देवदूत : मानवाहून उच्च व देवाहून नीच अशी एक अतिमानवी योनी. आपले काम करून घेण्यासाठी देवांनी उत्पन्न केलेले दूत. देवदूतांची कल्पना पुराणांत आढळते. विशेषतः मनुष्याला मृत्युलोकातून उच्च स्थानी नेणे हेच त्यांचे काम. एखादा मनुष्य शिवाचा किंवा विष्णूचा भक्त असेल, तर त्याला मृत्यूनंतर घेऊन जाण्यासाठी शिवदूत किंवा विष्णुदूत आले अशा अनेक कथा पुराणांत आढळतात. सर्वसामान्य मनुष्यास त्याच्या मृत्यूनंतर घेऊन जाण्यासाठी यमदूत येतात, अशीही कल्पना आहे. देवांचा निरोप सांगणे हेही यांचे एक काम असते. धर्मराज स्वर्गात गेला पण तेथे त्याच्या भावांपैकी कोणीच न दिसल्यामुळे त्याने तेथे राहण्याचे नाकारले. तेव्हा इंद्राने त्याच्याकडे आपला दूत पाठविला व त्याची समजूत घातली, असे महाभारतात (स्वर्गारोहणपर्व २·१४) म्हटले आहे.

देवदूताची कल्पना यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इ. प्रमुख धर्मांतही आढळते. ख्रिस्ती धर्मात देवदूताला ‘एन्जल’ असा शब्द असून त्याचा अर्थ देवाचा संदेश आणणारा असा आहे. हे देवदूत स्वर्गात राहतात. बायबलमध्ये त्यांची पुष्कळ माहिती असून त्यांचे चांगले देवदूत व वाईट देवदूत असे दोन प्रकार केले आहेत. परमेश्वराने आपल्या सेवेकरिता निर्माण केलेले शुद्ध आत्मे असेही देवदूतांचे वर्णन आढळते. परमेश्वराची सेवा न करता देवदूत जर पापाचरण करतील, तर त्यांना वाईट जन्म येतो व ते राक्षस, पिशाच अशा योनींत जन्म घेतात. चांगल्या देवदूतांचा प्रमुख गॅब्रिएल हा आहे. वाईट देवदूतांच्या प्रमुखाला सेटन असे म्हटले आहे. यावरून सैतान ही कल्पना आलेली दिसते. श्रेष्ठ देवदूतांची पूजा करण्याची पद्धती चौथ्या शतकानंतर ख्रिस्ती धर्मात रूढ झाली. ख्रिस्ती धर्मामध्ये देवदूतांच्या अनेक कथा आहेत. या कथांचा उगम यहुदी धर्मामध्ये आहे. ह्या कथाही मुळात पारशी धर्मातून आलेल्या आहेत. अहुर मज्द हा श्रेष्ठ देव असून त्याने स्पँता–मइन्यू आणि अंग्रो–मइन्यू असे दोन दूत निर्माण केले. यांपैकी स्पँता–मइन्यूने सृष्ट्युत्पत्तीच्या कामात अहुर मज्दाल मदत केली असे अवेस्तात म्हटले आहे. अहुर मज्दाला मदत करणारे सहा देवदूत होते. त्यांना ‘अमेश स्पँता’ असे म्हटले आहे. पण अंग्रो–मइन्यूने अहुर मज्दाचे नियम पाळले नाहीत. इतकेच नव्हे तर तो त्याचा विरोधक बनला. याचे साम्य सेटनशी दिसून येते.

इस्लाम धर्मातही दोन प्रकारच्या देवदूतांची कल्पना आढळते. ईश्वराने देवदूत निर्माण केला व त्यानेच कुराण  हा ग्रंथ पृथ्वीवर आणला असे कुराणातच (२६·१९८) म्हटले आहे. अल्–फाराबी (९५०) याने अरबी तत्त्वज्ञानात या देवदूताचे वर्णन ‘कार्यशक्ती’ असे केले आहे. पुष्कळशा तत्त्ववेत्त्यांनी या देवदूताचे साम्य ख्रिस्ती धर्मातील देवदूत ‘गॅब्रिएल’ याच्याशी कल्पिले आहे.

ख्रिस्ती व ज्यू धर्मांतील देवदूतांची प्राचीन चित्रे आढळतात. त्यांमध्ये त्यांना मानवी शरीरे व पंख असल्याचे दाखविले आहे.

भिडे, वि. वि.