दक्ष प्रजापति: प्रजोत्पत्ती करणारा प्राचीन ऋषी. कश्यप, मरीची, अत्री, भृगू, क्रतू इ. ऋषींप्रमाणे दक्ष हाही एक प्रजापती आहे. याशिवाय त्याचा उल्लेख विश्वेदेव, आदित्य व मनू असाही केला जातो. प्रत्येक युगाचे स्वतंत्र मनू व स्वतंत्र दक्ष मानलेले आहेत.

दक्ष अदितीपासून जन्मला व अदितीचा जन्म दक्षापासून झाला असे ऋग्वेदात (१०·७२·५) म्हटले आहे. ‘या देवांच्या कथा आहेत’, असे म्हणून यास्काचार्यांनी या विरोधाचा परिहार केलेला आहे (निरुक्त  ११·२३).

दक्षाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून झाली, असे विष्णुपुराणात (१·१५) म्हटले आहे तथापि त्याच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न प्रकारच्या कथा पुराणांत आढळतात. दक्ष हा प्राचेतसाचा मुलगा असून त्याने आपल्या मनापासून सृष्टी उत्पन्न केली (भागवत  ६·४ – ६). दक्षाला अनेक मुली झाल्या आणि निरनिराळ्या देवांशी व ऋषींशी त्यांचे विवाह झाले. त्यांच्यापासून पुढे प्रजा निर्माण झाली. सत्तावीस दक्षकन्यांनी चक्राबरोबर विवाह केला. त्यांतील रोहिणीवरच तो अधिक आसक्त असल्याने, दक्षाने त्याला क्षयी होशील असा शाप दिल्याची कथा महाभारतात (शल्यपर्व ३५) आढळते.

दक्षकन्या सतीचा विवाह शिवाबरोबर झाला. ब्रह्मदेवाच्या एका यज्ञात शिवाने अपमान केला, म्हणून दक्षाने आपल्या बृहस्पतिसवनामक यज्ञात शिवाला आणि सतीला बोलावले नाही. इतर शिवगणासह सती एकटीच यज्ञमंडपात आली असताना तेथे तिचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञाग्नीत आत्महत्या केली. हे कळताच शिवाने आपल्या जटेपासून वीरभद्र व भद्रकाली यांना उत्पन्न केले आणि त्यांच्याकडून दक्षयज्ञाचा विध्वंस करून दक्षाचा वध करविला. सर्व देव आणि ऋषी शिवाला शरण गेले. शिवाच्या कृपेने ब्रह्मदेवाने एक बोकडाचे मस्तक दक्षाच्या घडास जोडले व त्यास जिवंत केले (देवीभागवत – स्कंद ७ भागवतपुराण  ४·३).

दक्ष या नावाचा एक धर्मशास्त्रकारही आहे. त्याच्या नावावर दक्षस्मृति  नावाचा ग्रंथ आढळतो. ही स्मृती फार जुनी आहे. कारण याज्ञवल्क्यानेही दक्षाचा उल्लेख केला आहे.

दक्ष या नावाचा एक प्राचीन समाज होता व त्याचे राज्य वायव्येकडील वा उत्तरेकडील देशांत होते, असे पाणिनी सांगतो. पाणिनालाही दाक्षिपुत्र असे म्हणतात.

भिडे, वि. वि.