ययाति : सोमवंशातील एक विख्यात सम्राट. हा नहुष व विरजा (वा अशोकसुंदरी) यांचा द्वितीय पुत्र आणि कौरव, पांडव, कृष्ण इत्यादींचा पूर्वज होता. प्रयागजवळील प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती. ऋग्वेदामध्ये (९·१०१·४–६) नहुषपुत्र ययाती हा एक मंत्रद्रष्टा ऋषी असून ऋग्वेदातच इतर दोन ठिकाणी यज्ञकर्ता वगैरे रूपाने त्याचा उल्लेख आहे. महाभारत व पुराणांतून त्याची विस्तृत कथा आढळते. कौरवपांडवांचा वैदिक कुलाशी संबंध जोडता यावा म्हणून वैदिक ययाती व महाभारतातील ययाती या भिन्न व्यक्तींना एकरूपत्व देण्यात आले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

यती हा थोरला भाऊ विरक्त असल्यामुळे ययातीला राज्य प्राप्त झाले. असुरगुरू ⇨शुक्राचार्यां ची कन्या देवयानी ही त्याची प्रथम पत्नी होती. क्षत्रिय ययाती व ब्राह्मण देवयानी यांचा विवाह हे प्राचीन भारतातील प्रतिलोम विवाहाचे ठळक उदाहरण होय. देवयानीची दासी बनून आलेली असुरराज वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा ही त्याची द्वितीय पत्नी होती. अश्रुबिंदुमती या त्याच्या तृतीय पत्नीचाही उल्लेख मिळतो. देवयानीपासून त्याला यदू व तुर्वसू आणि शर्मिष्ठेपासून अनू, द्रुह्यू व पूरू हे पुत्र झाले. त्याला माधवी नावाची कन्या असल्याची व वसुमनस्‌, प्रतर्दन, शिबी व अष्टक हे तिचे पुत्र असल्याची कथा आढळते. त्याचा कनिष्ठ पुत्र पूरू हा प्रतिष्ठानच्या गादीवर बसला व इतरांना वेगवेगळी राज्ये वाटून देण्यात आली. यदू व पूरू यांच्यापासून अनुक्रमे यादव व पौरव या विख्यात वंशशाखा प्रवर्तित झाल्या. यदू ते पूरू ही पाच नावे ऋग्वेदात राजांची वा जनसमूहांची नावे असून ⇨दाशराज्ञयुद्धा त सुदासाविरुद्ध लढणारांत त्यांचा अंतर्भाव होता. ऋग्वेदात त्यांचा ययातीशी संबंध नाही. वेदोत्तर काळातील ययातीने आपल्या मुलांना ही पाच वैदिक नावे दिली असावीत किंवा वेदोत्तर काळातील कथाकारांनी त्यांचा ययातीशी संबंध जोडला असावा, असे दिसते.

देवयानी व शर्मिष्ठा यांच्यातील वैर व मत्सर यांमुळे ययातीच्या जीवनात मोठा कौटुंबिक संघर्ष झाला होता. देवयानीच्या तक्रारीमुळे शुक्राचार्यांनी त्याला अकाली वार्धक्य येण्याचा शाप आणि आपल्या वार्धक्याच्या बदली पुत्राचे तारुण्य मिळू शकेल असा उःशाप दिला होता. इतर पुत्रांनी त्याचे वार्धक्य घेण्यास नकार दिला परंतु पूरूने ते घेतले. एक हजार वर्षे तारुण्याचे उपभोग घेऊनही तृप्ती न झाल्यामुळे ययातीने पूरूला तारुण्य परत दिले आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारून तेथून स्वर्गाकडे प्रस्थान केले. अहंकारामुळे त्याचे स्वर्गातून पतन झाले. तेव्हा कन्या माधवी, तिचे चार पुत्र व गालव ऋषी यांनी आपल्या पुण्याईने त्याला पुन्हा स्वर्गात पाठविले. सार्वभौम, पृथ्वी जिंकणारा, काशीपती, शेकडो यज्ञ करणारा, दानशूर, शिवभक्त, यमसभेचा सदस्य इ. प्रकारे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. उपभोगांच्या मार्गाने वासनांची तृप्ती होत नाही, हे ययातीच्या चरित्रातून प्रतीकात्मक रीत्या सूचित झाले आहे. त्याच्या चरित्रातील या वैशिष्ट्यामुळे अनेक साहित्यिकांनी त्याच्या चरित्रावर विविध कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्याच्या चरित्रावर आधारलेल्या ययाती या वि. स. खांडेकरांच्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.

साळुंखे, आ. ह.