सारिपुत्त–२ : (सु. बारावे–तेरावे शतक).बौद्घ धर्मावरील एक सिंहली भाष्यकार व लेखक. त्याच्या पूर्वायुष्याविषयी तसेच काळा-विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि तो श्रीलंकेचा राजा पहिला पराक्रमबाहू (परक्कमबाहू) या राजाच्या कारकीर्दीत (कार.११५३–८६) त्याच्या आश्रयार्थ होता. पहिला पराक्रमबाहू व दुसरा पराक्रमबाहू कार.१२३६–७०) यांच्या काळात थेरवादी संप्रदायास उर्जितावस्था प्राप्त झाली होती आणि त्याचे अनुयायी विशेषतः भिक्षू आणि आचार्य, बौद्घ धर्माच्या प्रसार-प्रचार कार्यात आघाडीवर होते. या आचार्यांमध्ये अनेक विद्वान मंडळी होती. त्या विद्वानांमध्ये सुविख्यात व कीर्तिसंपन्न सारिपुत्त (सारिपुत्र) नामक मठाधिपती वा आचार्य असून तो उदुंबरगिरीच्या कस्सप (कश्यप) या विद्वान गुरूंचा शिष्य होता. सारिपुत्ताने तत्कालीन समाजाच्या प्रबोधन कार्यात पराक्रमबाहूच्या आज्ञेने महत्त्वाची भूमिका बजावली व विधायक धर्मकार्य केले. शिवाय तो व्युत्पन्न पंडित असल्यामुळे त्याने आपल्या पोलोन्नरुवातील जेतवन या निवासस्थानी असलेल्या विहाराचे रूपांतर एका अध्यासनपीठात केले होते आणि तेथे बौद्घ तत्त्वज्ञानविषयक विविध विषयांचे अध्ययन-अध्यापन होत असे. तो व्याकरणकार व कवी असून संस्कृत आणि पाली या दोन्ही भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. या दोन्ही भाषांत त्याने ग्रंथलेखन केले असून त्रिपिटकांपैकी एक सुत्तपिटकथेरगाथा या थेरवादी सिद्घांतविषयक ग्रंथांवरील त्याचे विद्वत्तापूर्ण भाष्य (टीका) प्रसिद्घ आहे. या शिवाय त्याची सारत्यदीपानीनामक समंतपासादिका वरील टीका प्रसिद्घ असून पपंचसुदनीवरील भाष्य लीनत्थपकासनी या ग्रंथात आले आहे. मात्र विनयसंगह हा त्याचा स्वतंत्र ग्रंथ आहे. अन्य उपलब्ध ग्रंथांत त्याचा धम्मविलासधम्मसत्य या नावाचा थेरवादाची नियमावली विषद करणारा आणखी एक ग्रंथ आहे. त्याच्या शिष्यांत अनेक विद्वान भिक्षू व लेखक होते. त्यांपैकी धम्मकित्ती (धर्मकीर्ती), संघरक्खिता, सुमंगल, बुद्घनाग, मेधंकर, वाचिस्सर इ. प्रसिद्घ आहेत. त्यांनी थेरवादावर (हीनयान पंथ) लिहिलेल्या टीका व बुद्घचरित्रात्मक ग्रंथ श्रीलंकेत प्रसिद्घ आहेत. या शिष्यांपैकी मेधंकर आणि वाचिस्सर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असून मेधंकराने बुद्घाच्या संघर्षमय जीवनाचा घेतलेला ऐतिहासिक काव्यमय आढावा जिनचरित या ग्रंथात घेतला आहे, तर वाचिस्सरचा थूपवंस (संस्कृत स्तूपवंश) हा बौद्घग्रंथ पाली भाषेत असून या ग्रंथात बुद्घ अवशेषांवर उभारलेल्या स्तूपांचा इतिहास ग्रंथित केला आहे. गौतम बुद्घाच्या महापरिनिर्वाणानंतर तेराव्या शतकापर्यंत बांधलेल्या सर्व प्रमुख स्तूपांचा क्रमबद्घ इतिहास या ग्रंथात आला आहे. तसेच स्तूपांच्या वर्णनापूर्वी गौतम बुद्घाचे चरित्र दिले आहे. श्रीलंकेच्या धार्मिक इतिहासात या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संदर्भ : उपाध्याय, भरत सिंह, पालि साहित्यका इतिहास, वाराणसी, १९५१.

पोळ, मनीषा