), व्याध व प्रश्वा यांचा आकाशात दिसणारा मोठा समभुज त्रिकोण पूर्वीपासून नाविकांना मार्गदर्शक झालेला आहे. हा तारा मार्चच्या सुरुवातीस याम्योत्तर वृत्तावर (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक यांतून जाणाऱ्या खगोलावरील वर्तुळावर) येतो. व्याधाला ‘डॉग स्टार’ म्हणतात व प्रश्वा व्याधाच्या आधी उगवतो म्हणून ‘कुत्र्याकडे जाणारा’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे प्रॉसियान हे नाव पडले आहे.

ठाकूर. अ. ना.