खरतरगच्छ : जैन धर्मातील एक पंथभेद. जैन धर्मात पूर्वी जे चार प्रमुख संघ होते, त्यांत पुढील काळी अनेक भेदोपभेद निर्माण झाले. संघाच्या ह्या भेदांना ‘गण’’ व उपभेदांना ‘गच्छ’ म्हटले जाते. क्वचित प्रसंगी संघांना गण व गणांना गच्छ म्हटल्याचेही आढळते. गुजरातमधील पाटणच्या चालुक्यवंशीय दुर्लभराजाच्या दरबारात वर्धमानसूरींचा शिष्य जिनेश्वरसूरी याने चैत्यवासी जैनाचार्यांचा वादात पराभव केला (१०१७). तेव्हा राजाने खूष होऊन जिनेश्वरसूरीस ‘खरतर’ ही पदवी बहाल केली. यावरुनच ‘खरतरगच्छा’ ची चित्रकूट येथे स्थापना झाली, असे म्हटले जाते. ह्या पंथाचा राजस्थानात विशेष प्रसार झाला. पुढे खरतरगच्छातही अनेक भेद पडले. राजस्थानमध्ये सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत खरतरगच्छाबाबतचे उल्लेख आलेले आहेत. जैसलमीरमध्ये खरतरगच्छाचा चौदाव्या शतकापासून तो एकोणिसाव्या शतकापर्यंत विशेष प्रभाव होता.

जिनविजयजी मुनींनी संपादित केलेल्या खरतरगच्छबृहद्‌गुर्वावलि (१९५६) ह्या ग्रंथात वर्धमानसूरींपासून (दहावे शतक) तो जिनपद्मसूरीपर्यंत (चौदावे शतक) होऊन गेलेल्या बारा खरतरगच्छीय जैन आचार्यांची गुरुपरंपरा व चरित्रपर माहिती दिलेली आहे [→ जिनविजयजी मुनि]. खरतरगच्छाच्या आचार्यपरंपरेत फार मोठे विद्वान व चारित्र्यसंपन्न आचार्य होऊन गेले आणि त्यांनी आपल्या प्रभावाने मारवाड, मेवाड, बागड, दिल्ली, गुजरात व सिंध येथील अनेक अनुयायी मिळविले. त्यांनी अनेक जिनमंदिरे स्थापन केली व उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीही केली. खरतरगच्छाची आचार्यपरंपरा अजूनही अखंडपणे चालू आहे. आचार्यांनी संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश भाषांतून विविध विषयांवर मौलिक ग्रंथ लिहिले.

संदर्भ : जिनविजयजी मुनी, संपा., खरतरगच्छबृहद्‌गुर्वावलि, मुंबई, १९५६.              

सुर्वे, भा.ग.