मन्मथस्वामीमन्मथस्वामी : (१५६०- १६१३). मराठवाड्यातील एक वीरशैव संत व कवी. जन्म आजोळी बीड जिल्ह्यातील भूम तालुक्यातील नेकनूर ह्या गावी. मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मातापिता पार्वतीबाई व शिवलिंगस्वामी. दीक्षा व अध्ययन गुरू बीड जिल्ह्यातील मानूर मठाचे स्वामी बसवलिंगस्वामी. रा. चि. ढेरे यांनी मन्मथस्वामींचे गुरू म्हणून मानूर मठाचे नागेशस्वामी यांच्या नावाचा निर्देश केला आहे.

मन्मथस्वामींच्या शिष्यपरिवारात शिवदास, लिंगेश्वर, बसवलिंग, रामानंद, सदाशिव, महादेव, लक्ष्मण, नागलिंग, दीनोद्धारबुवा, रामलिंग इत्यादींचा समावेश होतो. या शिष्यांपैकी परभणी जिल्ह्यातील आष्टी येथील लक्ष्मण ह्या शिष्याच्या घराण्यात मन्मथस्वामींची कुबडी जतन करून ठेवल्याचे सांगतात.

मन्मथस्वामींनी मराठीत विपुल काव्यरचना व ग्रंथरचना केली आहे, तथापि ती सर्वच प्रकाशित नाही. त्यांनी रचलेले शिवपर अंभग आजही मराठवाड्यातील वीरशैव लोक आवडीने वाचतात. व गातात. गावोगाव ‘मन्मथ भजनी मंडळे’ ही आहेत. शिवाय त्यांनी षट्स्थलसिद्धांतावर रचलेल्या परमरहस्य ह्या आध्यात्मिक ग्रंथाचे पारायणही केले जाते.

गुरूनागी, गुरूप्रसाद, शिवगीता, शिवस्तोत्र, अनुभषानंद, स्वयंप्रकाश, आनंदलहरी, अभंगगाथा इ. मराठी ग्रंथरचना त्यांच्या नावावर सांगितली जाते. यांतील परमरहस्य (१७ अध्याय, १,३८६ ओव्या) व अभंगगाथा हे दोन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा गावाजवळील डोंगरात शिवकडा नावाच्या लहान धबधब्याजवळ घनदाट अरण्यात मन्मथस्वामींचे वास्तव्य होते. हे ठिकाण कपिलधार क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. तेथेच त्यांनी तपश्चर्या, योगसाधना व आपली सर्व ग्रंथरचना केली. त्यांच्या शिष्यपरिवारात ८ शिष्य प्रमुख होते. वयाच्या ५३ व्या वर्षी (भाद्रपद शुद्ध ३) त्यांनी तेथेच जिवंत समाधी घेतली. सध्या तेथे त्यांचे मोठे समाधिमंदिर असून आत समाधीवर शिवलिंग आहे. तेथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेत ५ दिवस मोठी यात्रा भरते. श्रावणातही भाविक लोक तेथे वारीसाठी येतात. मराठवाड्यातील वीर शैवांचे हे कपिलधार क्षेत्र एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे.

संदर्भ: कोटावळे, कुमार, मन्मथस्वामी चरित्र, वाड्मय व कार्यग्रंथ, क्षेत्र कपिलधार, १९७३.

संकनवाडे – पाटील,शि. वा.