आठवडा : लागोपाठ सात दिवसांचा मिळून होणारा कालावधी. याला ‘आठवडा’ किंवा ‘सप्ताह’ म्हणण्याचा प्रघात आहे. यास सात वार असतात. आधुनिक काळात जगातील बहुतेक सर्व देशांत सात दिवसांचा आठवडा रूढ असून वारांच्या नावांचा क्रमही रविवार ते शनिवार असाच आहे.

दिवसाचे चोवीस भाग करून प्रत्येक भागास एक तास म्हणावयाचे अशी सोय करण्यात पृथ्वीची दैनंदिन गती लक्षात घेण्यात आली आहे. अशा प्रकारचे नैसर्गिक कारण, आठवड्याचे दिवस सातच का, याविषयी देता येत नाही. सूर्यचंद्रांशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसणारे पाच ग्रह म्हणजे मंगल, बुध, गुरू, शुक्र आणि शनी हे होत. यावरून वारांना या सात खस्थ ज्योतींची नावे पश्‍चिम आशियातील खाल्डियन लोकांनी प्रथम प्रसृत केली. खाल्डियन लोकांत फलज्योतिषाचा पुष्कळ फैलाव झाला होता. ह्या सात ग्रहांना फलज्योतिषात महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे खाल्डियनांनी सात दिवसांचा आठवडा स्वीकारला असावा व तोच हळूहळू सर्वत्र रूढ झाला.

ग्रीक व रोमन साम्राज्यांत खाल्डियन लोक फलभविष्य सांगत. त्याच्या अनुरोधाने तिकडे वार प्रचलित झाले. खाल्डियन संस्कृतीचे केंद्र बगदाद असल्यामुळे नंतर अरबी लोकांनीही हीच पद्धती स्वीकारली. सात दिवसांचा आठवडा हे कालावधीचे एकक म्हणून स्वीकारण्यात चिनी, हिंदू, ईजिप्शीय ज्यू व पर्शियन लोकांनी पुढाकार घेतला. त्या मानाने ग्रीक आणि रोमन लोकांनी पुष्कळ उशिरा हे एकक उचलले. ज्यू लोकांनी तर आठवड्यातील प्रत्येक सातवा दिवस म्हणजे देवाची प्रार्थना करण्याचा दिवस अशी समजूत दृढ केली.

प्राचीन काळी निरनिराळ्या देशांत आठवड्याचा कालावधी निरनिराळा असे पण हा कालावधी महिन्यापेक्षा लहान होता हे निश्‍चित. भारतात प्राचीन काळी निरनिराळे यज्ञ चालत. त्यांची सुरुवात उत्तरायणाबरोबर (सूर्य मकरवृत्तापासून उत्तरेकडे जाण्याच्या प्रारंभाबरोबर) होई. सुरुवातीच्या दिवसास

‘आरंभणीय’ म्हणत. तेथून मग सहा सहा दिवसांच्या टप्याटप्यांनी हा यज्ञ चाले. हा जो सहा दिवसांचा संच त्याला ‘षडह’ म्हणत. परंतु चंद्राच्या गतीवरून आर्यावर्तात पूर्वी महिना दोन पक्षांत विभागत असत. प्राचीन ईजिप्तमध्ये दहा दिवसांचा आठवडा होता. फ्रेंच क्रांतीनंतर फ्रेंच लोकांनी आपले काही वैशिष्ट्य दाखवावे म्हणून मुद्दाम नवीन पंचांग बनविले. त्यात आठवड्याचा कालावधी दहा दिवसांचा होता. पण ही प्रथा टिकली नाही. आफ्रिकेच्या इतर भागांत ठिकठिकाणी तीन, चार, पाच, सहा आणि आठ (चाराचे दोन गट) दिवसांचे आठवडे असत. किती दिवसांचा एकेक सलग गट आठवडा म्हणून मानांवा, ही गोष्ट दोन निरनिराळ्या कारणांनी ठरविली जाई. त्यातील पहिले कारण म्हणजे बाजार आणि दुसरे म्हणजे धार्मिक उत्सव. बाजाराच्या दिवशी इतर कोणतीही कामे करावयाची नाहीत, असा आफ्रिकेतील रानटी टोळ्यांमध्ये दंडक असे.

सात-सात दिवसांचा एकेक संच ही एक गणितीय दृष्ट्या सुटसुटीत व्यवस्था आहे. त्यामुळे वर्षाचे ३६५ दिवस म्हणजे ५२ आठवडे आणि एक दिवस असे सोपे गणित होते. आठवड्यातील ‘आठ’ या शब्दाचा अर्थ न घेता ‘आठव’ ह्या शब्दास प्रधान स्थान आहे, त्यावरूनच ‘आठवडा’ हा शब्द झाला असावा.

गुर्जर, ल. वा.