पा र्व ती : एक हिंदू देवता. हिमालय व मेना यांची कन्या व शिवाची पत्नी म्हणून प्रसिद्ध. कालिदासाच्या कुमारसंभवात  तसेच शिवपुराणात हिचे बालपण, अप्रतिम सौंदर्य, शिवास वश करून घेण्यासाठी तिने केलेली कठोर तपश्चर्या यांची रसभरीत वर्णने आली आहेत. स्कंदपुराणात (५.१.३०) सांगितले आहे, की ती जन्मत: काळी होती पण पुढे तिने अनरकेश्वर तीर्थात स्नान करून शिवलिंगास दीपदान केल्यावर तिला गौरवर्ण प्राप्त झाला. हिलाच अंबिका, अपर्णा, उमा, गौरी, हैमवती, ईश्वरी, सर्वमंगला, दाक्षायणी, गिरिजा, भैरवी, काली, दुर्गा, कात्यायनी, चामुंडा, भवानी, आर्या इ. नावे असल्याचे अमरकोशात म्हटले आहे. ही आदिशक्तीचे सौम्य स्वरूप आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

 वायुपुराणात (१०.२७) सांगितल्याप्रमाणे ही पूर्वावतारी दक्ष व प्रसूती यांची सती नावाची कन्या होती.

उत्तर चोलकालीन (11 वे ते 13 वे शतक) पा र्व ती ब्राँझमूर्ती

शिवाशी विवाह झाल्यानंतर ही दक्षाने केलेल्या यज्ञाच्या वेळी उपस्थित होती. दक्षाने शिवाला  बोलावून त्याचा अपमान केला, असे समजून रागाच्या भरात सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वदेहदाह केला. नंतरच्या अवतारात ती हिमालयाची कन्या म्हणून प्रकट झाली व तिने पुन्हा शिवाशीच लग्न केले. तिच्या कठोर तपश्चर्येचे वर्णन कुमार संभवाच्या  पाचव्या सर्गात विस्ताराने आले आहे. काही पुराणांत तिने ‘हरितालिका’ व्रत केल्याचा उल्लेख आढळतो. पुरणांतरी अशी एक कथा आहे, की तिने एकदा खेळता खेळता शिवाचे तीन डोळे झाकले. त्यामुळे सर्वत्र अंधार पडून हाहाकार माजला.  शेवटी तिने हात काढू घेतला पण शिवाने तिला ह्या पापाचे क्षालन करण्यासाठी पुन्हा एकदा अरुणाचलम् पर्वतावर तप करण्यास सांगितले.

पार्वती व शिव यांचा अभेद दाखविला जातो. दोघांची ‘अर्धनारीश्वर’ रूपे भारतीय शिल्पांत अनेक ठिकाणी आढळून येतात. दार्शनिक दृष्ट्या पुरुषतत्त्व व प्रकृतितत्त्व यांचा अभेद या कल्पनेचे मूळ आहे. शिवाच्या नृत्यास ‘तांडव’ म्हणतात, तर पार्वतीच्या नृत्यास ‘लास्य’ म्हटले जाते. लास्य फारच सौम्य, स्त्रीसुलभ व शृंगारप्रधान असते.

स्कंद वा कार्तिकेय व गजानन हे पार्वतीचे पुत्र असून बाण व वीरभद्र यांनाही तिने आले पुत्र मानले. शिव-पार्वतीच्या आख्यानांत स्कंद-गणेशांच्या काही कथा, ते तिचे पुत्र असल्यामुळे गुंफल्या गेल्या आहेत. पार्वती हे शक्तिदेवतेचेच रूप असल्यामुळे देवी-भागवतादी पुराणांत दुर्गा, पार्वती, चंडिका हे तिचे अवतार अनेक कथांनी सार्थक व समृद्ध आहेत. मानसार, रूपमंडन व काश्यशिल्प या ग्रंथांत पार्वतीच्या मूर्ती कशा तयार कराव्यात, याबाबतचही माहिती आली आहे. तिच्या स्वतंत्र व शिवासह अशा अनेक मूर्ती असून स्वतंत्र मूर्तीस ती चतुर्भुज व शिवाजवळ असताना द्विभुज असते. पुणे येथील दक्षिणेकडील टेकडीवर पर्वती (पार्वती) चे मंदिर सोडल्यास पार्वतीची स्वतंत्र मंदिरे मात्र आढळत नाहीत.

संदर्भ : Mani, Vettam, Puranic Encyclopaedia, Delhi, 1975.

लाळे, प्र. ग.