आपस्तंब : भृगुकुलातील ब्रह्मर्षी. दितिकृत पुत्रकामेष्टीत तो मुख्य ऋत्विज होता. कृष्णयजुर्वेदाचा शाखाप्रवर्तक ऋषी म्हणून चरणव्यूहात त्याची गणना आहे. त्याची वेदशाखा सध्या उपलब्ध नाही. तो वेदशाखाप्रवर्तक नसून तैत्तिरीयशाखेच्या आपस्तंब उपशाखेचा सूत्रप्रवर्तक असल्याने, वेदशाखाप्रवर्तकांत त्याची गणना आहे, असेही मत आहे. कल्पसूत्र, अपरसूत्र, अंत्येष्टिप्रयोग, २०२ श्लोकांची एक स्मृति इ. त्याचे ग्रंथ आहेत. त्याचा देश आंध्र. उत्तरेतून तो आंध्रात आला असेही मत आहे. त्याची पत्‍नी अक्षसूत्रा आणि पुत्र कर्की. त्याचा काळ इ.स.पू. १४२० ते इ.स.पू. ३०० या दरम्यान निरनिराळ्या संशोधकांच्या मताने निरनिराळा ठरतो.

केळकर, गोविंदशास्त्री