रोमनेस्क वास्तुकला : यूरोपमध्ये साधारणपणे अकराव्या ते तेराव्या शतकांत मुख्यत्वे वास्तुकला व त्या अनुषंगाने शिल्प, चित्र व अन्य आलंकारिक कला ह्या क्षेत्रांत एक सर्वसाधारण, समान शैली निर्माण झाली. या शैलीत राष्ट्र प्रदेश-परत्वे काहीशी प्रादेशिक भिन्नता आढळत असली, तरी काही ठळक शैलीघटक सर्वत्र समान व समाईक होते. या शैलीला ‘रोमनेस्क’ अशी संज्ञा देण्यात आली. तिच्या प्रेरणा प्रामुख्याने प्राचीन रोमन कलेतून घेतल्या गेल्या पण त्यात अन्य प्रभावही येऊन मिसळले. भिन्न भिन्न कलापंरपरा असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशांत रोमनेस्क कला विकसित होत गेली. त्यात त्या त्या ठिकाणची प्रादेशिक वैशिष्ट्ये येऊन मिसळली. उदा., आयर्लंड व इटली. पण तिचे सर्वसाधारण (समाईक) गुणधर्म कायमच राहिले.

रोमनेस्क कला ही मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात उगम पावली. या शैलीची नेमकी सुरुवात केव्हा झाली, यासंबंधी कलेतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते कॅरोलिंजिअन कलेपासूनच रोमनेस्क कलेची सुरुवात होते. कॅरोलिंजिअन  ही शार्लमेनच्या राजवटीत आठव्या-नवव्या शतकात विकसित झालेली शैली, रोमन पद्धतीच्या अर्धवर्तुळाकार कमानी, तसेच अभिजात कलेचे इतर घटक या शैलीत दिसून आल्यामुळे तिचे नाव ‘रोमनेस्क’ असे पडले आणि बायझंटिन कलेचा अस्त होऊ लागताच, तिला विरोधी असे हे घटक प्रकर्षाने नजरेत भरू लागले. या विरोधी घटकांचे स्वरूप कॅरोलिंजिअन कलेपासूनच स्पष्ट झाले व विकसित झाले. यामुळे काही फ्रेंच कलेतिहासकार कॅरोलिंजिअन व ऑटोनियन कलेला आद्य रोमनेस्क कला मानतात तर त्यानंतरच्या रोमनेस्क कलेला द्वितीय रोमनेस्क कला असे संबोधतात. परंतु सर्वसाधारणपणे अकराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते जवळजवळ तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत सु. २५० वर्षांचा काळ हा रोमनेस्क कलाशैलीचा कालखंड सामान्यतः मानला जातो. रोमनेस्क कला ही प्रामुख्याने धार्मिक आहे. वास्तुकलेमध्ये भरीवपणा, जडशीळता व भव्यता दिसते. चित्र-शिल्प-अलंकरणादी कला प्रामुख्याने चर्चवास्तूंच्या सजावटीच्या अंगानेच बहरल्या. त्यांत रूपकात्मक, प्रतीकात्मक पातळीवरचे चित्रण प्राधान्याने दिसते. नैसर्गिक आकारांपेक्षा, परिणाम साधण्यासाठी हेतुतः केलेले विरूपणही आढळते. सरंजामशाहीमुळे तत्कालीन सरदारांत होणारे तंटेबखेडे आणि मुस्लिम व ख्रिश्चन सत्ता यांमध्ये वैमनस्य निर्माण झाल्यामुळे उद्‌भवलेली धर्मयुद्धे यांच्या परिणामी सामान्य माणूस-विशेषतः शेतकरी-भरडून निघाला. या सामाजिक, राजकीय व धार्मिक तणावांचा तत्कालीन कलानिर्मितीवरही परिणाम झाला. कलेमध्ये मानवाकृति-विरूपणाची प्रवृत्ती ठळकपणे जाणवते. असुरक्षितता व अस्थैर्य यांमुळे किल्ल्यासारख्या तटंबदी असलेल्या भक्कम वास्तू, टेहळणीच्या दृष्टीने सोयीस्कर अशा उंच जागी बांधण्यात आल्या. चर्च व मठ यांना समाजजीवनात आत्यंतिक महत्त्व प्राप्त झाले व चर्च हे सामान्य लोकांचे भावनिक केंद्रबिंदू ठरले. ठिकठिकाणचे कुशल स्थपती, वास्तुकार, शिल्पकार व कारागीर यांना पाचारण करून चर्चवास्तूंची बांधकामे व सजावट वैभवशाली करण्याचे प्रयत्न विशेषत्वाने झाले व त्यामुळे अलंकरणाच्या विविध शैली उगम पावल्या.

रोमनेस्क कलेच्या प्रभावकाळात प्रत्येक देशात आपापल्या पूर्वकालीन कलापरंपरांचा शोध व त्यापासून प्रेरणा घेण्यात आल्या. जिथे प्राचीन रोमन कलेतील भव्य स्मारके अवशिष्ट होती तिथे रोमन कलेचा प्रभाव दांडगा होता. उदा., इटली, द. फ्रान्स, स्पेन व ऱ्हाईन लँड या ठिकाणी रोमन वास्तू व शिल्पे यांचा प्रभाव लक्षणीय होता. तर फ्रान्स व उत्तर जर्मनी येथील रोमनेस्क कलानिर्मितीत कॅरोलिंजिअन शैलीपासून प्रेरणा घेतल्या गेल्या. प्राचीन रोमन व आद्य ख्रिस्ती कलाशैलींचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयासांतून कॅरोलिंजिअन शैली विकसित झाली. या शैलीमध्ये भव्य चर्चवास्तू पुढेही निर्मिल्या गेल्या. त्यातून जर्मनीमध्ये पहिल्या ऑटो सम्राटाच्या आधिपत्याखाली दहाव्या-अकराव्या शतकात ऑटोनियन शैली उत्क्रांत झाली. जर्मनीमधील रोमनेस्क कला ही ऑटोनियन शैलीचीच पुढची परिणत अवस्था म्हणता येईल. कॅरोलिंजिअन व ऑटोनियन चित्र-शिल्प-अलंकरणादी कला त्या काळात प्रशंसनीय व अनुकरणीय ठरल्या. इंग्लंडमध्ये रोमनेस्क शैलीच्या जडणघडणीत अँग्लोसॅक्सन कलाघटक प्रभावी ठरला.

सान मीकेले चर्चवास्तू, पाव्हिया, इटली, सु. ११ वे-१२ वे शतक वर्म्झ कॅथीड्रल, जर्मनी, १२ वे शतक − १३ व्या शतकाचा पूर्वार्ध. दोना ऊर्राकाचे रत्नजडीत पानपात्र, सान इझिदोरो चर्च, लेओन, स्पेन, ११ वे शतक.
‘ख्राइस्ट इन मॅजेस्टी’ : सान क्लेमेंते चर्चमधील भित्तिचित्र, ताहुल, लेरीदा, स्पेन, सु. ११२३. ईस्टर सणांच्या मेणबत्तीचे घर, संगमरवर, सान मारिया देल्ला प्येता चर्च, कॉरी, इटली, १२ व्या शतकाचा प्रारंभ. सँ मारतँ-दी-बॉशेरव्हिल चर्च, सँ झॉर्झ, फ्रान्स, १२ वे−१३ वे शतक.

आयरिश अलंकरणाच्या प्रेरणा केल्टिक परंपरेत सापडतात. स्कँडिनेव्हिया, इंग्लंड, आयर्लंड येथील रोमनेस्क शिल्प हे व्हायकिंग कालीन प्राणिशिल्पशैलीचा प्रभाव दर्शविते. स्पेनमधील रोमनेस्क कलेचे प्रेरणास्त्रोत रोमन, बायझंटिन, इटालियन, फ्रेंच, इस्लामी असे विविध व गुंतागुंतीचे आहेत. बायझंटिन कलेचा प्रभाव सर्व यूरोपभर पसरला व कुट्टिमचित्रण, मीनाकारी, हस्तिदंतशिल्पन, वस्त्रकला, हस्तलिखित सजावट अशा सर्वच अलंकरण क्षेत्रांत प्रेरणादायक ठरला. हे विविध प्रेरणास्त्रोत आत्मसात करून समृद्ध झालेल्या रोमनेस्क कलेने आपल्या स्वतंत्र सर्जनशील आविष्कारांद्वारा मध्ययुगीन यूरोपमधील महत्त्वाची कलाशैली म्हणून स्वतःचे स्थान सिद्ध केले. रोमनेस्क शैलीचे सर्वांत प्रभावी व महत्त्वाचे आविष्कार हे वास्तुकलेच्या क्षेत्रातच ठळकपणे दिसून येतात. अन्य कलाविष्कार हे प्रायः वास्तुसजावटीसाठीच उपयोजिले गेले.

वास्तुकला : रोमनेस्क वास्तुकला ही त्या संज्ञेतच सूचित झाल्याप्रमाणे रोमन वास्तुशैलीतून विकसित झाली. रोमन व नंतरची गॉथिक शैली ह्यांदरम्यानच्या काळातील ही वास्तुकला. ख्रिस्ती उपासनापद्धतीला आणि चर्चच्या वापराला लागणारी सोय-सुविधा रोमन अवशेषांत नसली, तरी सुरुवातीला रोमन बॅसिलिकांचा वापर चर्च म्हणून झाला. त्यातूनच रोमनेस्क वास्तुकलेचा उगम झाला. स्थूलपणे हिचे प्रारंभीचा काळ व परिपूर्णत्वाचा काळ असे दोन भाग पडतात. पुढे ह्या कलेच्या प्रभावातून गॉथिक व प्रबोधकालीन वास्तुशैली निर्माण झाल्या.

फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन ह्या भागांत रोमनेस्क कलेचा विस्तार होऊन त्या त्या ठिकाणी प्रादेशिक स्वरूपे प्रकट झाली. रोमनेस्कचे कलात्मकदृष्ट्या पूर्ण विकसित असे रूप तेराव्या शतकात फ्रान्समध्ये पाहावयास मिळते. वास्तुकलेची उदाहरणे प्रामुख्याने धार्मिक वास्तूंत दृष्टीस पडतात. बांधणीसाठी दगड, विटा ह्यांचा व छतांसाठी दगडी फरशांचा व लाकडाचा वापर होत होता. चापछत (व्हॉल्ट), अर्धवर्तुळाकृती कमानी, नक्षीदार झुकावाचे दगड, जोडखांब व जास्त उंचीचा मंडपाचा मध्यभाग ही या रचनाशैलीची खास वैशिष्ट्ये होत.

प्रारंभीचा काळ : (९५०−१०५०). बायझंटिन वास्तुकलेचा व पश्चिम यूरोपातील हवामानाचा वास्तुबांधणीवर परिणाम झाला. कॅरोलिंजिअन कालखंडात कलेचा विकास झाला व मठाकरता नवीन अभिकल्प दरबारी वास्तुशिल्पज्ञांनी बनविला. ख्रिस्ती मठांसाठी अजूनही हा आराखडा वापरण्यात येतो, हे वैशिष्ट्य. या वास्तुकल्पाचे प्रमुख भाग (१) चर्च, (२) मठातील चौक व त्याबाजूची स्तंभावली आणि शयनागार, (३) आतील खास चौक, लगतची पाकशाळा, (४) सार्वजनिक चौक व बाग, (५) पिठाची गिरणी, तबेला व कारखाना हे होत.

चापछताच्या बांधकामाची कमी पाखांची साधी पद्धती, चौकोनी विटांचा व लहान दगडांचा वापर ही कॅरोलिंजिअन काळाची वैशिष्ट्ये. सामान्यपणे प्रारंभीच्या काळात दगडी बांधकामात जाड, साधे आणि ओबडधोबड दगड व चुना यांचा वापर करण्यात येई. उंच मनोरे व एकंदर बांधकामाची क्षितिजरेषा उठावदार कशी दिसेल, यावर भर असे. वास्तूमध्ये क्रूसाकार चर्चच्या मुख्य वास्तूच्या काटकोनात पुढे आलेली दोन्ही बाजूंची दालने व वाद्यवृंदाची जागा यांना जास्त उठाव त्यांच्या आकाराद्वारे देण्यात येई. एकमेकांवर आधारासाठी अवलंबून असलेले भाग वास्तुरचनेत लयबद्धता निर्माण करीत तर छपराजवळचे आडवे पट्टे किंवा बाहेर आलेल्या झुकावाच्या दगडावरील जुळी स्तंभावली व त्यावर अर्धवर्तुळाकृती कमानी शोभा वाढवीत.

उत्कर्षाचा काळ : (१०५०−११५०). वास्तुकलेचा उत्कर्ष कारागिरांच्या वाढत्या नैपुण्यामुळे व एकंदर सामाजिक उत्कर्षांमुळे झाला. बांधकामाची रचना बदलून ते जास्त योजनाबद्ध करण्यात आले. एकपाखी छपराच्या खाली सभामंडपाच्या मध्यभागाच्या छपराच्या वजनाचा झोक सांभाळण्यासाठी, साध्या कमानींचा वापर करण्यात आला व छपरांसाठी जड दगडकामाऐवजी फासळ्या व त्यावरच्या लादीकामाचा वापर चालू झाला. त्याची वाढ गॉथिक वास्तुकलेत झाली. एकमेकांत उतरत जाणाऱ्या दरवाजाच्या बाह्या, त्यामध्ये असलेले पडखांब व वरील क्रमशः लहान होत जाणाऱ्या अर्धवर्तुळाकृती कमानी ह्यांवर अपोत्थित (उथळ) खोदीवकाम करून फुले, पाने, वेली व प्राण्यांचे आकार खोदण्यात येत तर भिंतीचे भाग जास्त असल्यामुळे भित्तिलेपचित्रांचा वापर अंतर्गत सजावटीसाठी केला जाई. वर्तुळाकृती खिडक्यांमध्ये रंगीत काचचित्रांचा वापर करण्यात येई.

इटलीतील ⇨पीसाचा कलता मनोरा (११७४−१३५०) हे या कलेचे उत्तम उदाहरण आहे. इटलीतील सान मीकेले हे पाव्हिया येथील चर्च हे सुरुवातीच्या काळातील वास्तुरचनेचे उल्लेखनीय उदाहरण तर जर्मनीतील वर्ग्झ कॅथीड्रल हे उत्कर्ष काळातील उदाहरण होय. फ्रान्समधील आबेई ओ झॉम (१०६६−८६) हे चर्च रोमनेस्क अंतिम  पर्वातले उत्तम उदाहरण मानले जाते. ह्यामध्ये षड्भागी फासळ्यांच्या छपराचा वापर आहे. सर्वसाधारणपणे अभिजात ख्रिस्ती वास्तुकलेचा पाया रोमनेस्क वास्तुकलेने घातला, असे म्हणता येईल.

‘डिसेंट फ्रॉम द क्रॉस’ : सान लोरेंत्सो चर्चमधील काष्ठशिल्प; टिव्होली, इटली, १३ व्या शतकाचा पूर्वार्ध.

शिल्पकला : रोमनेस्क चर्च व मठ या वास्तूंच्या अलंकरणासाठी प्रामुख्याने शिल्पाचा वापर केला गेला. बाहेरच्या भिंतीवर तसेच आतल्या भागातही उत्थित शिल्पाचा वापर भरपूर केलेला आढळतो. आधीच्या मूर्तिभंजनाच्या काळात आलेली मरगळ जाऊन झपाट्याने दगडी शिल्पांची निर्मिती फोफावत गेली. याची सुरुवात बहुधा नैर्ऋत्य फ्रान्स व उत्तर स्पेन या प्रदेशांत प्रथम झाली असावी. ह्या अलंकरणात्मक शिल्पनिर्मितीचे पहिले प्रयत्न यात्रेकरूंच्या मार्गावर असलेल्या चर्चवास्तूंमध्ये मुख्यत्वे झाले. मुख्यतः चर्चच्या बाहेरच्या भिंती व प्रवेशद्वारे यांच्यावर उत्थित शिल्पे कोरून त्यायोगे सामान्य ख्रिस्ती उपासक आकर्षित होतील, ह्या हेतूने हे सुशोभन केले गेले. यातही काही संकेत पाळलेले दिसतात. मुख्य प्रवेशद्वारावरील अर्धवर्तुळाकार कमानीच्या त्रिकोणिका-पृष्ठात, तसेच ‘मंडोला’ नामक बदामासारख्या लांबट आकारपृष्ठात उत्थित शिल्पे खोदली जात. ह्यांत ख्रिस्ताच्या बैठ्या प्रतिमा, अंतिम न्यायनिवाडा करीत असलेला येशू, तसेच क्रूसावरील ख्रिस्त यांसारखे विषय खोदले जात. कित्येकदा पृष्ठभागाचे आडव्या दोन भागांत विभाजन  करून त्यांतही शिल्पे खोदली जात. ऑटन कॅथीड्रल (बर्गंडी) येथील पश्चिम प्रवेशद्वाराच्या शिरोभागी अर्धवर्तुळाकार कमानीच्या त्रिकोणिका-पृष्ठात खोदलेले लास्ट जज्‌मेंट हे उत्थित शिल्प रोमनेस्क शैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या उभ्या पट्ट्यांमध्येही शिल्पांकन केले जाई. स्तंभ व स्तंभशीर्षे यांवरही सुरेख उत्थित नमुने कोरले गेले. फ्रान्समधील म्बासाक येथील सेंट ॲबे चर्चमधील स्तंभावर कोरलेली प्रेषिताची उत्थित प्रतिभा ही रोमनेस्क कालीन विरूपीकरण करून खोदलेल्या शिल्पाकृतींपैकी सर्वांत उल्लेखनीय प्रभावी शिल्प आहे. या रोमनेस्क शिल्पांच्या शैलीचे तंत्र व आकृतिबंध सुरुवातीच्या ख्रिस्ती कलेशी साधर्म्य दर्शविणारे आहेत. मूर्तीचे आविर्भाव जोमदार, आवेशयुक्त व शरीरे पिळवटल्याप्रमाणे दाखवली आहेत. हात, पाय हे वाजवीपेक्षा अतिरिक्त लांबलचक दाखविले आहेत तर काही ठिकाणी मस्तके प्रमाणापेक्षा मोठी आहेत. भावदर्शनातही कित्येकदा अतिशयोक्ती जाणवते. इटली, प्रॉव्हांस व उत्तर स्पेन येथील शिल्पांवर रोमन शिल्पाचा प्रभाव जाणवतो तर उत्तर यूरोपातील शिल्पांत हा प्रभाव अगदीच कमी आहे. बऱ्याच वेळा सचित्र हस्तलिखितांवरूनही शिल्पांसाठी नमुने व विषय उचलले जात. स्तंभावरील शिल्पांकनात अतिशय उथळ व कमी उठावापासून (अपोत्थित) ते पूर्ण उठावापर्यंत (प्रोत्थित) उत्थित शिल्पांचे अनेक प्रयोग विषयाला अनुसरून शिल्पकारांनी केलेले आढळतात. अशा शिल्पांत शार्त्र येथील स्तंभशीर्षावर सलगपणे कोरलेले ख्राइस्ट एंटरिग जेरुसलेम हे शिल्प व स्तंभांवरील ख्रिस्ती संतांच्या उभ्या मूर्ती उल्लेखनीय आहेत. त्यांत वस्त्रांच्या चुण्यांचे कोरीवकाम रोमन शैलीप्रमाणे, तर इतर घटकांचे शिल्पांकन बायझंटिन शैलीप्रमाणे, असा संमिश्र प्रभावही आढळतो.

या काळात मोठ्या आकाराच्या शिल्पाकृती निर्माण झाल्या असल्याचा काही पुरावा उपलब्ध नाही. तशा मूर्ती अवशिष्ट नाहीत. मात्र छोट्या आकाराच्या धातूच्या तसेच हस्तिदंताच्या मूर्ती अवशिष्ट आहेत. चर्चमध्ये ठेवण्यासाठी केलेल्या आलंकारिक वस्तूंत उत्थित शिल्पांकनाचा सुरेख वापर केलेला आढळतो. ल्येझ येथील एका ब्राँझच्या बाप्तिस्मा-पात्रावर ख्रिस्ताच्या जीवनातील प्रसंग कोरले असून पात्राच्या तळाशी, ख्रिस्ताच्या बारा धर्मप्रचारकांचे प्रतीक असे बारा बैल त्याला उचलून धरताना दाखविले आहेत. म्यूज खोऱ्यात तयार झालेले, लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयात ठेवलेले विचित्र प्राण्याच्या आकाराचे ब्राँझचे जलपात्र हे तत्कालीन शिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशी अनेक पात्रे ड्रॅगनसारख्या राक्षसी प्राण्यांच्या आकारांमध्ये तसेच सिंहादी प्राण्यांच्या आकारांमध्ये घडवली गेली. ही पात्रे धार्मिक कृत्यांच्या वेळी धर्मगुरूंच्या हातांवर पाणी घालण्यासाठी वापरली गेली.

चित्रकला : रोमनेस्क चित्रकलेत मात्र शिल्पकलेप्रमाणे क्रांतिकारक वळण दिसून येत नाही तर कॅरोलिंजिअन आणि ऑटोनियन परंपराच पुढे चालू राहिलेली दिसते. या काळात अनेक धार्मिक सुशोभित हस्तलिखिते तयार झाली आणि त्यात सुनिदर्शने रंगविली गेली. रोमनेस्क काळातील या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे नाजुक रेषांचे रेखाटन. त्यामुळे ती पूर्वकालीन चित्रांपेक्षा वेगळी ओळखू येतात. रोमनेस्क काळातील शिल्पकलेप्रमाणेच चित्रकलेतही विविध प्रदेशांत वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या. आयर्लंडमधील बुक ऑफ केल्स या हस्तलिखितात लाल केसांच्या व निळ्या डोळ्यांच्या मानवाकृती दिसतात. तर लिंडिस्‌फार्न गॉस्पेलमध्ये शुद्ध आलंकारिक स्वरूपाचे चित्रण दिसते. रेखाटनात बहुधा रेषेचा उपयोग रंगविलेल्या भागाची बाह्यरेषा काढण्यासाठी केलेला आढळतो. चित्रकलेची निर्मिती सु. १००० नंतर अधिक दर्जेदार झालेली दिसते. बाराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास तयार झालेल्या बायबलमधील सर्व चित्रांत वस्त्रांचे चित्रण दुहेरी रेघांनी दर्शविलेल्या चुण्यांचे आढळते. ही शैली ‘डॅम्प-फोल्ड स्टाइल’ यानावाने ओळखली गेली. या शैलीत मानवाकृतीच्या चित्रणात अवयवांवरून आच्छादलेल्या वस्त्राला दुहेरी रेषेच्या चुण्या दाखविल्या आहेत. ही शैली चित्रकलेत तत्कालीन शिल्पकलेच्या अनुकरणातून आली असावी. रंगसंगतीच्या संदर्भात गडद व झगझगीत रंगच्छटा रोमनेस्क चित्रकारांना प्रिय होत्या, असे दिसते. चर्च-मठादी धार्मिक वास्तूंना जसजशी आर्थिक संपन्नता लाभत गेली, तसतसा ग्रंथसजावटीत भपकेबाजपणा वाढत गेला. रंगसंगतीतही या समृद्धीच्या खुणा दिसतात. उदा., विंचेस्टर बायबलसारख्या आर्थिक सुस्थिती लाभलेल्या स्थळाच्या पुस्तकात रंगांच्या गडद छटांची व झगझगीतपणाची कमाल मर्यादा आढळते, तर इतर काही ग्रंथसजावटींत वापरलेले रंग त्यामानाने फिके वाटतात.

बाहेरून शिल्पांनी सुशोभित केलेल्या चर्चवास्तूंचे अंतर्भाग सुशोभित करण्यासाठी रोमनेस्क कलाकारांनी अलंकरणाचा मुक्तहस्ताने वापर केला. जमिनी व सपाट लाकडी छते ह्यांवरही भरघोस अलंकरण करण्यात आले. जमिनीवर झगमगीत रंगाचे कुट्टिम अलंकरण तर लाकडी छतांवर बहुधा चिकणरंगांत चित्रे रंगविली जात. भरतकाम केलेले गालिचे व पडदे यांनी भिंती व जमिनी सुशोभित केल्या गेल्या. या काळात भिंतींवर रंगविलेली चित्रे नंतरच्या काळात त्यांच्यावर दुसरी चित्रे काढल्यामुळे नष्ट झाली. मात्र काही ठिकाणी रसायनांच्या साहाय्याने हा वरचा थर दक्षतापूर्वक दूर करून आतील चित्रे पुन्हा होती तशी दाखविण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. फ्रान्समधील सें साव्हें येथे अशा तऱ्हेचा प्रयोग यशस्वीपणे करून आतील चित्रे प्रकाशात आणण्यात आली आहेत. ही चित्रे सपाट तलपृष्ठावर निळ्या, हिरव्या व मातकट रंगच्छटांनी रंगविली असून, त्यांत बाह्यरेषांचा सुरेख वापर केलेला दिसतो.

या काळात तयार झालेल्या चित्रजवनिकांमध्ये ⇨बायो चित्रजवनिका ही फ्रान्सच्या नॉर्मंडी भागातील बायो गावच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेली तागाची चित्रपट्टी जगप्रसिद्ध आहे. हेस्टिंग्जच्या लढाईत (इ. स. १०६६) नॉर्मन सरदार विल्यमने इंग्लंडच्या हॅरल्ड राजाचा पराभव व वध केला. त्या प्रसंगाचे चित्रण या पट्टीवर भरतकामात विणून केले आहे. नॉर्मन जहाजे, वेशभूषा, तसेच युद्धदृश्यातील इतर बारकावे आणि व्यक्तिरेखा यांची महत्त्वाची माहिती या चित्रणातून उपलब्ध होते. विशेषतः मानवाकृतींचे जोशपूर्ण आविर्भाव व हालचालींचे बारकावे यांत कौशल्याने विणले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व व कलात्मकता या दोन्ही दृष्टींनी हे भरतकाम उल्लेखनीय ठरले आहे.

इतर कारागिरीच्या वस्तूंत वेदिचित्रे, बाप्तिस्मा-पात्रे, मेणबत्त्यांचे स्टँड, आलंकारिक क्रूस, मृतदेहाच्या अवशेषांचे जतन करण्यासाठी केलेले मौल्यवान रत्नजडित करंडक, मद्याचे पेले, तसेच चर्चची सुरेख उत्थित शिल्पे खोदलेली ब्राँझची प्रवेशद्वारे यांतून रोमनेस्क कलाकुसरीचे सुंदर दर्शन घडते.

भागवत, नलिनी; कान्हेरे, गो. कृ.