अग्निदेवता: दक्षिण भारतातील एक काष्ठतक्षण.अग्निपूजा : जगातील निरनिराळ्या खंडामध्ये ज्या प्रथमिक संस्कृती गेल्या दीडशे वर्षांत आढळल्या, त्यांच्यातील बऱ्याच अग्निपूजक आहेत. 

 अग्नी हा राक्षस व पिशाच यांचा निवारक व पापनाशक आहे, अशी त्यांची परंपरागत समजूत आहे. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांतही अग्निस पवित्र व पापनिवारक शक्ती म्हणून सांभाळण्याची परंपरा होती. हिब्रूंच्या धर्मग्रंथात अग्नीचा महिमा वर्णिलेला नसला, तरी ते देवाची पूजा व प्रार्थना करताना देवाला अर्पण करावयाचे पदार्थ वेदीवरील अग्नीत टाकीत असत.

पंचभूततत्त्वांपैकी तिसरे भूततत्त्व व त्याची अधिष्ठात्री देवता, केवल अग्नी, विशेषणविशिष्ट अग्नी व अन्य देवतांसहित अग्नी, ही चारही वेदांमिळून २,४९१ मंत्रांची देवता आहे. अतिथी, कवितम, दूत, पुरोहित, हव्यवाट् इ. शेकडो गुणबोधक विशेषणे वेदमंत्रांत आहेत. काही मंत्रांचा अग्नी हा ‘ऋषी’ आहे. हा सर्व देवांचे मुख तसेच त्यांचा दूत आहे. वेदमंत्रांत व स्मृतींत वृषभ व मनुष्य यांच्या संमिश्र रुपाने याचे वर्णन केले आहे, ते असे : चार शिंगे, तीन पाय, दोन मस्तके, सात जिव्हा, सात हात, चार नेत्र, चार कान, दोन नासिका, दोन पुच्छे, तीन ठिकाणी बांधलेला उजव्या चार हातांत शक्ती, अन्न, स्त्रुक् व स्त्रुव डाव्या तीन हातांत तोमर, व्यजन व घृतपात्र वाहन मेंढा, वर्ण पिंगट, गोत्र शांडिल्य.

अग्नि हा धर्म व वसू (स्त्री) यांचा पुत्र. अष्टवसूंपैकी एक. भार्या वसोर्धारा, कृत्तिका, स्वाहा इत्यादी. पुत्र द्रविणक, स्कंद इत्यादी. स्वाहेचे पुत्र-पावक, पवमान, शुची व त्यांचे ४५ पुत्र हे सर्व अग्निरूप, म्हणून मूळ अग्नीसह एकूण अग्नी ४९, बृहस्पतीपासून सहा अग्नी व परत त्यांच्यापासून अपरिमित अग्नी उत्पन्न झाले. या सर्वांत एकच अग्नितत्त्व आहे. (म. भा. ३. २०९-२१२).

अग्नींची व अग्निजिव्हांची निरनिराळी नावे आहेत. विविध कर्मांत विशिष्ट नावांनी अग्नींची स्थापना व विशिष्ट जिव्हेत दिलेली आहुती धर्मशास्त्रात विहित आहे. त्रैवर्णिकांना अग्न्युपासना नित्य आहे.

अग्निपूजक जागतिक मोठे धर्म म्हणजे प्राचीन हिंदुधर्म व इराणी लोकांचा म्हणजे पारश्यांचा जरथुश्त्री धर्म होत. वेदांमध्ये म्हटले आहे, की अग्नी हा मानवांचा मित्र व पालक असून तो अमर व त्रिभुवनसंचारी आहे तो इंद्र, वरूण, सूर्य इ. देव व माणसे यांच्यातील मध्यस्थ म्हणजे देवदूत आहे. अग्नी देवतांना यज्ञात बोलवून आणतो किंवा देवतांकडे हवी पोचवितो, अशी वेदांची कल्पना आहे. भारतीय आर्यांच्या विवाह, उपनयन, अंत्येष्टी इ. संस्कारांत अग्निपूजेलाच प्राधान्य असते. अग्नीची पूजा म्हणजे मंत्रपूर्वक अग्निस्थापना, प्रार्थना, समिधा, दूध, तूप, यव, तांदूळ, मांस वा अन्य अन्नात्मक द्रव्यांचे अग्नीला वा अन्य देवतांना उद्देशून हवन करणे व अखेरीस अग्निदेवाचे विसर्जन करणे. वैदिक धर्मात गृहस्थाचे म्हणजे आर्याचे ⇨

अग्निहोत्र हे नित्य कर्तव्य मानले आहे. पारशी धर्मात अग्नी हा पवित्र व अमर स्वर्गीय प्रकाश मानला आहे. त्याच्या नित्यपूजेकरिता पारशी लोक अग्निमंदिरे बांधतात. तो अग्नी विझू नये म्हणून वैदिक आर्यांप्रमाणे त्याच्या रक्षणाची काळजी घेतात.

पहा: अग्नि अग्यारी यज्ञसंस्था.

केळकर, गोविंदशास्त्री जोशी, लक्ष्मणशास्त्री