विपश्यना : ‘विपश्यना’ म्हणजे विशेष प्रकारची पश्यना किंवा दृष्टी. हा शब्द केवळ बौद्ध संकरित (बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत) संस्कृत साहित्यातच आढळतो. शुद्ध संस्कृतात हा शब्द ‘विदर्शना’ असा होईल. ‘विपश्यना’ हे उघडउघड पालीतील ‘विसस्सना’ ह्या शब्दाचे अयुक्त-संस्कृतीकरण आहे.

विपश्यना ही तत्त्ववेत्त्याची भेदक दृष्टी आहे. तिच्यामुळे वस्तूंचे यथाभूत ज्ञान होते. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार सर्व विश्व हे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान ह्या पाच स्कंधांचा समुदाय असून हे पाचही स्कंध अनित्य आहेत अनित्य असल्यामुळे दुःखरूप आहेत व दुःखरूप असल्यामुळे अनात्म आहेत (यदनिच्चं तं. दुक्खं, यं दुक्खं तदनत्ता, यदनत्ता तं नेतं मम, नेसोऽहमस्मि, न मेसो अत्तांl संयुक्तनिकाय खन्धसंयुक्त, बग्ग २, सुत्त ४). विश्वातील विविध भाववस्तूंचे वरवरचे ज्ञान करून न घेता, त्या वस्तूंचा विपश्यनेने म्हणजे प्रज्ञेने वेध घेऊन त्या सर्वांमधील अनित्यता, दुःखरूपता व अनात्मता ह्यांचे दर्शन घेणे म्हणजे विपश्यना. पालीमधील बौद्ध तत्त्वज्ञानविषयक साहित्यात ‘वि-पस्सना’ ह्यया शब्दाऐवजी ‘अनु-पस्सना’ असाही शब्द येतो. उपसर्ग भिन्न असला, तरी अर्थ तोच आहे. बुद्धघोषांनी त्यांच्या विसुद्धिमग्ग (विशुद्धिमार्ग) ह्या ग्रंथाच्या बाविसाच्या परिच्छेदात विपस्सना ह्या शब्दाऐवजी ‘अनुपस्सना’ असा शब्द वापरला जातो.

विपश्यना ही भाववस्तूंच्या भेदून अन्तस्तत्त्वांचा वेध घेते. त्यामुळे विपश्यना ही ‘वायुरूपा’ (वायूप्रमाणे कोठेही शिरकाव करणारी) आहे, असे म्हटले जाते (ललितविस्तर ४११.११). ह्या भेदक तत्त्वदृष्टीच्या लाभामुळे साधक हा सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळ्या तात्त्विक अंगांनी वस्तूचे दर्शन घेऊ शकतो. चार महाभूतांनी बनलेले वेगळ्या तात्त्वि अंगांनी वस्तूचे दर्शन घेऊ शकतो. चार महाभूतांनी बनलेले जड विश्व किंवा ‘रूपस्कन्ध’ हा ‘रिक्त आहे तुच्छ आहे शून्य, अनात्म, असार आहे हे तो पाहतो’ अशा शब्दांत विपशयतेचे स्वरूप सांगण्यात येते.

निर्वाण ह्या अंतिम ध्येयाच्या साधनेत शमथ (सर्व प्रकारच्या विकारांचे शमन) ह्या उपायाबरोबरच विपश्यनेचेही महत्त्व हीनयान व महायान ह्या दोन्ही बौद्ध संप्रदायांत सातत्तयाने सांगितले गेले आहे. शमथ व विपश्यना ह्या दोन तत्त्वोपायांना ‘युगनद्ध’ म्हणून संबोधिले जाते. ‘युग’म्हणजे बैलगाडीचे जू. ह्या जुंवाला बैलांची जोडी जुंपावी त्याप्रमाणे योगसाधनेत ह्या दोन उपायांना युक्त करावेल लागते (जोडावे लागते). दोन बैलांची गाडी असते, त्याप्रमाणे एका बैलाचा छकडाही असतो. शमथावरच प्रामुख्याने विसंबणाऱ्या साधकाला ‘शमथयानिक’ म्हणतात, तर शमथाचा ओलावा नसलेल्या, शुष्क अशा प्रज्ञेचीच कास धरणाऱ्या साधकाला ‘शुष्क विपश्यक’ (पाली ‘सुक्खविपस्सक’) किंवा ‘विपश्यनायनिक’ म्हणतात.

विपश्यनेच्या परंपरेचे विख्यात आचार्य सयाजी ऊ बा खिन ह्यांनी सत्यनारायण गोयंका ह्यांच्याकडे भारतातील लोकांना विपश्यना शिकवण्यासाठी आचार्यपद सोपविले  (१९६९). सत्यनारायण गोयंका ह्यांनी भारतात विपश्यनेच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले. त्यांनी आणि त्यांच्या सहायक आचार्यांनी सेवावृत्तीने भारतात व अन्य देशांत विपश्यनेच्या प्रात्यक्षिकांसाठी शिबिरे घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ऐंशीहून अधिक देशांतील लोकांना विपश्यनेच्या साधनेचा लाभ मिळू लागला आहे. विपश्यनेसाठी एकांतस्थळे उपलब्ध करण्याच्या हेतूने भारतात इगतपुरी, हैदराबाद, जयपूर अशा काही ठिकाणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जगभरातील विपश्यना-केंद्रातील एक प्रमुख केंद्र महाराष्ट्रातच इगतपुरी येथे असून धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, पुणे येथेही विपश्यना-केंद्रे आहेत. ह्या साधनेच्या अभ्यासासाठी जगभर (उदा., नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, जपान, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, न्यूझीलंड, अमेरिका) ५० केंद्रे स्थापन झाली आहेत.

विपश्यनेची साधना शिकविण्यासाठी घेण्यात येणारी शिबिरे साधारणतः दहा दिवसांची असतात. त्याचप्रमाणे साधनेत पुढे गेलेल्या साधकांसाठी खास शिबिरे असतात. वीस, तीस वा पंचेचाळीस दिवस अशा दीर्घ मुदतींची शिबिरेही असतात. भारतात लहान मुलांसाठी एक, दोन वा तीन दिवसांची शिबिरेही असतात. सर्व शिबिरांचे संचालन स्वेच्छेने दिलेल्या दानांतून होते. जात, धर्म, राष्ट्रीयत्व इत्यादींचे अडथळे येऊ न देता कोणालाही शिबिरात प्रवेश दिला जातो.

शिबिराच्या कालावधीत शिबिरस्थानीय राहून बाह्य जगाशी संपर्क तोडावयाचा असतो. जीव-हिंसा, चोरी करणे, खोटे बोलणे, अब्रह्यचर्य व अमली पदार्थांचे सेवन ह्या पाच गोष्टींपासून साधकाने अलिप्त राहावयाचे असते. ह्या अलिप्ततेचे पालन म्हणजेच पाच शीलांचे पालप. लेखन-वाचन न करण्याचे बंधन असते. मौनाचेही पालन करावे लागते. अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सुप्तावस्थेत दडून राहिलेल्या विकारांना आणि वासनांना नाहिसे करून मनाला निर्मळ करावयाचे असते. 

संदर्भ : Kern. H. Manual of Indian Buddhism, Strassburg, १८९६. 

धडफळे, मो. गो.