काजी : इस्लाम धर्मातील न्यायदानाचे काम करणारा न्यायाधीश, शरीयत म्हणजे इस्लामी धर्मशास्त्रानुसार न्याय दिला जावा, या धर्माज्ञेनुसार राजा वा खलीफा काजीची नेमणूक करीत असे. वयात आलेला, स्वतंत्र, शहाणा, निष्कलंक चारिष्याचा, दृष्टी व कान चांगले असलेला तसेच कुराण, हदीस, विविध न्यायशास्त्रे, अरबी व्याकरण व कुराणावरील भाष्ये यांचे उत्तम ज्ञान असलेला मुसलमान शाफी कायद्यानुसार काजी होण्यास मात्र समजला जाते. अन्य व्यवसाय न करता त्याला मशिदीखेरीज कोणत्याही सार्वजनिक सोयीच्या ठिकाणी उघड्यावर न्यायदानाचे कार्य करावे लागे. रुग्णांची तसेच तीर्थयात्रा करुन परतलेल्या प्रवाशांची भेट घेणे दफनप्रसंगी पौरोहित्य करणे विवाह, घटस्फोट यांची नोंद करुन पौरोहित्य करणे न्यायनिर्णय करुन त्याची कार्यवाही करणे अज्ञानांच्या वा वेड्या बालकांच्या दायधनाची व्यवस्था पाहणे प्रार्थनामंदिरे व पाठशाळा (मदरसा) यांच्या निधींची व्यवस्था पाहणे रस्ते व सार्वजनिक वास्तू यांची देखभाल मृत्युपत्रांची अंमलबजावणी त्याचप्रमाणे धर्मांतर धर्मिक कर्तव्यांची हेळसांड कराला नकार चोरी, व्यभिचार, अत्याचार, हत्या इ. अपराधांसाठी शरीर कष्ट, मृत्युदंड वा धनदंडाची शिक्षा देणे इ. त्याची विहित कर्तव्ये होती. ⇨ इमामाचे कामही त्याच्या अनुपस्थितीत काजीकडेच येई. यूरोपीय शासनपद्धती स्वीकारलेल्या देशांत मात्र हल्ली काजीकडे केवळ धार्मिक अधिकार व कर्तव्येच राहिलेली आहेत.

करंदीकर, म.अ.