चातुर्मास्य : आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत जे चार महिने होतात, त्यांना चातुर्मास्य म्हणतात. चातुर्मास्याच्या आरंभी येणाऱ्या एकादशीस शयनी आणि शेवटी येणाऱ्या एकादशीस बोधिनी वा प्रबोधिनी म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र व उत्तरायण हा त्यांचा दिवस. देव चातुर्मास्यात (दक्षिणायन) शयन करतात. या काळात असुरांपासून रक्षण व्हावे म्हणून धर्मशास्त्रात अनेक व्रते सांगितली आहेत. एकही व्रत न करणाऱ्यास संवत्सरोद्‌भव असे पाप लागते.

चातुर्मास्यात व्रतस्थ रहावे असे महाभारतात सांगितले आहे. भाविक लोक या दिवसांत धार्मिक ग्रंथांचे वाचन, श्रवण, मनन इ. करतात तसेच विविध व्रते आचरतात व बंधने पाळतात. ही बंधने मुख्यत्वे आहारविहारविषयक आहेत. या काळात वैश्वदेव केल्याशिवाय व विष्णूस नैवेद्य दाखविल्याशिवाय अन्नग्रहण करू नये, असे म्हटले आहे. चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत, ते आरोग्याच्या दृष्टीने. या काळात विषयोपभोग घेऊ नये. आत्मोन्नतीसाठी व्रतस्थ, सदाचरणी, संयमी व स्वार्थत्यागी राहून परमेश्वरकृपा संपादावी, असे सांगितले आहे.

या काळात स्त्रिया विविध व्रते आचरतात. अनेक स्त्रिया धरणेपारणे नावाचे म्हणजे एक दिवस उपवास व एक दिवस भोजन असे व्रत पाळतात. तुलसीपूजा, ईशभक्ती, एकभुक्त राहणे, संयम इ. त्या निष्ठेने पाळतात.

‘चातुर्मास्ययाग’ नावाचा एक याग असून ‘चातुर्मास्यव्रत’ नावाचे एक व्रतही आहे. सर्व वर्णांतील स्रीपुरुषांना तसेच वैष्णवांप्रमाणेच शैवांनाही हे व्रत विहित म्हणून सांगितले आहे.

संदर्भ : जोशी, का. अ. संपूर्ण चातुर्मास, पुणे, १९६५

करंदीकर, ना. स