चैतन्य संप्रदाय : बंगाल, ओरिसा व व्रजमंडळ या प्रदेशांत उदयास आलेला एक भक्तिमार्गी वैष्णव संप्रदाय. ‘गौडीय वैष्णव संप्रदाय’ या नावानेही तो ओळखला जातो. त्याचे संस्थापक गौरांग चैतन्य महाप्रभू (१४८५–१५३३) असल्याचे मानले जाते तथापि स्वतः चैतन्यांनी कुठल्याही स्वतंत्र संप्रदायाची स्थापना व प्रचार करण्याचा आग्रह धरला नव्हता वा तसा त्यांचा प्रयत्न व हेतूही नव्हता तरीही प्रत्यक्षात मात्र त्यांचे अनेक अनुयायी होते. चैतन्य हे कृष्णाच्या माधुर्यभक्तीत सदैव इतके तल्लीन आणि भावोन्मत्त असत, की स्वमतप्रतिपादनार्थ एखाद्या ग्रंथाची रचना करणे त्यांना सर्वस्वी अशक्य होते. चैतन्यांनी जिवांच्या हितासाठी कृष्णभक्तितत्त्व, हरिनामसंकीर्तन व सर्वभूतदया यांचा उपदेश आमरण केला. चैतन्यांनंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या दिव्य उपदेशाच्या व प्रवचनांच्या आधारे संस्कृतमध्ये त्यांच्या शिकवणीची सारभूत ग्रंथरचना करून त्यांच्या उपदेशाचा प्रचार आसामपासून गुजरातपर्यंत केला. ह्या संप्रदायाचा उगम अशा प्रकारे बंगालमध्ये झाला असला, तरी संप्रदायाच्या धार्मिक व तात्त्विक भूमिकेच्या विवेचन-विवरणाचे कार्य वृंदावन येथे त्यांच्या अनुयायांकडून झाले. तेथून हे सर्व ग्रंथ प्रचारार्थ श्रीनिवासाचार्य या अनुयायामार्फत बंगालमध्ये पाठविले गेले. श्यामानंद ह्या अनुयायाने ते ग्रंथ ओरिसात नेऊन तेथून चैतन्यमताचा प्रभावी प्रचार-प्रसार केला. नंतर बंगालमध्येही बंगाली भाषेत चैतन्यमताच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती होत राहिली. चैतन्यमंगल  हा लोचनदासविरचित, चैतन्यभागवत  हा वृंदावनदासविरचित तसेच चैतन्यचरितामृत  हा कृष्णदास कविराजविरचित ग्रंथ चैतन्यचरित्राचे आणि तत्त्वज्ञानाचे बंगाली भाषेतील अधिकृत ग्रंथ मानले जातात. बंगालमध्ये चैतन्यांचा पट्टशिष्य नित्यानंद (१४७३ — ? ) तसेच अद्वैताचार्य (१४३४–१५५७) यांच्या घराण्यात वंशपरंपरेने तसेच चैतन्यांच्या इतर अनुयायांनी ह्या संप्रदायाचा प्रभावी प्रचार केला व आजही ते करीत आहेत. ठिकठिकाणी अनेक गौडीय मठ स्थापन केले गेले. वृंदावन येथे गोपालभट्ट गोस्वामींचे अनुयायी आजही चैतन्यमताचा प्रचार करीत आहेत.

पूर्वी जयपूर राजघराण्याच्या अंमलाखाली वृंदावन होते आणि तेथील वैष्णवविरोधकांनी जयपूरच्या महाराजांकडून ह्या संप्रदायास अवैदिक ठरविले. तेव्हा १७१८ च्या सुमारास जयपूर येथे एक धर्मसंमेलन आयोजित केले गेले. त्यासाठी चैतन्य संप्रदायाचे प्रमुख अधिकारी व पंडित विश्वनाथ चक्रवर्ती यांनाही निमंत्रण गेले. विश्वनाथ चक्रवर्तींनी आपला पट्टशिष्य बलदेव विद्याभूषण यास या संमेलनास आपला प्रतिनिधी म्हणून पाठविले. त्याने ह्या संमेलनात आपले मत अत्यंत प्रभावीपणे मांडून, चैतन्य संप्रदाय हा वैदिक परंपरेतीलच असल्याचे सिद्ध केले. ह्या संप्रदायास स्वतःचे वेदान्तभाष्य नव्हते, म्हणून बलदेव विद्याभूषण याने आपले गोविंदभाष्य   लिहून वेदान्तभाष्याची उणीव भरून काढली.

चैतन्य संप्रदायाचे अनुयायी

तत्त्वज्ञान : हे भक्तिप्रधान तत्त्वज्ञान आहे. ह्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान ‘अचिंत्यभेदाभेदवाद’ या संज्ञेने ओळखले जाते. याचा अर्थ असा : भगवान कृष्ण हेच मुख्य तत्त्व होय. त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती राहत असून तो सर्व शक्तिमान आहे. त्या शक्तींपैकीच जीवशक्ती व मायाशक्ती या होत. या शक्तींमुळेच जीवात्म्यांना आणि भौतिक जगताला अस्तित्व आहे. शक्ती व शक्तिमान यांच्यात भेद आहे तसा अभेदही आहे. भगवान शक्तिमान होय, त्याच्या शक्तींहून तो भिन्न आहे तसा अभिन्नही आहे, असेच म्हणावे लागते परंतु असे चिंतन, असा विचार वा असा तर्क करता येत नाही. भेद व अभेद एकत्र आहेत असे चिंतनाने वा विचाराने वा तर्काने असमर्थनीय ठरते. तात्पर्य, अद्वैतवादवाद्वैतवाद हे खऱ्या भक्ताला उपयोगी पडत नाहीत. दोन्ही वादांच्या पलीकडेशुद्ध भक्तीची अवस्था असते. शुद्ध भक्ती ही ज्ञानाच्या वा विचारपद्धतीच्यापलीकडची भावना आहे.

चैतन्यांच्या मते जीवतत्त्व शक्ती असून कृष्णतत्त्व हे शक्तिमत् आहे. वैष्णव हा कृष्णाचे म्हणजे ईश्वराचे आकलन करू शकतो पण त्याचे वर्णन करू शकत नाही. वैष्णव म्हणतो, की ‘ईश्वर आनंद आहे, केवळ आनंद आहे’. जीव हा जननमरणाच्या अनेक फेऱ्यांतून शेवटी मुक्त होतो आणि गोलोकात जातो. तो मुक्त झाल्यावरही गोलोकात स्वतःचे वेगळेपण राखून ईश्वराच्या आनंदाचा उपभोग घेतो. कारण मुक्तीनंतरही जीव ‘स्वयंचित्’ म्हणून असतोच त्याचे ‘अप्राकृत अहंत्व’ नंतरही कायमच राहते.


‘मधुरम्’ ही गौडीय वैष्णवांच्या भक्तीतील प्रधान कल्पना आहे.त्यांच्या मते कृष्ण हा अधिष्ठान आणि राधा म्हणजे त्याचे आनंदरूप होय. राधा-कृष्ण यांतून शक्ती व शक्तिमत् हे अंतिम दैवी परमानंदाचे अनंतरूप प्रतीत होते. ए. के. मजुमदार यांच्या मते चैतन्य संप्रदायाची भारतीय विचारधारेत मोलाची भर म्हणजे, त्यांनी प्रतिपादिलेला ‘अचिंत्यशक्ती’ हा पदार्थप्रकार, सत्ताशास्त्रीय दृष्ट्या राधेचे स्थान आणि रससिद्धांताचा त्यांनी केलेला विकास, ही होय. ⇨माध्व संप्रदायाचा ह्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही. माध्व तत्त्वज्ञानाचे प्रमुख अंग म्हणजे त्यांची ज्ञानमीमांसा होय. चैतन्याला ह्या ज्ञानमीमांसेत काहीही स्वारस्य वाटत नव्हते. ए. के. मजुमदारांनी चैतन्यमत आणि माध्वमत यांत काहीही संबंध नसल्याचे प्रतिपादन केले असले, तरी इतर काही विद्वान, उदा., बी. बी. मजुमदार ह्या दोन मतांत संबंध व साम्य असल्याचे मानतात. ⇨मध्वाचार्य (१२३८ — १३१७) व चैतन्य ह्या दोघांचीही तत्त्वज्ञाने द्वैतवादी असली, तरी त्यांत महत्त्वाचा फरकही आहे. माध्व मतानुसार स्वतंत्र (परमात्मा) व अस्वतंत्र (जीवात्मा) अशी दोन मूलभूत तत्त्वे असून ती दोन्हीही अनादी व नित्य आहेत. त्यांत स्वभावतःच भेद आहे. चैतन्यमतानुसार कृष्ण हेच एक परम तत्त्व असून कृष्णाच्या शक्ती अनंत आहेत. शक्ती व शक्तिमत् यांत जसा भेद सिद्ध होऊ शकत नाही, तसा त्यांत अभेदही सिद्ध होऊ शकत नाही. ह्या दोहोंतील संबंध केवळ तर्काने अचिंत्य आहे. अग्नी व स्फुल्लिंग हे जसे एकरूप नाहीत, तसेच ते परस्परांहून भिन्नही नाहीत. त्याचप्रमाणे जीवात्मा व ईश्वर यांतील संबंध अतर्क्य आहे. चैतन्यमतानुसार भौतिक गुण हे आध्यात्मिक वस्तूंत संभवनीय नाहीत. सत्त्व, रज व तम ह्या गुणांचे विविध संघात म्हणजे भौतिक वस्तू. कृष्ण हा भौतिक नाही, आध्यात्मिक आहे. म्हणूनच तो विशुद्ध सत्त्वरूप आहे आणि त्याला रज-तमाचा स्पर्शही होऊ शकत नाही. कृष्ण सान्त व अनंत, सर्वत्र व एकत्र, अशा सर्व प्रकारे असू शकतो. कारण तो अचिंत्यशक्तीने युक्त आहे. ह्या अचिंत्यशक्तीमुळेच तो विभू, व्यापक आहे. षड्‌विध ऐश्वर्याची (श्री, ऐश्वर्य, वीर्य, यश, ज्ञान आणि वैराग्य) संपूर्ण एकरूपता त्याच्या ठिकाणी असून त्यांतील ‘श्री’ हे ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी केंद्रस्थानी आहे आणि इतर पाच ऐश्वर्ये ‘श्री’ ह्या ऐश्वर्याची अंगभूत ऐश्वर्ये आहेत. राधा-कृष्णाची भक्ती चैतन्याच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. राधा व कृष्ण हा दोन शरीरांत वास करणारा एकच आत्मा असून परस्परांचे प्रेम अनुभवण्यातच त्यांना आनंदाचा दिव्य साक्षात्कार होतो. म्हणूनच भक्ताने स्वतःस गोपी समजून कृष्णावर प्रेम करावयास हवे. भक्तीचा परमोत्कर्ष चैतन्य संप्रदायात आढळतो. चार पुरुषार्थांशिवाय भक्ती हा पाचवा पुरुषार्थ चैतन्य संप्रदायात मानला असून त्यांत भक्तीचे स्थान सर्वोच्च मानले आहे. संवित् व हूलादिनी ह्या दोन ईश्वरशक्तींचे मिश्रण भक्तीत असल्याने भक्ती ही ईश्वररूपच मानली आहे.

संप्रदाय-संघटना :चैतन्यांना त्यांच्या अनुयायांमध्ये देवतास्वरूप प्राप्त होऊन अनेक अनुयायी त्यांना कृष्णाचा अवतार मानू लागले. अद्वैत ह्या चैतन्यशिष्याने तसेच इतर अनेक शिष्यांनी चैतन्यांच्या उपासनेस सुरुवात केली. बंगालमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या लाकडी मूर्तींची पूजा होऊ लागली. पुरी येथील एका यात्रेच्या वेळी अद्वैताने चैतन्य हे ईश्वराचा थोर व नवा अवतार असल्याचे जाहीर केले आणि चैतन्यांच्या नावाने कीर्तनही सुरू केले. स्वतः चैतन्यांना हे आवडले नाही ‘मी ईश्वरावतार नसून एक मानवच आहे’, असे त्यांनी स्पष्टही केले तथापि लोकांच्या व अनुयायांच्या उत्साहास आवर घालणे त्यांना शक्यच नव्हते.

या संप्रदायाचे चैतन्यांनंतरचे बंगालमधील प्रमुख व मान्यवर अनुयायी म्हणजे नित्यानंद, अद्वैत, दामोदर पंडित, गदाधर पंडित (१४८६—१५१४), हरिदास ठाकूर ( ? —१५३४), जगदानंद, मुरारी गुप्त, रामानंद राय (? —१५८४), श्रीवास, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, जीव गोस्वामी इ. होत. नित्यानंदास चैतन्यांनी आपला थोरला भाऊ मानले होते. त्यामुळे संप्रदायात नित्यानंदाचे स्थान चैतन्यांच्या खालोखाल व अद्वैताचे नित्यानंदाच्या खालोखाल होते. नित्यानंद व अद्वैत यांच्या निधनानंतर संप्रदायाची सूत्रे जान्हवा देवी व सीता देवी यांच्याकडे आली. जान्हवा देवी ही नित्यानंदाची आणि सीता देवी ही अद्वैताची पत्नी होती. त्यांच्या पुत्रपौत्रांनी बंगालमध्ये चैतन्य संप्रदायाच्या दोन प्रधान गुरुपरंपरा सुरू केल्या. नित्यानंद व अद्वैत यांनी फक्त चैतन्यांचीच त्यांच्या साध्या व शुद्ध स्वरूपात उपासना सुरू करण्याचा प्रयत्न केला तथापि नित्यानंदाच्या अनुयायांनी मात्र चैतन्यांसोबत नित्यानंदाचीही उपासना सुरू केली. ह्या चैतन्य व नित्यानंदमूर्तींच्या उपासनेस प्रतिक्रिया म्हणून वृंदावन येथील चैतन्यांचे अनुयायी सनातन, रूप आणि जीव ह्या गोस्वामींनी कृष्ण व राधा अशा दुहेरी स्वरूपाच्या उपासनेस सुरुवात केली. यापूर्वी बंगालमधील वैष्णवांमध्ये केवळ कृष्णमूर्तीचीच उपासना होत असे राधाकृष्णमूर्तींची नव्हे.

सनातन (१४८४—१५५८), रूप (१४९०—१५६३), जीव (सोळावे शतक), गोपालभट्ट, रघुनाथभट्ट आणि रघुनाथदास ह्या गोस्वामींनी चैतन्यांच्या निधनानंतर संप्रदायाचे अध्ययनकेंद्र वृंदावन येथे सुरू केले आणि भागवत  हाच आपल्या संप्रदायाचा प्रमुख आधारग्रंथ मानला. वृंदावनक्षेत्राचा त्यांनी जीर्णोद्धारही केला (१५९०). वृंदावन हे गौडीय वैष्णवांचे पवित्र क्षेत्र करण्याचे श्रेय सनातन, रूप व जीव ह्या तीन गोस्वामींकडेच जाते. ह्या तिघांची सांप्रदायिक ग्रंथनिर्मितीही विपुल असून ती संप्रदायात प्रमाण मानली जाते. त्यांनी चैतन्यांच्या व नित्यानंदाच्या उपासनासंप्रदायास मुळीच उत्तेजन दिले नाही. त्याऐवजी राधा-कृष्णाची उपासना निष्ठेने स्वीकारून त्यांनी त्या उपासनेवर अनेक काव्यग्रंथ, नाटके, भाष्ये, तत्त्वज्ञानग्रंथ रचले. हे त्यांनी चैतन्यांची उपासना नाकारण्यासाठी केले असे नाही तर आपल्या संप्रदायाचा, चैतन्यांस केवळ ईश्वरावतार मानण्यात, जो अधःपात होत होता, तो थांबवावा म्हणून केले. वृंदावनचे गोस्वामी चैतन्यांस केवळ ईश्वरावतार मानूनच थांबले नाहीत, तर ते त्याही पुढे गेले. त्यांनी असे प्रतिपादन केले, की चैतन्य हा राधा आणि कृष्ण यांचा संयुक्त अवतार आहे आणि म्हणूनच तो परिपूर्णावतार आहे. त्यांनी असेही प्रतिपादिले, की चैतन्य हा अवतारच होता पण त्याने स्वतःची उपासना करून घेण्याचे नाकारुन स्वतःस सर्वसामान्य माणूस म्हणवून घेतले. त्यांच्या मते ह्या कलियुगातील माणसांना मुक्तीचा सोपा मार्ग उपलब्ध करून देणे, हे जरी वरवर दिसणारे चैतन्यांचे कार्य असले, तरी त्याचा खरा हेतू ईश्वरी प्रेमाचा बरावाईट अनुभव ईश्वरानेच घेणे हा होय. चैतन्यांच्या जीवनाचा व कार्याचा हा अर्थ सर्वप्रथम स्वरूप व दामोदर यांनी लावला आणि नंतर त्याचा सैद्धांतिक विकास सनातन व रूप यांनी तसेच त्यांचे सहकारी व अनुयायी यांनी वृंदावन येथे केला. त्यांनी चैतन्य मतावर त्यांच्या समजुतीनुसार व कुवतीनुसार संस्कृतमध्ये विपुल ग्रंथरचना केली व भाष्ये लिहिली.


 

चैतन्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व संप्रदायाचा प्रभाव दूरवर आसाममध्येही पडला. शंकरदेवाची ( ? –१५६८) व चैतन्यांची पुरी येथे भेट झाली असावी. चैतन्यांच्या प्रभावाने शंकरदेवाने वैष्णव संप्रदायाचा कामरूप व कुचबिहार येथे प्रसार केला. चैतन्यांप्रमाणेच शंकरदेवही बालकृष्णाचा उपासक होता. राधाकृष्णाची संयुक्त भक्ती शंकरदेवास ज्ञात नव्हती. ही संयुक्त रूपातील उपासना आसाममध्ये सोळाव्या शतकाच्या अखेरीस पोहोचली व त्यामुळे पुढे आसाममधील वैष्णवांत फूट पडून ‘महापुरुषीया’ व ‘दामोदरीया’ असे दोन वेगवेगळे उपसंप्रदाय निर्माण झाले. आसाम व नवद्वीप येथून मणिपूरपर्यंत वैष्णव संप्रदायाचा प्रसार झाला. सर्वसाधारणपणे ओरिसात बंगाली चैतन्य संप्रदायास विशेष मान्यता असल्याचे दिसते. वृंदावन येथील चैतन्य संप्रदायाच्या शाखेने सर्व भारतातून आलेल्या निराश्रित वैष्णवांना आश्रय दिला. नित्यानंदाच्या आणि अद्वैताच्या मृत्यूनंतर काही काळ बंगालमधील वैष्णव वृंदावन शाखेचे मार्गदर्शन मिळवीत होते. अशा प्रकारे वृंदावन हे वैष्णवांच्या आध्यात्मिक व लौकिक ध्येयाचे केंद्र बनून बंगालमधील नवद्वीप (नाडिया), शांतिपूर इ. स्थानिक केंद्रांचे महत्त्व कमी कमी होत गेले.

चैतन्य संप्रदायाचा मध्ययुगीन भारतीय साहित्यावर – विशेषतः बंगाली, ओडिया, असमिया व हिंदी साहित्यांवर – खूपच प्रभाव पडला. रूपगोस्वामीने आपल्या हरिभक्तिरसामृतसिंधु  व उज्वलनीलमणि  ह्या संस्कृत ग्रंथांत काव्यशास्त्रदृष्ट्या भक्तिरसाचे मौलिक विवेचन करुन भक्तिरसास मान्यता व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याने भक्तीचे पाच प्रकार मानून त्यांतील ⇨मधुराभक्तीस सर्वश्रेष्ठ स्थान दिले. चैतन्यमतात भक्तीस प्राधान्य असल्यामुळे भक्तीबाबत त्यात सूक्ष्म विचार झाला व त्यामुळे रससिद्धांतात मोलाची भर पडली.

संस्कृत तसेच बंगाली ह्या भाषांत चैतन्यचरित्रावर अनेक काव्यग्रंथ लिहिले गेले, तसेच चैतन्यमताच्या तत्त्वज्ञानावर व आचार-विचारांवरही विपुल ग्रंथरचना झाली. रीतिकालीन हिंदी काव्यावरही – विशेषतः ‘हरिवंशी’ संप्रदायाच्या – चैतन्यमताचा सखोल प्रभाव पडून काव्य निर्माण झाले. चैतन्य संप्रदायाच्या मधुराभक्तीस अनुसरूनच त्यांनी कृष्णलीला वर्णिलेल्या दिसतात. ओडिया व असमिया भाषांतही चैतन्यमतास अनुसरून विपुल साहित्य निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये मधुराभक्तीचा काही संतकवींनी आपल्या रचनेतून पुरस्कार केला. ⇨ गुलाबराव महाराज (१८८१—१९१५) यांनी तर तिचा हिरिरीने पुरस्कार केला. त्यांनी मधुराभक्तीचे तत्त्वज्ञान विषद करण्यास मराठीत बरीच ग्रंथरचना केली.

आचारसंहिता : सांप्रदायिक दीक्षा, आचार, विधी इत्यादींचे विस्तृत विवेचन गोपालभट्टाच्या नावावर मोडत असलेल्या हरिभक्तिविलास  ह्या संस्कृत ग्रंथात आढळते. संप्रदायात सर्वच जातिधर्मपंथांच्या लोकांना (मुसलमानांनाही) प्रवेश आहे. मंत्रदीक्षा देऊन अनुयायी करून घेण्यापूर्वी काही दिवस त्याचे वर्तन बारकाईने पाहून तो दीक्षायोग्य वाटल्यास त्याला शुभदिनी मंत्रदीक्षा दिली जाते. अनुयायी तीनपदरी तुलसीमाला गळ्याशी घट्ट बांधतात. मालेतील दोन पदर राधाकृष्णाचे प्रतीक म्हणून एकमेकांजवळ असतात. बहुतेक अनुयायी पांढरी कफनी परिधान करतात तथापि काही भटके अनुयायी आणि बंगालमधील बहुतेक अनुयायी अलीकडे पिवळ्या-नारिंगी रंगाची कफनी परिधान करू लागले आहेत. ते कपाळावर दोन उभ्या रेषांचा पांढरा गंध लावतात त्यांतील एक रेषा नाकाच्या टोकापर्यंत खाली ओढतात. त्यांच्यातील पुरुष-अनुयायांच्या नावापुढे ‘दास’ किंवा ‘शरण’ आणि स्त्री-अनुयायांच्या नावापुढे ‘दासी’ पद लागते. चैतन्य संप्रदायात किरकोळ सैद्धांतिक भेदांनुसार सु. बारा शाखा अथवा उपसंप्रदाय झाले आहेत. त्यांची चौसष्ट संघटना केंद्रे असून त्यांना ‘परिवार’ म्हणतात. ह्या परिवारात संन्यासी व गृहस्थ अशा दोन्हीही प्रकारच्या अनुयायांचा समावेश होतो.

रामनवमी, नृसिंह-जयंती, जन्माष्टमी व वामन-द्वादशी (भाद्रपद शु.१२) हे चार वार्षिक उत्सव संप्रदायात सर्वत्र साजरे केले जातात. यांशिवाय फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस ते चैतन्य-जयंतीनिमित्त उपवास करून मोठा उत्सव साजरा करतात. सर्वच एकादशीस ते उपवास करतात. वैष्णव असूनही ते शिवरात्रीचाही उपवास करतात. संप्रदायसंघटनांमार्फत काही पाठशाळा व गोशाळा चालविल्या जातात, तसेच मोफत आयुर्वेदीय औषधोपचार केंद्रेही चालविली जातात. संप्रदायाचे प्रमुख केंद्र ‘श्री गौडीय मठ’ नावाचे असून ते कलकत्त्यास आहे. ह्या  केंद्राच्या पश्चिम बंगालमध्ये सात, ओरिसात बारा, बिहारमध्ये तीन, उत्तर प्रदेशात सात व दिल्ली-पंजाब भागात दोन शाखा आहेत. मुंबई व मद्रास येथेही त्याची एकेक शाखा आहे. संप्रदायाचे अनेक अनुयायी उच्च शिक्षण घेतलेले असून ते राजकीय चळवळीतही भाग घेतात.

चैतन्य संप्रदायाच्या अनुयायांनी विद्वत्तेसोबतच विशुद्ध भक्तिभावना, शुद्ध आचरण व त्यागमय जीवन यांच्यायोगे जनमानसावर विलक्षण प्रभाव पाडून अनेकांना आपल्या पंथाकडे आकृष्ट करून घेतले. चैतन्य संप्रदायाचा प्रभाव सर्वच जातींच्या स्त्रीपुरुषांवर पडून ते चैतन्य संप्रदायाचे अनुयायी झाले.

 

संदर्भ:     1. De, Sushil Kumar, Early History of the Vaisnava Faith and Movement in Bengal, Calcutta, 1961.

2. Kennedy. M. T. The Chaitanya Movement, A Study of the Vaishnavism of Bengal, Calcutta, 1925.

3. Majumdar, A. K. Chaitanya : His Life and Doctrine, Bombay, 1969.

4. Sarkar, Jadunath, Cahitanya’s Life and Teachings, Calcutta, 1932.

5. Sen, D. C. Chaitanya and His Age, Calcutta, 1922.

6. Tirtha, Bhakti Vilas, Shri. Chaitanya’s Concept of Theistic Vedanta, Madras, 1964.

  

सुर्वे, भा.ग.