कल्कि : विष्णूच्या दशावतारांपैकी दहावा किंवा चोवीस अवतारांपैकी एकविसावा अवतार. कीकट देशातील ‘शंभल’ नावाच्या ग्रामात विष्णुयशस्‌ नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून हा जन्म घेईल. गोत्र पराशर असेल. सिंहलदेशाधिपती बृहद्रत याची कन्या पद्मा हिच्याशी कल्कीचा विवाह होईल. पंचवीस वर्षांच्या आयुष्यात तो जगाचा सम्राट होईल. देवदत्त नावाच्या अश्वावर बसून, हातात लांब तलवार घेऊन दुष्ट व अधार्मिकांचा तो संहार करील. पुरोहित याज्ञवल्क्य या कामात त्याला मदत करील. पुन्हा धर्मस्थापना करून शेवटी तो गंगा-यमुना संगमात देहविसर्जन करील. यानंतर कलियुग संपून कृतयुगास आरंभ होईल. अशा तर्‍हेने भविष्यकथन कल्किपुराणादिकांतून केले आहे. कल्कीला ‘कलंकी’ असेही म्हणतात.  

कल्की नावाची एक ऐतिहासिक व्यक्ती सहाव्या शतकात होऊन गेली, असे काही आधुनिक इतिहासज्ञ मानतात.          

             

जोशी, रंगनाथशास्त्री.