शाहेनशाही व कदमी : भारतात स्थायिक झालेल्या पारशी धर्मीय लोकांपैकी जे लोक मूळ इराणमध्ये परंपरेने चालत आलेले जुने पंचांग (कालगणना) पाळतात, त्यांना कदमी किंवा दरियाई रोज म्हणतात व जे पारशी लोक भारतात स्थलांतरित झाल्यानंतर रूढ झालेली नवी कालगणना अनुसरतात, त्यांना शाहेनशाही किंवा यझदेझरदी म्हणतात. पारशी कालगणनेत प्रत्येकी ३० दिवसांचे बारा महिने मिळून एक वर्ष होते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी ‘गाथा दिन’ म्हणून पाच दिवसांची भर घातली जाते. इराणच्या इतिहासातील ससान राजवंशाच्या कालखंडात दर १२० वर्षांनंतर एका अधिक महिन्याची भर घातली जात असे. भारतात स्थलांतरित झालेल्या पारशी लोकांत या प्रकारची मूळ कालगणना अनेक कारणांनी पाळली जाऊ शकली नाही. इ. स. १७२१ मध्ये इराणहून भारतात आलेल्या एका पारशी धर्मोपदेशकाला इराणी आणि भारतीय पारशांच्या सणसोहळ्यांत एक महिन्याचा फरक असल्याचे लक्षात आले. इराणी-पारशी कालगणनेनुसार भारतातील पारशी पंचांग एक महिन्याने मागे आहे. यानंतरच्या काळात जुनी इराणी आणि नवी भारतीय पारशी कालगणना पाळणाऱ्या अनुक्रमे कदमी आणि शाहेनशाही या शाखा निर्माण झाल्या. कदम-पारशी साधारणपणे जुलैच्या अखेरीस नववर्षदिन साजरा करतात तर शाहेनशाही-पारशी तो ऑगस्टच्या अखेरीस पाळतात. पारशी समाजात फसली सन हीदेखील एक कालगणना आढळते. या कालगणनेनुसार पारशी नववर्षदिन दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. शाहेनशाही आणि कदमी यांच्यात इतर धार्मिक बाबतींत कसल्याही प्रकारचा भेद नाही.

तारापोर, जे. सी. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)