होमहवन : जगातील बहुतेक सर्व प्रमुख धर्मांमध्ये इष्ट देवतेला संतुष्ट करण्यासाठी बळी देण्याची किंवा अन्य काही द्रव्य वाहण्याचीप्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळी भारताततसेच शेजारील इराणमध्ये यज्ञ हा प्रमुख धार्मिक विधी होता व होमहवन हे त्याचे प्रधान अंग होते. अग्नी हा देव आणि मानव यांमधला दुवाअसून तो मानवाची प्रार्थना आणि त्याने अग्नीत हवन केलेले द्रव्यइष्ट देवतेकडे नेऊन पोचवणारा दुवा आहे, अशी श्रद्धा यज्ञविधीच्यामुळाशी होती. वैदिक आर्य विशिष्ट कामना पुरी करण्यासाठी इष्ट देवतेला उद्देशून पशू किंवा पुरोडाश, दूध, तूप, तांदूळ यांसारखे द्रव्य पवित्र अग्नीस अर्पण करीत त्यालाच होमहवन ही संज्ञा दिली गेली. यजुर्वेदादी ग्रंथांत यज्ञविधीचे सांगोपांग विवेचन केलेले आढळते. एक दिवसापासून हजारो वर्षांपर्यंत चालणाऱ्या वेगवेगळ्या यज्ञांत स्वर्गप्राप्तीसाठी मनोकामना, इष्ट देवता आणि हविर्द्रव्य या तीन गोष्टींनुसार होमहवनाचे स्वरूप बदलत असे. श्रुत्युक्त वैदिक धर्मात असलेले यज्ञाचे स्तोम पुढे स्मृती व पुराणांमध्ये वर्णिलेल्या हिंदू धार्मिक विधींमध्ये कमी झाले असले, तरी होमहवनांचे महत्त्व मात्र कायम राहिले. हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानलेल्या सोळा संस्कारांमध्ये विशेषतः जातकर्म, उपनयन, विवाह, अन्त्येष्टी यांसारख्या माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर करावयाच्या संस्कारांमध्ये होमहवन केंद्रस्थानी असते. होमहवनाचा अधिकार त्रैवर्णिकांना होता. गेल्या काही शतकांत बदलत गेलेल्या हिंदू धार्मिक विधींमध्ये देवी, गणेश यांसारख्या देवतांना उद्देशून याग केले जातात व त्या त्या देवतांना प्रिय असलेल्या द्रव्यांचे हवन केले जाते. व्यक्तीप्रमाणेच समाजाचे कल्याणहाही हेतू धरून याग आणि होमहवन केले जाते. विश्वशांतीसाठी करायचा शांतियाग किंवा पाऊस पडावा म्हणून करायचा पर्जन्ययाग ही अशाकाही यागांची उदाहरणे होत. यावरून होमहवन हा जसा हिंदू धर्मीयांनी करावयाचा वैयक्तिक धार्मिक विधी आहे, तसाच तो समान उद्दिष्टानेएकत्र आलेल्या सामाजिक घटकांनी करावयाचा सामाजिक विधीही आहे हे लक्षात येईल. 

 

पहा : यज्ञसंस्था. 

 

संदर्भ : १. काशीकर, चिं. ग. श्रौत धर्माची स्वरूपचिकित्सा, पुणे, १९७७.

           २. थिटे, गणेश, संपा. यज्ञ : आशय आणि आविष्कार, पुणे, १९७९

भाटे, सरोजा