आर्चबिशप : ख्रिस्ती धर्मातील एक पद. चर्च ही संस्था ‘ख्रिस्ती मंडळी’ नावाने ओळखली जाते. ख्रिस्ती मंडळ्या अनेक देशांमध्ये विखुरल्या आहेत. त्या त्या देशाचे काही भौगोलिक भाग पाडून त्यांना धर्मप्रांत म्हणतात. डायोसिस ह्या धर्मप्रांतामध्ये ज्या मंडळ्या येतात, त्या मंडळ्यांच्या मुख्याला बिशप म्हणतात. ह्या धर्म प्रांतामध्ये ऐतिहासिक परंपरेने ज्याला महत्त्व प्राप्त झालेले असते, त्या प्रांताच्या मुख्याला ‘मेट्रोपॉलिटन’ म्हणतात. काही देशांत मुख्य बिशपला आर्चबिशप असे म्हणतात. इ. स. ३४० पासून ही संज्ञा रूढ झाली. भारतात कलकत्ता येथील धर्मप्रांताच्या पुढाऱ्याला भारताचा मेट्रोपॉलिटन म्हणतात. इंग्लंडमध्ये या पदास मेट्रोपॉलिटन असे न म्हणता प्रायमेट म्हणतात. कँटरबरीच्या आर्चबिशपला इंग्लंडचा प्रायमेट म्हणतात.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.)साळवी, प्रमिला (म.)