जैन देवता : जैन धर्मीय सृष्टिकर्ता ईश्वर मानीत नसले, तरी कर्मनाश करून मुक्तीला पोहोचलेल्या तीर्थंकरादी सिद्ध जीवांची ते देव समजून पूजाअर्चा करतात. विकारांवर विजय मिळवून निष्कलंक झालेल्या सिद्धांची पूजा ही व्यक्तिपूजा नसून गुणांची आध्यात्मिक पूजा आहे. ही पूजा करण्यामध्ये सिद्धांना संतुष्ट करण्याचा आणि त्यांच्याकडून प्रसाद मिळविण्याचा हेतू नाही. पूज्य वस्तू केवळ आदर्श म्हणूनच पूजिली जाते.

काळम्म (विद्यादेवी) : हुणसीहडगली, कर्नाटक, ११ वे शतक.

तीर्थंकरांची जशी केली जाते, तशी पंचपरमेष्ठी, तीर्थंकरांचे शिष्य (गणधर) आणि अन्य पूज्य व्यक्तींचीही पूजा करण्याचा प्रघात जैनांमध्ये (अर्थात मूर्तिपूजक संप्रदायांमध्ये) पडलेला आहे. एवढेच नव्हे, तर तीर्थंकर हयात असताना जे संरक्षक यक्ष आणि शासनदेवता (यक्षिणी) त्यांची सेवा करीत, त्यांचीही एका अर्थाने पूजा केली जाते [→ तीर्थंकर].

शासनदेवतांपैकी चक्रेश्वरी, अंबिका, कुष्मांडिनी, ज्वालामालिनी व पद्मावती या देवता प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. या देवतांशिवाय काही विद्यादेवताही पूजिल्या जातात. त्यांमध्ये सरस्वती सर्वश्रेष्ठ आहे. इतर देवतांमध्ये श्री, ऱ्ही, बुद्धी, धृती, कीर्ती आणि लक्ष्मी या प्रमुख देवता आहेत. कुलदेवता आणि ज्ञातिदेवता काही काही ठिकाणी पूजिल्या जातात.

हिंदू धर्मातील काही देवता जैन धर्मातही आलेल्या असून त्या भक्तिभावाने काही जैन धर्मियांकडून पूजिल्या जातात. पूजेमध्ये जैनांनी हिंदू धर्मीयांचे पुष्कळ अनुकरण केलेले दिसते. ऐहिक इच्छा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी इष्ट देवतांच्या पूजा रूढ झालेल्या आहेत.

पाटील, भ. दे.