एअरन : ज्यूंचा (यहुद्यांचा) आद्य धर्मगुरू. ðमोझेझचा थोरला भाऊ. त्याचे शिक्षण मोझेझसमवेत फेअरोच्या राजवाड्यात झाले. स्पष्टवक्ता असल्यामुळे मोझेझच्या आणि ज्यूंच्या मागण्या फेअरो राजाच्या कानी घालण्याचे काम त्यालाच करावे लागे. ईजिप्तमधून ज्यूंची सुटका करण्यात मोझेझबरोबर त्याने पुढाकार घेतला. ईजिप्तमधून ज्यूंची सुटका झाल्यानंतर हा प्रमुख धर्मगुरू म्हणून निवडला गेला. एलिशेबा हिच्याशी त्याचा विवाह झाला. त्याचे पुत्र नेदॅब, अबिहू, एलिएझर व इथमार हे होत. वयाच्या एकशेतेविसाव्या वर्षी जॉर्डनमधील हॉर पर्वतावर (सध्याचा हारून जेबेल) तो मृत्यू पावला, असा उल्लेख जुन्या करारात आढळतो.

फरांडे, वि. दा.