व्रते : एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या देवतेची आराधना करणे, त्यासाठी अन्नग्रहणावर आणि वर्तनावर काही बंधने घालूण घेणे, एखाद्या विशिष्ट महिन्यात, विशिष्ट तिथीला करावयाच्या धर्मकृत्याची वा पाळावयाच्या निर्बंधाची प्रतिज्ञा असा सर्वसाधारणपणे ‘व्रत’ ह्या कल्पनेचा अर्थ सांगता येईल. ‘व्रत’ हा शब्द ‘वरणे’ ह्या अर्थाच्या ‘वृ’ ह्या धातूवरून झालेला असून आज्ञापालन, नियमित अनुक्रम, धार्मिक कर्तव्य, उपासना, विधी, प्रतिज्ञा, निश्चित हेतू. इच्छा असे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. ‘वृ’ म्हणजे ‘संरक्षण करणे’ या अर्थाने व्रत म्हणजे एखादी संरक्षित, विशिष्ट कार्यासाठी बाजूस काढून ठेवलेली गोष्ट वा एखादी मुद्दाम मर्यादित केलेली गोष्ट ठरते. चालू राहणे, फिरणे अशा अर्थाच्या ‘वृत’ ह्या धातूपासून व्रत म्हणजे कार्यपद्धती, कार्यक्रम किंवा वर्तुळाकार गती असे अर्थ होतात. महामहोपाध्याय पां. वा. काणे ह्यांच्या मते व्रत हा शब्द वरणे, निवडणे, पसंत करणे ह्या धातूपासूनच आलेला असून त्याचा अर्थ इच्छा, संकल्पित कृत्य वा संकल्प असा होतो. वेगवेगळ्या धार्मिक उपासनांत उपासकाला आपल्या वर्तनावर, आहारविहारांवर काही निर्बंध घालून घ्यावे लागतात आणि ती उपासना म्हणजेच एक ‘व्रत’ होते. ‘व्रत’ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा आलेला असून त्याचा अर्थ यथासंदर्भ ‘आज्ञा’ वा ‘निर्बंध’ तसेच ‘धार्मिक आचार’ अथवा ‘पवित्र उपासनापद्धती’ असा होतो. व्रत शब्दाशी मिळतेजुळते असे ‘ऋत’ आणि ‘धर्मन्’ हे शब्दही ऋग्वेदात येतात. इतर वेदांमधून काही स्थळी ‘व्रत’ म्हणजे ‘देवाचे नियम’ वा ‘निर्बंध’ असाही अर्थ केल्याचे दिसते.

ब्राह्मणग्रंथांत आणि उपनिषदांत ‘व्रत’ ह्या शब्दाचे ‘धार्मिक-विधी’, ‘धार्मिक प्रतिज्ञा’, ‘अन्नविषयक निर्बंध’, ‘व्रतस्थ व्यक्तीचे अन्नपदार्थ’ असे अर्थ सामान्यत: दिलेले दिसतात. ह्याशिवाय ब्राह्मणग्रंथांच्या काळात ह्या शब्दाला ‘व्यक्तीचा विशिष्ट वर्तनक्रम’ आणि ‘उपवास’ असेही अर्थ प्राप्त झाल्याचे आढळून येते. मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती यांतून ‘व्रते’ म्हणजे निरनिराळ्या प्रमादांसाठी घ्यावयाची प्रायश्चिते असाही अर्थ केलेला आहे. महाभारतात हा शब्द हाती घेतलेले धर्मकृत्य, अन्नभक्षणासंबंधीची वा सर्वसाधारण आचारणासंबंधीची प्रतिज्ञा, अशा अर्थाने आलेला दिसतो.

व्रतांचे स्वरूप तीन प्रकारचे असल्याचे दिसते : (१) प्रायश्चित्त घेण्यासाठी करावयाची व्रते. (२) एखाद्या विशिष्ट भूमिकेत वा अवस्थेत करावयाची आवश्यक अशी कृत्ये वा कर्तव्ये. उदा., ब्रह्मचार्या)ने वा गृहस्थाश्रमी व्यक्तीने जी करावयाची असतात, ती. (३) एखादा विशिष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी स्वेच्छेने स्वीकारलेली कृत्ये.

व्रते सर्व धर्मांत आहेत. विविध धर्मनिबंधकारांनी व्रत ह्या विषयासंबंधी आपापली मते व्यक्त केली आहेत. श्रीदत्ताने आपल्या ‘समयप्रदीप’ ह्या ग्रंथात म्हटले आहे की, प्रत्येक संकल्प म्हणजे व्रत नव्हे. संकल्प हा जर व्रत ठरावयाचा असेल, तर शास्त्रांनी न सांगितलेली कोणतीही अट त्यात असता कामा नये. रघुनंदनाच्या मते ज्या विधींबद्दल संकल्प केलेला असतो, असे विधी म्हणजे व्रत आणि उपवास हे त्याचे लक्षण होय. ‘पूजा इत्यादी ज्यात असतात असा एक ‘धार्मिक विधी’ म्हणजे व्रत होय, अशी व्याख्या धर्मसिंधूने दिली आहे.

एखादे व्रत करण्यापूर्वी काय काय केले पाहिजे, ह्यासंबंधीचे मार्गदर्शनही काही ग्रंथांतून करण्यात आलेले आहे. सर्व व्रतांच्या शेवटी जप, तप, दाने करावयाची असतात. व्रतस्थ व्यक्तीने दया, क्षमा, सत्य, दान इ. सद्गुणांची जाणीव ठेवून वर्तन केले पाहिजे.

भारतात इसवी सनापूर्वी अनेक शतके काही जुनी व्रते प्रचारातून गेली होती. वेदोक्त यज्ञांशी संबंधित अशी व्रतेही क्वचितच केली जात. पुराणांतून निर्देशिलेल्या व्रतांना स्मृतिकारांनी तसेच धर्मसूत्रांनी व गृह्यसूत्रांनी महत्त्व दिलेले दिसत नाही. जैन व बौद्ध धर्मांच्या उदयानंतर त्या धर्मांत जाण्यापासून लोकांना रोखण्यासाठी वैदिक धर्माच्या धुरिणांनी व्रतांचे महत्त्व वाढविले असणे शक्य आहे. व्रते ही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातील असल्याने त्यांचा प्रसार होऊ शकला. व्रत अमुक लोकांनी करावे असे बंधन नव्हते. विवाहित स्त्रिया, कुमारिका आणि विधवा ह्यांच्याप्रमाणेच वेश्याही व्रते करू शकत. हळूहळू व्रतांची संख्या वाढत गेलेली दिसते. अकराव्या शतकातील राजमार्तंड ह्या ग्रंथात सु. २४ व्रतांचा उल्लेख दिसतो, तर बाराव्या शतकातील कृत्यकल्पतरूमध्ये सु. १७५ व्रते सांगितलेली दिसतात. ⇨हेमाद्रीच्या ⇨चतुर्वर्गचिंतामणीत सु. ७०० व्रतांची माहिती आहे.

व्रते ही कोणत्याही वर्णाच्या व्यक्तीला करता येतात. स्त्रियांनाही व्रते करण्याचा अधिकार आहे, किंबहुना बरीचशी व्रते स्त्रियांसाठीच सांगण्यात आली आहेत. आजारी पडल्यामुळे अथवा अपघातासारखे काही कारण घडल्यास अनेकदा घेतलेले व्रत स्वत: करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत प्रतिनिधीकरवी ते करता येते.

बहुतेक व्रते काम्य असतात. व्रतांचे बाह्य स्वरूप धार्मिक असले, तरी खरे पाहता त्यांमागील अनेक संकल्प वा कामना ऐहिक स्वरूपाच्या असल्याचे दिसून येते.

व्रते ही मानसिक, वाचिक आणि कायिक अशा तीन प्रकारांची असतात. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य ही मानसिक व्रते आहेत, तर उपवासासारखी व्रते कायिक होते. नामजप, कीर्तन, वेदांचा अभ्यास ही वाचिक व्रतांची काही उदाहरणे होत. 

प्रत्येक व्रताला त्याच्या कालाचा संदर्भ असतो. त्याचप्रमाणे ती विशिष्ट देवतेच्या उपासनेसाठी केली जातात. कालानुसार मासव्रते, तिथिव्रते, नक्षत्रव्रते, वारव्रते इ. व्रते आहेत, तर देवतेनुसार गणेशव्रते, सूर्यव्रते, विष्णुव्रते अशी व्रते आहेत. ⇨वटसावित्री  सारखी काही व्रते फक्त स्त्रियांसाठी असतात.

व्रते आणि उत्सव ह्यांच्यातील सीमारेषा तशी धूसर असते. धार्मिक उत्सवांमध्ये काही विधी येतात, तर व्रतांमधला काही भाग उत्सवी स्वरूपाचा असतो. उद्यापन करणे म्हणजे एखाद्या व्रताची समाप्ती करणे. ह्याला ‘पारण’ अथवा ‘पारणा’ असेही म्हणतात.

पहा : अणुव्रते उपवास ऋषिपंचमी तुलसीपूजन दशहरा मंगळागौर हरतालिका.

संदर्भ : काणे, म. म. पां. वा. अनु. भट, यशवंत आबाजी, धर्मशास्त्राचा इतिहास (उत्तरार्ध), मुंबई, १९८०.

कुलकर्णी, अ. र.