सार्वजनिक सभास्थान : (फोरम).जनसमुदायाने एकत्र जमण्यासाठी नगराच्या साधारण मध्यवर्ती योजिलेली बहुउद्देशीय खुली जागा वा चौक. प्राचीन काळी रोमन नगरांमध्ये असे खुले चौक असत व त्या ‘फोरम रोमानम’, इ. स. पू. सातवे ते इ. स. सहावे शतकचौकांच्या सभोवती सार्वजनिक वास्तू, स्तंभावली इ. असत. सभासंमेलने, चर्चा, महोत्सव इ.कारणांनी जनसमुदायाने एकत्र जमण्याची ही जागा होती. ‘फोरम’ ही लॅटिन संज्ञा असून तिचा मूळ अर्थ मोकळी जागा असा होतो. कालांतराने चर्चापीठ, सभाचौक तसेच सार्वजनिक उपक्रमांसाठी विशेषतः न्यायदानासाठी लोकांनी एकत्र जमण्याची जागा, असे नानाविध अर्थ या संज्ञेला प्राप्त झाले. बाजारपेठा व अनेक प्रकारच्या व्यापारी उलाढाली फोरमशी निगडित होत्या. विशिष्ट उद्दिष्टांनी वापरल्या जाणाऱ्या फोरमला भिन्नभिन्न नावे होती. उदा., ‘फोरमबोअरियम’ (गुरांचा बाजार), ‘फोरम पिस्कॅटोरियम’ (मासळी बाजार), ‘फोरम होलिटोरियम’ (भाजी मंडई) इत्यादी.

सामान्य जनतेला आनंदोत्सव, विजयवार्ता, निवडणुका, राजकीय-धार्मिक वा आर्थिक स्वरूपाच्या चर्चा, सभा, तसेच संकटे वा राष्ट्रीय आपत्ती ओढविल्यास त्यांची सूचना देण्यासाठी एकत्र जमण्याचे स्थळ, अशा बहुविध उद्दिष्टांनी लोकांना एकत्र जमविण्यासाठी उघड्या किंवा सभोवती बंदिस्त अशा सार्वजनिक जागा वा चौक नगरांमध्ये योजिण्याची प्रथा प्राचीन समाजात पूर्वापार चालत आली होती. पौर्वात्य देशांत अशा सार्वजनिक सभास्थानांची प्रथा फारशी आढळत नाही तथापि लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या प्राचीन ग्रीकांनी प्रथमतः त्यांच्या सार्वजनिक बाजारपेठांतील चौकांचा उपयोग सभास्थानासारखा केला. जनतेला एकत्र येण्यासाठी योजिलेल्या ग्रीक नगरांतील अशा (सार्वजनिक) जागांना ‘ॲगोरा’ ही संज्ञा होती. ॲगोराचा वापर बाजार, मंदिरे, न्यायालये, संसदगृह अशा बहुविध उद्दिष्टांनी केला जात असे. ह्याच्या मैदानाच्या सभोवती ‘स्टोआ’ (छप्परयुक्त स्तंभावली किंवा ओवऱ्या वा ढेलज) लोकांचे उन्हापावसापासून संरक्षण करण्यासाठी योजिले जात. प्रीएन या ग्रीक नगरातील इ. स. पू. ३०० मधील ॲगोरा हे याचे उत्तम उदाहरण होय. इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून ते रोमन साम्राज्याच्या स्थापनेपर्यंत या जागांची मांडणी फारशी सुबक नसे पण रोमन काळात त्यांना जास्त सुविहित व रेखीव स्वरूप देण्यात आले. ग्रीक ॲगोराचे विकसित व योजनाबद्घ रूप रोमन फोरममध्ये पहावयास मिळते. प्राचीन रोमन सार्वजनिक जीवनाचे अविभाज्य अंग म्हणजे फोरम वा सार्वजनिक सभास्थान होय. रोमन फोरमचा आकार साधारणतः लंबचौरसाकृती असून त्याच्या तीन बाजूंना स्तंभावल्या व चौथ्या बाजूला नगर-सभागृह असे. सोळाव्या शतकात इटलीमध्ये काही शहरांत ‘प्लाझा’ नामक सार्वजनिक सभांच्या जागा बांधण्यात आल्या. ह्या मोकळ्या जागांभोवती इमारती असत. हे प्लाझा चौरस वा लंबचौरस आकाराचेच असत असे नव्हे. बेर्नीनीने रोम येथे बांधलेला ‘प्लाझा दी सान प्येत्रे’ (१६३९–६७) हा जगातला सर्वोत्कृष्ट प्लाझा लंबगोलाकार होता. व्हेनिस, फ्लॉरेन्स, रोम येथील प्लाझांची जमीन दगडी लाद्यांची सुनियोजित, सुबक रचना करून शोभिवंत व आकर्षक बनविली जाई. इटालियन प्लाझाचा वापरही अनेक उद्दिष्टांनी जनसमुदाय एकत्र जमविण्यासाठी होत असे. फ्रेंच सार्वजनिक सभास्थानांना ‘प्लेस’ अशी संज्ञा होती. अनेक राजे-महाराजांनी अशा जागा अठराव्या शतकात निर्माण केल्या. सममित (सिमेट्रिकल) किंवा प्रतिसम मांडणी करून वास्तूला डौलदार आकार आणला जाई. या जागांभोवती कार्यालये, राजवाडे, खास प्रतिष्ठित व्यक्तींची घरे, चर्च-वास्तू अशा अनेक वास्तूंचा समुच्चय असे. या सर्व सभास्थानांचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सभोवतालच्या अनेक वास्तूंचा परस्परांशी जुळून आलेला अत्यंत सुयोग्य विरोधाभासात्मक मेळ होय. सममित मांडणी न करता एखाद्या उंच अशा मनोऱ्याभोवती विविध उर्ध्वछंदाच्या वास्तू योजिण्यात येत. ही मांडणी इतकी आकर्षक व प्रभावी ठरली, की आधुनिक काळातही तिचा पुनश्च वापर होऊ लागला.

काही वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक सभास्थानांची उदाहरणे पुढे दिली आहेत: सर्वांत प्राचीन व ख्यातनाम सभास्थान म्हणजे ‘फोरम रोमानम’ किंवा ‘रोमन फोरम’. मुळात हा दलदलीचा पाणथळ प्रदेश होता पण इ. स. पू. सातव्या शतकात त्या ठिकाणी काही ओबडधोबड झोपड्या उभारण्यात आल्या. पुढे इ. स. पू. ५७५ च्या सुमारास इट्रुस्कन राजांनी हा पाणथळ भाग सुकवून त्या जागी दगडगोट्यांच्या फरश्या घातल्या. कालांतराने त्याचा वापर फोरम म्हणून होऊ लागला. हे सभास्थान चौरसाकार होते व त्याच्या सभोवती क्रीडागारे, मंदिरे, कमानी, पुतळे यांची योजना होती. स्तंभावली, विजयकमानी, विजयस्तंभ ह्यांनी ह्या स्थानाला अपूर्व शोभा प्राप्त झाली होती. हा रोमन साम्राज्याचा केंद्रबिंदूच होता. रोमच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा तो साक्षीदार होता. येथील भग्नावशेषांमध्ये ‘क्युरीआ’ (सिनेट गृह), टायटस व सव्हिरस यांच्या विजयकमानी, टेंपल ऑफ सॅटर्न तसेच बॅसिलिका ज्यूलिया हे विधानसभागृह इत्यादींचा समावेश होतो. पुढे साम्राज्यविस्ताराबरोबर अनेक राजांनी आपल्या नावांचे फोरम वा चौक बांधले. त्यांपैकी ऑगस्टस, ज्युलिअस सीझर, नर्व्ह, ट्रेजन व व्हेस्पेझ्यन या रोमन सम्राटांचे फोरम भग्नावस्थेत अद्यापही अवशिष्ट रूपात टिकून आहेत. त्यांपैकी ‘ट्रेजनचा फोरम’ हा वास्तुकलादृष्ट्या सर्वोत्कृष्ट, भव्य व विस्तीर्ण सभाचौक होता. तो इ. स. सु. ११२ मध्ये बांधण्यात आला. त्याचा वास्तुकल्प दमास्कसचा अपोलोडोरस या वास्तुकाराने तयार केला होता. ‘ट्रेजनचा फोरम’ हा साधारणपणे ९२० × ६२० फुट (सु. २८० × १९० मी.) लांबीरुंदीच्या आकारमानाचा असून त्याने व्यापलेले क्षेत्र सु. २५ एकर (सु. १० हेक्टर) होते. बाजारपेठ, बॅसिलिका, विजयकमानी, विजयस्तंभ, ग्रंथालय इ. भोवतीच्या वास्तू कलादृष्ट्या अप्रतिम होत्या. ‘बॅसिलिका ज्यूलिया’, ‘ टेंपल ऑफ ट्रेजन’ इ. वास्तू अद्यापही भग्नावस्थेत आढळतात परंतु ह्याच चौकातील ३० मी. उंचीचा ‘ट्रेजन्स कॉलम’ हा विजयस्तंभ अभंग स्वरूपात उभा आहे.त्यावर ट्रेजनने जिंकलेल्या युद्घांतील प्रसंग व दृश्ये कोरलेली आढळतात. त्याच्याजवळच ‘मार्केट्स ‘ ट्रेजनचा फोरम’ (अंशदृश्य), इ. स. सु. ११२ऑफ ट्रेजन’ ही अर्धवर्तुळाकार, तिमजली दुकानांची भग्नावशिष्ट वास्तू आहे. यांमधील एक दुकान गतकालाच्या स्मरणार्थ पुनश्च मूळ स्वरूपात उभारण्यात आले आहे. प्रबोधनकाळात ⇨ मायकेलअँजेलो याने रोम येथील कॅपिटालाइन टेकडीवर ‘प्लाझा देल कँपिदॉग्लिओ’ ह्या सार्वजनिक सभाचौकाचा वास्तुकल्प १५३८ मध्ये केला. त्याच्या भोवती तीन शासकीय वास्तू होत्या. नागरी वास्तुकलेचे हे उत्तम उदाहरण मानले जाते. रोम येथेच १६२६ मध्ये सेंट पीटर्सचा चौक योजण्यात आला. धार्मिक समारंभ व सभा यांसाठी त्याचा मुख्यत्वे वापर होत असे. व्हेनिसचे ड्यूकल व सान मार्को हे दोन सभाचौक प्रबोधनकालीन प्लाझा रचनेची उत्कृष्ट उदाहरणे होत.

आधुनिक काळात सार्वजनिक सभास्थानांचे नियोजन प्रामुख्याने राजकीय स्वरूपाच्या सभा, सार्वजनिक विषयांवरील चर्चा, तसेच निदर्शने इ.गोष्टींसाठी केले जाते. मॉस्कोचा लाल चौक (रेड स्क्वेअर), न्यूयॉर्कचा टाइम स्क्वेअर, लंडनची पिकॅडिली सर्कस, मुंबईचा शिवाजी पार्क, नरे पार्क, पुण्यातील शनिवार वाडा, दिल्लीतील रामलीला मैदान इ. सार्वजनिक सभास्थाने प्रसिद्घ आहेत. त्या ठिकाणी राजकीय व इतर सार्वजनिक सभा नेहमी होतात. न्यूयॉर्कच्या रॉकफेलर प्लाझाचा वापर हिवाळ्यात स्केटिंगसाठीही केला जातो. ह्या सर्वांमागची मूळ कल्पना काही अंशी प्रजासत्ताक लोकशाहीच्या ग्रीक तत्त्वांशी निगडित आहे.

कान्हेरे, गो. कृ.