कॉलॉसिअम : रोम येथील जगप्रसिद्ध प्राचीन रंगमंडल. त्यास ‘फ्लेव्हिअन अँफिथिएटर’ असेही म्हणतात. त्याची उभारणी व्हेस्पेझ्यन याने इ. स. ७० मध्ये सुरू केली व डोमिशन याने ते इ. स. ८० मध्ये पुरे केले. या खुल्या, लंबवर्तुळाकृती रंगमंडलातील प्रत्यक्ष क्रीडांगण ८७ x ५५ मी. असून, प्रेक्षागार धरून त्याचे क्षेत्र १८९ x १५६ मी. एवढे होते. दर्शनी भागात ८० प्रवेशद्वारे असून त्यांतून प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी सोपानमार्ग आहेत. प्रेक्षागाराच्या खाली तळघरे असून त्यांत हिंस्र पशूंस ठेवण्यासाठी पिंजरेवजा खोल्या आहेत. प्रेक्षागारातील बसण्याच्या जागा दगडी बांधकामात आहेत. राजे, सरदार, मान्यवर नागरीक आणि सर्वसाधारण नागरिक यांच्या इतमामाप्रमाणे प्रेक्षागाराचे विभाग पाडले आहेत. प्रेक्षागार चार भागांत आहे. त्यांतील दोन भाग क्रीडांगणाजवण असून तेथे बसण्यासाठी पायऱ्या आहेत. बाकीचे दोन भाग उंचावर असून त्यांस स्तंभवलयांची पार्श्वभूमी आहे. क्रीडांगणात हिंस्र पशूंबरोबर गुलामांची द्वंद्वयुद्धे होत असत.

कॉलॉसिअम, रोम

प्रेक्षागाराच्या भिंती काँक्रीटमध्ये बांधलेल्या असून भिंतीच्या ज्या भागावर इमारतीचे वजन जास्त होते, तो भाग ‘ट्रॅव्हर्टीन’ दगडांनी (पिवळसर, सच्छिद्र इमारती दगड) बांधला आहे. काँक्रीटच्या छतांना ट्रॅव्हर्टीन लाद्यांचे अस्तर आहे. काँक्रीटचे छत तोलून धरणारे धीरे २ मी. जाड आहेत. त्यांचा आकार पाचरीप्रमाणे असून ते लंबवर्तुळाच्या मध्यबिंदूकडे तोंड करून उभारलेले आहेत. ‘कॉलॉसिअम पडले, तरच रोमन साम्राज्य पडेल’, अशी रोमन लोकांत म्हण होती.

या वास्तूचा दर्शनी भाग चार मजली इमारतीप्रमाणे आहे. हे मजले भिंती, कमानी व पुढे आलेले अर्धस्तंभ यांनी घडविलेले आहेत. तळमजल्यावर तस्कन, पहिल्या मजल्यावर आयोनिक आणि पुढील मजल्यावर कॉरिंथियन या शैलींचे स्तंभ आहेत. या क्रीडागाराची उंची ५३ मी. आहे. उत्सवप्रसंगी झेंडे, पताका वगैरे उभारण्यासाठी शेवटच्या मजल्याच्या भिंतीच्या पृष्ठभागी खोबण्या आहेत. प्रत्येक मजल्याचा विस्तार बाह्यदर्शनी आडव्या पट्ट्यांनी स्पष्ट केला आहे. यूरोपीय प्रबोधनकाळात इमारती बांधण्यासाठी या रंगमंडलाचे दगड वापरल्यामुळे हे आता विद्रूप स्वरूपात अवशिष्ट आहे.

गटणे, कृ. ब.

Close Menu
Skip to content