चर्च : ख्रिस्ती लोकांचे उपासनामंदिर ‘चर्च’ म्हणून ओळखले जाते. बायबलचे ‘जुना करार’ व ‘नवा करार’ असे दोन भाग आहेत. येहोवा आणि ज्यू लोक यांच्यातील करारानुसार येहोवा हा ज्यूंचा एकमेव देव आहे. म्हणून ज्यू हे ‘देवाचे लोक’ होत. त्यांस हिब्रूमध्ये ‘काहाल’ म्हणजे लोकसमुदाय व ग्रीकमध्ये ‘एक्लेसिआ’ असे संबोधण्यात आले, परंतु ‘नव्या करारा’त येशू ख्रिस्त हाच सर्व सत्ताधिकारी असून पापांची क्षमा करणारा आहे, ह्या विश्वासाने नियमितपणे उपासना आणि भक्ती करणाऱ्या जनसमूहासच ‘एक्लेसिआ’ हा शब्द वापरण्यात आला. अशा अर्थाने ख्रिस्ताच्या अनुयायांनाही ‘देवाचे लोक’ ही संज्ञा प्राप्त झाली. ग्रीकमधील Kyriakon (म्हणजे देवाचे घर) पासून अँग्लो-सॅक्सनमध्ये circe आणि जुन्या इंग्लिशमध्ये chirche हे शब्द आले. त्यातच ‘चर्च’ ह्या शब्दाचा उगम आहे. स्कॉटलंडमध्ये चर्चला kirk हा शब्द वापरतात. मराठीत चर्चला ‘मंडळी’ असे संबोधिले आहे. सुरुवातीच्या काळात अनेक कुटुंबे व व्यक्ती एकत्र येऊन एखाद्या घरात उपासना करीत असत. चर्च म्हणजे एखादी ठराविक वास्तू, असा उल्लेख ‘नव्या करारा’त आढळून येत नाही. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबरच उपासनेसाठी स्वतंत्र चर्चची स्थापना झाली अणि चर्चचे चर्चेस असे अनेकवचनही प्रचारात आले.

प्रॉटेस्टंट परंपरेप्रमाणे दृश्य व अदृश्य अशी चर्चची दोन अंगे आहेत. एकत्रित व नियमितपणे भरणारे ते ‘दृश्य’ चर्च आणि व्यक्ती म्हणून कोठेही ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारांचे ‘अदृश्य’ चर्च होय. ख्रिस्ती उपासना ही ज्यू धर्मीयांच्या सिनेगॉगमधील उपासनेवर आधारलेली आहे. प्रवचन, पवित्र शास्त्राचे वाचन, प्रार्थना, उपासना संगीत, प्रभु भोजनाचा विधी, बाप्तिस्मा, विवाहविधी, अंत्यसंस्कार इत्यादींसाठी चर्चचा वापर केला जातो. साप्ताहिक व विशेष प्रार्थना चर्चमध्येच होतात. धर्मगुरू ह्या उपासनेचे, प्रार्थनेचे व प्रवचनाचे ठराविक पद्धतीने व भक्तगणांच्या सहकार्याने मार्गदर्शन व नियंत्रण करतो. शेवटी धर्मगुरू आशीर्वाद देऊन ह्या कार्यक्रमांची समाप्ती करतो. ख्रिस्ती सणांच्या वेळी व विशेष उत्सवादी प्रसंगी चर्चमध्ये अंतर्बाह्य सजावट व रोषणाई करतात.

आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला

चर्चवास्तू : इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत ख्रिस्ती धर्माला राजाश्रय नसल्यामुळे प्राचीन रोमन इमारतींचा चर्च म्हणून त्या काळी उपयोग होई. कालांतराने रोमन ‘बॅसिलिका’ म्हणजे न्यायालये आणि व्यापारी केंद्रे यांसारख्या सार्वजनिक वास्तूंच्या धर्तीवर चर्चची रचना होऊ लागली. अशा चर्चमध्ये मध्यभागी एक विस्तृत सभागृह असे. त्यात वेदी असून तेथून समारंभाचे पौरोहित्य केले जाई. सभागृहाच्या बाहेर मोठा खुला चौक असे. त्याच्या मध्यभागी जलकुंड असे. त्याचा हेतू हा, की भाविकांनी हस्तपादमुखप्रक्षालन करावे. याच तऱ्हेच्या रचनेवरून नंतर ग्रीक क्रॉस व लॅटिन क्रॉस अशा तऱ्हेचे चर्चचे दोन प्रकार निर्माण झाले. पूर्वेकडील प्रदेशात ग्रीक क्रॉस व पश्चिम यूरोपात लॅटिन क्रॉस रूढ झाला. ग्रीक क्रॉस पद्धतीत चर्चचा आकार रेडक्रॉसच्या आकारासारखा असतो, तर लॅटिन क्रॉसचा आकार ख्रिस्ताच्या क्रॉससारखा असतो. इस्तंबूलमधील सेंट सोफियाची वास्तू आणि व्हेनिसमधील सेंट मार्कचे चर्च ही ग्रीक क्रॉस पद्धतीची प्रमुख उदाहरणे होत. रोममधील सेंट पीटर्स व लंडनमधील सेंट पॉल ही लॅटिन क्रॉसची उदाहरणे होत.

बायझंटिन चर्च ग्रीक क्रॉस पद्धतीचे असून त्याच्या मध्यभागी व इतरत्र लहानमोठ्या आकारांचे घुमट असत. विशिष्ट हवामान व मध्यपूर्वेकडील वास्तुकल्पना ही त्याची दोन प्रमुख कारणे असावीत. या चर्चवास्तू बाहेरून साध्या परंतु आतून अत्यंत कलापूर्ण असत. त्यांच्या भिंतीवर तसेच छतावर रंगीत काचेच्या तुकड्यांनी बायबलमधील प्रसंग चित्रित केलेले असत. रोमनस्क आणि गॉथिक चर्च लॅटिन क्रॉस पद्धतीची असून त्यांत भव्यपणापेक्षाही उत्तुंगतेवर अधिक भर असे. या चर्चमध्ये सुरेख कोरीव काम केलेले आढळते, तसेच खिडक्यांच्या रंगीबेरंगी चित्रकाचांवर बायबलमधील प्रसंग चित्रित केलेले आढळतात. इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर ॲबे, इटलीमधील मिलान चर्च इ. या प्रकारची प्रमुख उदाहरणे होत. प्रबोधनकालीन चर्च प्रायः लॅटिन क्रॉस पद्धतीचे असले, तरी त्याची रचना गॉथिक चर्चपेक्षा बरीच वेगळी होती. त्यात मध्यवर्ती घुमटावर विशेष भर असे. घुमटाच्या आतल्या अंगावर बायबलमधील प्रसंग चित्रित केलेले असत. अशा प्रकारच्या चर्चमध्ये रोममधील मायकेलअँजेलोने बांधलेले सेंट पीटर्स व लंडनमधील सर क्रिस्टोफर रेन या विख्यात वास्तुशिल्पज्ञाने सतराव्या शतकात बांधलेले सेंट पॉलचे चर्च ही उल्लेखनीय आहेत.

आधुनिक काळात चर्चच्या रचनेत बराच फरक झाला आहे. फ्रान्समधील राँशॅं येथील ल कॉर्ब्यूझ्ये याने बांधलेले लहानसे चर्च व ब्राझिलिया येथे ओस्कार नीमाइअर याने बांधलेले चर्च ही दोन्हीही अद्यावत पद्धतीची असून ती सर्व बाबतींत परंपरागत चर्चवास्तूपेक्षा वेगळी आहेत.

देवभक्त, मा.ग.