खंडे नवमी : नवरात्रातील नवव्या दिवसाला (आश्विन शुद्ध नवमीस) खंडे नवमी म्हणतात. या दिवशी लढाऊ जाती विधिपूर्वक शस्त्रपूजन करतात, तसेच विविध शिल्पकार व कारागीर आपापल्या उपकरणांचेही पूजन करतात. शस्त्रास व उपकरणास या दिवशी देव मानून पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात व राजस्थानात विशेषत्वे आढळते. ह्या दोन्हीही प्रांतांत खड्‌गपूजेस विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या दिवशी शस्त्रपूजा केल्यावर दुसऱ्या दिवशी (विजया दशमीस) सीमोल्लंघन करून मोहिमेवर निघत. निर्णयसिंधूत निरनिराळ्या शस्त्रपूजेचे मंत्र दिलेले आहेत.

करंदीकर, ना. स.