मच्छिंद्रनाथ : (सु. दहावे शतक). नाथ संप्रदायाच्या ऐतिहासिक आचार्यांमधील पहिला आचार्य आणि कौलमार्गाचा आद्य प्रवर्तक असलेला एक विलक्षण प्रभावी असा भारतीय योगी. तो मत्स्येंद्रनाथ, मच्छेन्दपाद, मच्छघ्न, मच्छन्द, भृंगपाद, अनिमिषदेव इ. नावांनीही ओळखला जातो. ⇨नाथ संप्रदायानुसार तो आदिनाथ शिवाचा शिष्य, ⇨गोरखनाथाचा गुरू व जालंधरनाथाचा गुरूबंधू होता. तो विष्णूचा, शिवाचा वा कविनारायणाचा अवतार मानला जातो. नेपाळातील बौद्ध त्याला ⇨अवलोकितेश्वर बोधिसत्त्व मानतात. त्याचे मीननाथाशी व बौद्ध सिद्ध लुईपा याच्याशी ऐक्य मानणाऱ्या परंपराही आढळतात.

हजारीप्रसाद द्विवेदींच्या मते मच्छिंद्राचा जन्म आसाममध्ये कामरूपाच्या आसपास, तर डॉ. बागचींच्या मते बंगालमध्ये झाला. एका मतानुसार तो दक्षिणेतील तुळुभाषिक तौलवी देशाचा राजा होता. त्याने मच्छिंद्रगड (जि. सांगली) येथे चैत्र वद्य पंचमीला समाधी घेतली असे मानले जाते. त्याचा नेपाळशी निकटचा संबंध होता असे दिसते. एका भृगुवंशीय ब्राह्मणाचा पुत्र म्हणून तो जन्मला परंतु गंडातरयोगावर जन्मल्यामुळे त्याला समुद्रात फेकण्यात आले तेथे शंकराने पार्वतीला सांगितलेले गूढ ज्ञान त्याने मासा बनून वा माशाच्या पोटातून ऐकले इ. दंतकथा आहेत (ज्ञानेश्वरी अ. १८). हरप्रसाद शास्त्रींच्या मते तो कैवर्त (कोळी) जातीतील होता. प्रयागचा राजा मरण पावल्यावर परकायाप्रवेशाने त्या राजाच्या राण्यांबरोबर आणि पुन्हा एकदा सिंहल देशातील राणीबरोबर त्याने संसार केला त्याच्या दोन पुत्रांनीच पुढे जैन धर्माची स्थापना केली इ. कथाही आढळतात.

शंकर वा पार्वती यांच्या शापामुळे तो आपले ज्ञान विसरला तसेच त्याला स्त्री, अपत्य, सुवर्ण इत्यादींचा मोह झाला होता व गोरखनाथाने तो दूर केला इ. कथांवरून त्याच्या जीवनात तत्त्वज्ञान व जीवनविषयक दृष्टीकोन यांबाबतीत काही स्थित्यंतरे झाली होती, असे दिसते. तो प्रारंभी योगमार्गाचा अनुयायी होता, नंतर वाममार्गी साधनेकडे वळून त्याने कौलमार्ग प्रवर्तित केला आणि गोरखनाथाने प्रबोधन केल्यानंतर तो पुन्हा नाथपंथी योगमार्गाकडे वळला, असे काही विद्वानांचे मत आहे. डॉ. बागचींच्या मते तो बौद्ध तांत्रिक होता. आपले मूळचे मत सोडून त्याने योगिनींचे प्राबल्य असलेलेजे योगिनीकौलमत स्वीकारले, ते बौद्ध तंत्राशी संबंधित नसून हिंदू शाक्त तंत्राशी संबंधित होते तसेच त्याचा स्वीकार करण्यापूर्वी तो ‘सिद्धामृत’ नावाच्या कौल (शाक्त) मताशी संबंधित असावा, असे रा. चिं. ढेरे मानतात. त्याने कौलमतावर लिहिलेले कौलज्ञाननिर्णय, अकुलवीरतंत्र, कुलानंदज्ञानकारिका हे ग्रंथ डॉ. बागची यांनी संपादित केले आहेत. मत्स्येंद्रसंहिता इ. ग्रंथ व काही स्फुट पदेही त्याच्या नावावर आढळतात.

तो सुफलतेचा देव होता असे दिसते. नेपाळात त्याचा रथ पोडे तोले या ठिकाणी आल्यावर त्या रात्री त्या परिसरातील स्त्रिया नग्न झोपतात मोठा दुष्काळ दूर करून त्याने पाऊस पाडला त्याच्या उत्सवाच्या वेळी हमखास पाऊस पडतो तो कृषिदेव असून सर्प हे त्याचे दूत आहेत नेपाळात त्याला माता म्हणून संबोधले जाते अर्धनारीनटेश्वराप्रमाणे त्याच्या ठिकाणी पुरूषत्वाबरोबरच स्त्रीत्वाचेही काही गुणधर्म मानले आहेत त्याने भस्मातून गोरखनाथाची निर्मिती केली इ. विविध समजुती व दंतकथांमधून त्याचे स्वरूप वर्णिले आहे.

भारतभर त्याच्याविषयी असलेला आदर, त्याच्याविषयीच्या दंतकथा व लोककथांची व्याप्ती, नेपाळतील त्याच्या रथजत्रांची भव्यता, नेपाळची रक्षकदेवता म्हणून त्याचे असलेले माहात्म्य, नेपाळातील एका जातीचे ‘मत्स्येंद्री’ हे नाव, कृष्णाकाठच्या शाळूचे ‘मच्छिंदरी शाळू’ हे नाव इत्यादींवरून भारतीय जनमानसात त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट होते.

संदर्भ : १. ढेरे, रा. चिं. श्रीगुरू गोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, मुंबई, १९५९.

           २. द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, वाराणसी, १९६६.

           ३. वागची, प्रबोध चंद्र, संपा. कौलज्ञाननिर्णय, कलकत्ता, १९३४.

साळुंखे, आ. ह.