पांडव : हस्तिनापूरच्या पांडू राजाचे पाच पुत्र व महाभारताचे नायक. सोमवंशातील शंतनूपासून सत्यवतीला विचित्रवीर्य नावाचा पुत्र झाला. तो निपुत्रिक वारल्यानंतर त्याची पत्नी अंबालिका हिला व्यासांपासून नियोगाद्वारे झालेला पुत्र म्हणजे पांडू होय. निपुत्रिक पांडूस ‘स्त्रीसंग केल्यास मृत्यू घडेल’, असा एका ऋषीने शाप दिला होता. तेव्हा पुत्राशिवाय स्वर्गप्राप्ती नाही, म्हणून त्याने आपल्या पत्नी कुंती व माद्री ह्यांना नियोगाद्वारे पुत्रोत्पत्ती करण्याची आज्ञा दिली. दुर्वास ऋषींनी कुंतीला बालपणी दिलेल्या मंत्रांच्या सामर्थ्याने यमापासून ⇨ धर्मराज (युधिष्ठिर), वायूपासून ⇨ भीम व इंद्रापासून ⇨ अर्जुन  हे पुत्र झाले. एक मंत्र तिने आपल्या माद्री या सवतीला दिला आणि तिला अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र झाले. हेच पाच पांडव होत. दुर्योधनादी धृतराष्ट्रपुत्रांना ⇨कौरव  म्हटले जात असले, तरी पांडव हेदेखील कौरव या आपल्या चुलतभावांप्रमाणे कुरुवंशातीलच असल्यामुळे तेही कौरवच ठरतात. त्यांना ‘भारत’, ‘कौंतेय’, ‘पार्थ’ असेही म्हटले जाई. त्यांचा जन्म नियोगाने मानवांपासूनच झालेला असला पाहिजे परंतु ते देवांचे अंश होते हे सांगून त्यांच्या जन्माचे उदात्तीकरण केलेले दिसते. अशा रीतीने आपापल्या वीरांच्या व प्रेषितांच्या जन्माचे उदात्तीकरण करण्याची पद्धत जगातील सर्व धर्मांत व राष्ट्रांत आढळते. या संदर्भात एक सूचक गोष्ट ध्यानात घेता येते. महाभारताच्या अादिपर्वात जेथे ही नियोगाची हकीकत आली आहे तेथे प्रारंभी सांगितले आहे, की पांडूने कुंतीला ब्राह्मणाकडून नियोगविधीने पुत्र प्राप्ती करून घेण्याचा सल्ला दिला.

ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर याला धर्मपुत्र व धर्मराज मानून महाभारतकारांनी पांडवांना धर्माचे व नीतिमूल्यांचे प्रतीक बनविले. त्यांचे जीवन अनेक संकटांनी व संघर्षांनी भरलेले होते परंतु शेवटी ते विजयी झाले, यावरून न्याय्य पक्षाचाच विजय होतो, हा संदेश देण्यात आला आहे. त्यांच्या ठायी धर्मनिष्ठता, आज्ञाधारकता, सहनशीलता इ. सद्गुण होते परंतु भीष्मद्रोणादींचा वध करताना त्यांनी कृष्णाच्या सल्ल्याने व जशास तसे या न्यायाने कपटनीतीचा अवलंब केला होता. त्यामुळेच मूळ महाभारतात कौरवांची बाजू न्याय्य असल्याचे दाखवून शेवटी त्यांचाच विजय दाखविला होता, असे एक मत मांडण्यात आले आहे. अर्थात, ते फारसे मान्य झालेले नाही. पांडवांनी अनेक वेळा चुकाही केल्या परंतु त्या मानवसुलभ अशाच वाटतात. महाप्रयाणाच्या वेळी धर्माखेरीज बाकीचे पांडव त्यांच्या काही दोषांमुळे वाटेतच मरण पावले, यावरूनही त्यांचे मानवी स्वरूप सूचित झाले आहे. त्यांच्या पराक्रमाला कृष्णाचे समर्थ मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते यशस्वी झाले परंतु त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला मर्यादाही पडल्या. 

कौरवांनी पांडवांचा राज्यावरचा हक्क नाकारला, याला कौरवांच्या दुष्टपणाबरोबरच पांडवांचा नियोगाद्वारे राजधानीपासून दूर अरण्यात झालेला जन्म, हेही एक कारण असावे.पांडवांच्या सर्व बाबतींतील श्रेष्ठतेमुळेही कौरवांच्या मनात मत्सर निर्माण झाला होता. धृतराष्ट्राच्या अंधत्वामुळे पांडूला राज्य मिळाले आणि पांडूनंतरही युधिष्ठिराला यौवराज्याचा अभिषेक झाला, हे पाहून धृतराष्ट्र व कौरव यांना पांडवांविषयी शत्रुत्व वाटू लागले. कौरवांबरोबरचा संघर्ष टाळण्यासाठी पांडव हस्तिनापूरचे राज्य सोडून इंद्रप्रस्थाला राहावयास गेले परंतु कौरवांनी त्यांना तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष पेटत गेला. त्यातून निर्माण झालेले युद्ध हा महाभारताचा मुख्य विषय होय. युद्धानंतर पांडवांनी ३६ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले, असे म्हटले जाते. त्यांचे राज्य द्वापर व कली या युगांच्या संधिकालात झाले असल्यामुळे सांस्कृतिक व सामाजिक स्थित्यंतरांच्या दृष्टीने त्याचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

द्रौपदीशी झालेला पांडवांचा विवाह तत्कालीन बहुपतित्वाची चाल सूचित करतो की नाही, याविषयी अभ्यासकांत मतभेद आहेत परंतु ती पाचही जणांची पत्नी झाल्यामुळे त्यांचे ऐक्य अभंग राहिले व दुर्योधन माद्रीपुत्रांना कुंतीपुत्रांपासून अलग करू शकला नाही. शारीरिक सामर्थ्य व सदाचरणाचे बळ यांबरोबरच ऐक्य हीदेखील पांडवांची एक मोठी शक्ती होती आणि द्रौपदी हा त्या ऐक्याचा एक महत्त्वाचा दुवा होता परंतु पांडवांना द्रौपदीकडून पुढे सर्वनाशाला कारणीभूत झालेल्या युद्धाची सतत प्रेरणा मिळाली, असेही दिसते.  

पांडवांना पुरुरवा, ययाती, पूरू, दुष्यंत, भारत, कुरू, शंतनू इ. श्रेष्ठ पूर्वजांची परंपरा लाभली होती. युद्ध व नंतरचे हत्याकांड यांतून ते स्वतः वाचले परंतु त्यांचे सर्व पुत्र मारले गेले. अर्जुनाचा नातू परीक्षित पुढे राज्याचा वारसा बनला. परीक्षिताचा पुत्र जनमेजय हाही प्रसिद्ध राजा होता परंतु दीर्घ काळ राज्य केल्यानंतर पांडवांच्या वंशजांचे राज्य नाहीसे होऊन गौतम बुद्धाच्या काळात त्यांचे वंशज पर्वतप्रदेशातील एक जमात म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वतःला पांडवांचे वंशज मानणाऱ्या ‘तुआर’ या राजपूत जमातीच्या लोकांनी इसवी सनाच्या आठव्या शतकात अनंगपालाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे पुन्हा राज्य स्थापन केले. तेराव्या शतकापर्यंत ते एक अत्यंत महत्त्वाचे राजघराणे होते. परंतु पृथ्वीराज चौहानाचा (तुआरांचा नातेवाईक)कुरुक्षेत्रावरच शहाबुद्दीन घोरीकडून पराभव झाल्यानंतर त्याने चंबळेच्या काठी आश्रय घेतला.

पांडव हे ऐतिहासिक पुरुष नव्हते, सद्गुणांचे आदर्श म्हणून निर्मिलेली ती कविकल्पित पात्रे होती, असे एक मत आहे. पांडव हे ऐतिहासिक पुरुष होते, हे अनेक पुराव्यांनिशी सिद्ध करण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला आहे. कौरव व पांडव हे भिन्नवंशी लोक होते, एकमेकांच्या शेजारी राहून परस्परांशी संघर्ष करणाऱ्या त्या दोन स्वतंत्र जमाती होत्या, पांडव हे कौरवांचे चुलतभाऊ असल्याची कल्पना नंतरच्या भाटांनी मांडली असावी इ. मते आढळतात. बहुपतित्व, नियोगस्वीकार, भीमाची रक्त पिण्याची कृती इत्यादींवरून पांडव हे बहुधा मंगोलियन, सिथियन किंवा भारतातील आर्येतर अशा मूळच्या देशी वंशातील असावेत, असे एक मत मांडण्यात आले आहे. 

भीष्म, व्यास, विदुर इ. तत्कालीन सज्जनांना पांडवांविषयी सहानुभूती वाटत होती आणि उत्तरकालीन भारतीयांनाही शतकानुशतके त्यांच्याविषयी आदर वाटत आलेला आहे. वनवासकाळातील तीर्थयात्रा व अश्वमेधादी कारणांनी त्यांनी देशभर प्रवास केला असल्यामुळे त्यांच्या वास्तव्याने माहात्म्य पावलेली अनेक स्थाने देशात आहेत. बलिप्रतिपदेच्या दिवशी शेणाचे पांडव करून त्यांची पूजा करण्याची प्रथा अजूनही आहे. कार्तिक शुद्ध पंचमीला पांडव वनवासाला गेल्यामुळे तो दिवस ‘पांडव पंचमी’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. ललित साहित्य, लोककथा व लोकगीते, इतर कला इत्यादींमध्ये पांडवांच्या चरित्राचे अजूनही दर्शन घडते. एकंदरीत भारताच्या सांस्कृतिक जीवनात पांडवांना महत्त्वाचे स्थान आहे.

साळुंखे, आ. ह.