खंडोबा : महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक  प्रसिद्ध लोकदैवत. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते हे दैवत सु.अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले. ब्राह्मणांपासून तो धनगर रामोश्यांपर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. तो अनेकांचे कुलदैवतही आहे. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस (चंपाषष्ठी), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा मल्लारि-माहात्म्यम्  ह्या संस्कृत ग्रंथात आहे. प्रस्तुत ग्रंथ १२६० ते १५४० च्या दरम्यान, कुणातरी महाराष्ट्रीय कवीने रचिला असावा. या ग्रंथामुळेच खंडोबाला महाराष्ट्र – कर्नाटकांत विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. अश्वारूढ, उभ्या व बैठ्या अशा त्रिविध स्वरूपात खंडोबाच्या मूर्ती  आढळतात. चतुर्भुज कपाळाला भंडार हातांत डमरू, त्रिशूळ, खड्‌ग व पानपात्र वाहन घोडा आणि म्हाळसा व बाणाई ह्या भार्या, असे त्याचे वर्णन आढळते. म्हाळसा आणि बाणाई ह्या जातीने अनुक्रमे वाणी आणि धनगर असल्याच्या लोककथा रूढ आहेत. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई, हेगडे प्रधान (बाणाईचा भाऊ व खंडोबाचा प्रधान), घोडा व कुत्रा यांचा समावेश होतो. मुले होण्यासाठी लोक खंडोबास नवस करतात आणि मुलगा झाल्यास ‘वाघ्या’ व मुलगी झाल्यास ‘मुरळी’ म्हणून खंडोबाच्या सेवेस अर्पण करतात [→ वाघ्यामुरळी].

जेजुरीचा खंडोबा

महाराष्ट्रात व कर्नाटकात खंडोबाची अनेक पवित्र क्षेत्रे प्रसिद्ध असून तेथे दिनविशेषपरत्वे यात्रा-उत्सवही साजरे केले जातात. महाराष्ट्रात ⇨जेजुरी (जि. पुणे), पाली (जि. सातारा) इ. क्षेत्रे, तर कर्नाटकात मंगसूळी (जि. बेळगाव), मैलारलिंग (जि. धारवाड), मैलार (जि. बेल्लारी) इ. क्षेत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. रविवार सोमवती  अमावस्या चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा तसेच चंपाषष्ठी हे दिनविशेष खंडोबाच्या उपासनेत महत्त्वाचे मानले जातात. बेल, भंडार व दवणा ह्या वस्तूंना त्याच्या पूजेत विशेष महत्त्व असून कांदा त्याला प्रिय आहे. त्याला मांसाचाही नैवेद्य दाखवितात.

खंडोबाच्या स्वरूपाविषयी शं. बा.जोशी, पांडुरंग देसाई, ग. ह.खरे, रा. चिं. ढेरे प्रभृती विद्वानांनी संशोधनपूर्वक विविध मते मांडली आहेत.

संदर्भ : ढेरे, रा. चिं. खंडोबा, पुणे, १९६१.

सुर्वे, भा. ग.