मायर, योहान टोबीआस : (१७ फेब्रुवारी १७२३–२० फेब्रुवारी १७६२). जर्मन ज्योतिर्विद. त्यांनी समुद्रावरील प्रवासात एखाद्या ठिकाणाचे रेखांश अचूकपणे काढण्यासाठी उपयुक्त अशी चांद्रकोष्टके तयार केली. त्यांचा जन्म मार्बाख (जर्मनी) येथे व शिक्षण घरीच झाले. १७४६ साली न्यूरेंबर्ग येथील मानचित्रण संस्थेत दाखल होण्यापूर्वीच त्यांची भूमितीविषयक दोन पुस्तके प्रसिद्ध झाली होती. १७५१ साली त्यांना गटिंगेन विद्यापीठात अध्यासन मिळाले ते तेथे प्रायोगिक ज्योतिषशास्त्र व गणित हे विषय शिकवित. १७५४ साली ते या विद्यापीठाच्या वेधशाळेचे अधीक्षक झाले व अखेरपर्यंत ते तेथेच होते.

स्वत: बनविलेल्या दुर्बिणीतून त्यांनी ग्रहणे (उदा., २५ जुलै १७४८ रोजीचे सूर्यग्रहण) व काही तेजस्वी ताऱ्यांची पिधाने (चंद्रबिंबाने तारा झाकला जाण्याची क्रिया) निरीक्षिली व चंद्राच्या दोलनेचा [→ चंद्र ] काळजीपूर्वक अभ्यास केला. चंद्राच्या पृष्ठभागाचे वेध घेऊन त्यांनी तेथील ८९ ठिकाणांची अक्षांश-रेखांश काढले व चंद्राचा नकाशा तयार केला. १७५२ साली त्यांनी चंद्रावरील स्थानांविषयीची नवीन कोष्टके तयार केली. त्यांच्या पद्धतीने जलप्रवासात एखाद्या स्थळाचे रेखांश १ मिनिटापर्यंत अचूक काढता येतात. ही कोष्टके गटिंगेनच्या रॉयल सोसायटीने १७५५ साली प्रसिद्ध केली. या कोष्टकांच्या साहाय्याने काढलेले चंद्राचे स्थान व प्रत्यक्ष वेध घेऊन आलेले स्थान यांच्यामध्ये जास्तीत जास्त ७५ सेकंदापर्यंत तफावत येते. याशिवाय त्यांनी एक सूक्ष्ममापक तयार केले होते ८० ताऱ्यांच्या निजगती काढल्या व ९९८ ताऱ्यांची यादी तयार केली होती. तसेच त्यांनी चुंबकाविषयीची एक उपपत्ती मांडली होती व चंद्रावर वातावरण का असू शकणार नाही, याची कारणे दिली होती. ते गटिंगेन येथे मृत्यू पावले.

नेने, य. रा.