द्रौपदी : पंचाल देशाचा राजा यज्ञसेन द्रुपद याची कन्या, पांडवांची पत्नी, प्रातःस्मरणीय पतिव्रता आणि महाभारताची नायिका. पंचाल देशाची राजकन्या म्हणून पांचाली, कृष्णवर्ण असल्याने कृष्णा. यज्ञसेनाची मुलगी म्हणून याज्ञसेनी इ. नावांनीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या पूर्वजन्मीच्या कथा पुराणांत आढळतात. देवीभागवतानुसार (स्कंध ९) रामावतारात ती मायासीता म्हणून जन्मली. सीतेला रावणाचा स्पर्श होऊ नये, म्हणून अग्नीने सीतेचे रक्षण केले व मायासीता रामाबरोबर वनात गेली. तिचे रावणाने हरण केले. रावणवधानंतर अग्नीने रामाला सीता परत दिली व मायासीतेला सोडून दिले. अग्नी व राम यांच्या आज्ञेने मायासीतेने शिवाची आराधना केली. ‘मला पती दे’ असा पाच वेळा तिने उच्चार केला. शंकराने तिला वर दिला.बपुढील जन्मी ती द्रौपदी म्हणून जन्माला आली व तिला पाच पती मिळाले.

महाभारतातील आदिपर्वात (१९७) आलेल्या कथेनुसार द्रौपदी पूर्वजन्मी मुद्‌गल ऋषींची नालायनी नावाची पत्नी होती. मूद्‌गल ऋषी म्हातारा असल्याने तिची विषयवासना पूर्ण झाली नाही. तिने शंकराची आराधना करून वर मिळविला व पुढील जन्मी तिला पाच पती मिळाले. 

द्रुपदाने एकदा द्रोणाचार्यांचा अपमान केला. द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांकडून द्रुपदाचा पराभव केला. द्रोणांना मारणारा पुत्र होण्यासाठी द्रुपदाने यज्ञ आरंभला. त्या यज्ञातून एक पुत्र बाहेर आला त्याचे नाव दृष्टद्युम्न असे ठेवण्यात आले व जी एक कृष्णवर्णा मुलगी बाहेर आली, तीच द्रौपदी होय. (महाभारत, आदिपर्व, १६७).

द्रौपदी उपवर होताच तिचे स्वयंवर मांडण्यात आले. पांडव यावेळी लाक्षागृहातून सुटून एकचक्रा गावात ब्राह्मणवेषात राहत होते. भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह करीत. स्वयंवराची वार्ता ऐकून पांडव पंचाल देशात गेले. धनुर्विद्येत निष्णात असलेल्या पराक्रमी वीरास द्रौपदी द्यावी अशा इच्छेने द्रुपदाने धनुष्य व फिरते यंत्र सिद्ध केले. ‘धनुष्यास दोरी लावून जो यंत्रातील लक्ष्याचा वेध करील अशा कुलीन वीरास द्रौपदी माळ घालील,’ असे दृष्टद्युम्नाने घोषित केले. कर्ण उठला पण तो सूतपुत्र होता. द्रौपदीने त्याला नाकारले. इतर राजांनीही निष्फळ प्रयत्न केले. शेवटी अर्जुनाने तात्काळ लक्ष्यभेद केला व द्रौपदीने त्याला माळ घातली. जिंकलेल्या द्रौपदीशी धर्मराजाने विवाह करावा असा अर्जुनाचा आग्रह होता तर अर्जुनाने पण जिंकल्यामुळे त्यानेच तिच्याशी विवाह करावा, असे धर्मराज म्हणत होता. अखेर पाचही पांडव आपल्या आईकडे गेले. ‘मोठी भिक्षा आणली आहे’ असे ते म्हणाले. त्यावर ‘तुम्ही सर्वजण वाटून घ्या’ असे अभावितपणे कुंतीने उत्तर दिले . द्रौपदीला पाहताच कुंती वरमली पण आईचे शब्द खरे करण्यासाठी पाचही जणांची ती पत्नी झाली. प्रत्येकाकडे तिने समान दिवस राहावे या काळात इतरांनी तिच्याकडे जाऊ नये जो जाईल त्याने बारा वर्षे वनवास भोगावा असे ठरले. या प्रकारच्या चुकीबद्दल पुढे अर्जुनास वनवास भोगावा लागला.

धर्मराज कौरवांबरोबरच्या द्यूतात हरला. येथून द्रौपदीचे दु:खमय जीवन सुरू झाले. तिची भरसभेतच दुःशासनाने विटंबना केली. यावेळी धृतराष्ट्राने तिला अभय दिले व वर दिला. माझ्या पतींची मुक्तता व्हावी एवढाच वर तिने मागितला, यातच तिची पतिनिष्ठा दिसून येते. धर्मराज पुन्हा द्यूतात हरला आणि पांडवांना द्रौपदीसह वनवास भोगावा लागला. द्रौपदीवर अनेक प्रकारची संकटे आली. जयद्रथाने तिच्यावर हात टाकला पण पुढे पांडवांनी जयद्रथाचे पारिपत्य केले. अज्ञातवासात असताना कीचकाने तिची अभिलाषा धरली. तेव्हा भीमाने त्याचा वध केला.

वनवासानंतर दुर्योधनाबरोबर समेट करण्यासाठी कृष्ण निघाला. द्रौपदीने कृष्णाला आपली करुण कहाणी सांगितली तसेच समेट न करण्याबाबत राजनीतीही सांगितली (महाभारत, उद्योगपर्व, ८२). कृष्णाने तिला अभयवचन दिले. युद्ध सुरू झाले. द्रौपदीची कौरवांकडून झालेली सारी विटंबना लक्षात ठेवून भीमार्जूनांनी त्या अपमानाचा सूड उगविला पण युद्धात सर्वनाश झाला. महाप्रस्थानाच्या वाटेवर द्रौपदी अगोदर कोसळली, धर्मराज म्हणाला ‘तिने अर्जुनावर नितान्त प्रेम केले म्हणून ती अगोदर स्वर्गास गेली.’

द्रौपदी एक प्रातःस्मरणीय पतिव्रता आहे, तिचे पातिव्रत्य, अपमान, छळ, अपमानाचा सूड इ. घटनांभोवती महाभारत कथा गुंफली आहे. तिची पतिनिष्ठा कधीही ढळली नाही. तिचे तेज महाभारतात प्रकटले आहे. द्रौपदीला प्रतीविंध्य, सुतसोम, श्रुतर्कीती, शतानीक व श्रुतकर्मा (श्रुतसेन) असे पाच पुत्र झाले, ते भारतीय युद्धात अश्वत्थाम्याकडून मारले गेले.

भिडे, वि. वि.