चौदा रत्‍ने : एकदा युद्धामध्ये दैत्यांच्या तीक्ष्ण शस्त्रांनी देवांचा संहार होऊ लागला तसेच दुर्वास ऋषीच्या शापामुळे इंद्रासह सर्व देव हतबल झाले. त्या वेळी ब्रह्मदेवासह सर्व देव विष्णूकडे गेले. विष्णूने त्यांना प्रथम दैत्यांशी सख्य करावयास तसेच त्यांच्या मदतीने अमृत उत्पन्न करावयास सांगितले. त्यानंतर देवांनी व दैत्यांनी एकत्र येऊन समुद्रमंथन  केले, तेव्हा समुद्रातून चौदा रत्ने निघाली, अशी कथा पुराणांत आहे. त्यांची नावे अशी : (१) हालाहल विष, (२) कामधेनू, (३) उच्चैःश्रवानामक अश्व, (४) ऐरावतनामक हत्ती, (५) कौस्तुभ रत्‍न, (६) पारिजातक वृक्ष, (७) रंभादी अप्सरा, (८) सुरा, (९) चंद्र, (१०) शंख, (११) धनुष्य, (१२) लक्ष्मी, (१३) धन्वंतरी व (१४) अमृत. हालाहल विष शंकराने प्राशन केले. त्यामुळे शंकर नीलकंठ झाले. कामधेनूचा ऋषींनी अग्निहोत्राकरिता स्वीकार केला. उच्चैःश्रवा अश्व दैत्यराज बलीने घेतला. ऐरावत हत्ती इंद्राने घेतला. कौस्तुभ रत्नाचा स्वीकार विष्णूने केला व ते गळ्यात धारण केले. पारिजातक वृक्षाने स्वर्गाला शोभा आणली. अप्सरा स्वर्गात राहून देवांचे मनोरंजन करू लागल्या. सुरा ह्या मादक पेयाचा स्वीकार असुरांनी केला. लक्ष्मीने पती म्हणून विष्णूचा स्वीकार केला. शंख व धनुष्य यांचा विष्णूने स्वीकार केल्याचा उल्लेख पुराणांतून आढळतो. धन्वंतरीला देवांचा वैद्य म्हणतात. अमृत देवांनी मिळविले.

जोशी, रंगनाथशास्त्री