कैलास लेणे : वेरूळ येथील सर्वांत मोठे आणि सौंदर्यशाली शैलमंदिर. याचे मूळ नाव कैलासनाथ. राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत अगदी लहान प्रमाणावर आरंभण्यात आलेल्या ह्या शिवमंदिरास प्रथम कृष्णराज याने पूर्ण रूप दिले (आठवे शतक). त्यानंतरही तीन-चार राजांच्या काळात मंदिराभोवती ओवऱ्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे तसेच मातृकामंदिर ही खोदण्यात आली. राष्ट्रकूटांच्या चार पिढ्यांची धर्मभावना आणि दातृत्व ह्यांच्या योगाने आजचे शैलमंदिर साकार झाले. शैलमंदिर या शिल्पप्रकाराची कैलासनाथ लेणे ही सर्वांत परिणत अवस्था होय. तोपर्यंत वास्तूचा समोरचा आणि आतील भाग यांची हुबेहूब प्रतिकृती शैलमंदिरात करण्यात येत असे. परंतु महाबलीपूर येथील रथांप्रमाणे मंदिराच्या सर्व अंगोपांगांची पूर्ण प्रतिकृती येथे करण्यात आली आहे. आकारमान व कलात्मक रचना या द्दष्टींनी महाबलीपूरपेक्षा हे लेणे अधिक प्रभावी वाटते. पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांचीपुरम् येथील कैलासनाथ मंदिर या दोन वास्तूंचा आदर्श वेरुळच्या लेण्यात दिसून येतो. तद्वतच शिल्पशैलीही पल्लव व चालुक्य संप्रदायांची स्पष्ट छाप दाखविते.

एका टेकडीच्या उतरत्या कडेला, गोपुरासाठी आणि मुख्य मंदिरासाठी आवश्यक तेवढी जागा शिल्लक ठेवून ३० मी. रुंद आणि तितकाच खोल चर प्रथम खणून काढण्यात आला. मध्यभागी उरलेल्या ६० मी. लांब व ३० मी. रुंद पहाडातून कैलासनाथ मंदिराची इमारत व त्यापासून समोर ३० मी. अंतरावर ठेवण्यात आलेल्या ठोकळ्यातून प्रवेशद्वार व गोपुर खोदण्यात आले. मंदिराचे विधान अथवा रचनाकल्प साधा आहे : चौकोनी गाभारा, त्याच्याभोवती थोड्या अंतरावर पाच छोटी देवळे, समोर चौरस मंडप व मंडपासमोर थोड्या अंतरावर नंदिमंडप. मंडप व नंदिमंडप यांना जोडण्यासाठी पहाडाचाच पूल खोदला आहे. मंदिराच्या वास्तूचा सबंध तळमजला भरीव आहे. कमरेइतक्या जोत्यावर पहाडातच हत्ती, सिंह, व्याल यांच्या प्रचंड मूर्ती खोदलेल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर मंदिराची इमारत असून त्यांतील स्तंभ, कोनाडे, छपरे, विमान व शिखर द्राविड शैलीची आहेत. वास्तू म्हणून स्वभावतः देखण्या असलेल्या या मंदिराला उत्कृष्ट मूर्तिकामाचा साज चढविण्यात आलेला आहे. गोपुराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर त्रिपुरान्तक, गरुडवाहन विष्णू, अर्जुन-सुभद्रा विवाह अशांसारख्या पौराणिक देखाव्यांचे चित्रण आहे. आत दोन्ही बाजूंना डौलदार गजमूर्ती असून ध्वजस्तंभही आहेत. मंदिराच्या जोत्यावर रामायण आणि महाभारत यांतील कथादृश्ये शिल्पांकित केली आहेत. परंतु त्यांत कथात्मक कलादृष्टी आढळत नाही. इतर शिल्पे आकाराने खूपच मोठी असून त्यांत रावण व जटायू यांचा संग्राम, त्रिपुरवध असे प्रसंग दिसतात. या सर्वांत कैलासोद्धरणाचा देखावा अत्यंत नाट्यमय आहे. शिवपार्वतीचे अधिष्ठानच असा कैलास पर्वत आपल्या बाहूने गदगदा हलवू पाहणारा दशानन, भयभीत झालेली पार्वती आणि तितकाच धीरगंभीर व शांत असणारा शिव अशी प्रतिमाशिल्पे त्यांत असून शिल्पित व्यक्तींच्या हालचाली व मुद्रा अत्यंत परिणामकारक आहेत. मंदिराच्या आतील भागावर विलेपन करून रंगकाम केले होते. त्यांतील आज शिल्लक असणाऱ्या कामावरून ते अजिंठ्यापेक्षा फारच निकस वाटते. कल्पनाशक्तीची झेप म्हणून हे मंदिर संस्मरणीय असले, तरी पहाडाच्या पोटातच हे खोदीव, रेखीव मंदिर ठेवण्यामागील कलादृष्टी विशेष श्रेष्ठ समजता येत नाही. .

पहा : वेरूळ. 

संदर्भ : 1. Gupte, R.S. Mahajan, B.D. Ajanta, Ellora and Aurangabad Caves, Bombay, 1962.

      २. दवणे, शं. ग. वेरूळचे कैलास लेणें, औरंगाबाद, १९६५. 

      ३. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.  

माटे, म. श्री.


दक्षिण ध्वजस्तंभ, नंदिगृह व 'रामायण' कथाशिल्पकैलास हलवणारा रावणसरितादेवी यमुनेची मूर्तीगजपीठलंकेश्वर गुहाकैलास : विहंगम दृश्य.