‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ ची गगनचुंबी जुळी इमारत, न्युयॉर्क.

गगनचुंबी इमारती : सर्वसाधारणतः पंधरा मजली वा त्यांहून अधिक उंच असलेल्या आधुनिक इमारती. प्राचीन काळात वेधशाळा, दीपगृहे, विजयस्मारके, प्रार्थनामंदिरे, विश्वविद्यालयीन वसतिगृहे, राजवाडे अशा विविध प्रकारच्या उंच वास्तू बांधल्या जात. तथापि एक खास नागरी वास्तुप्रकार म्हणून प्रथम एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील शिकागो आणि न्यूयॉर्क शहरांत गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या. औद्योगिकीकरणाचा वेग, वाढती लोकसंख्या, जमिनीच्या किंमतीतील वाढ व घरांचा तुटवडा ही कारणे गगनचुंबी इमारतींच्या उदयामागे आहेत. ह्या इमारतींच्या आराखड्यात प्रायः दोन विभाग असतात : सुखसोयींच्या साधनांचा पुरवठा करणारा पहिला वास्तुविभाग व कारणपरत्वे वापरात येणारा दुसरा वास्तुविभाग. त्यामुळे इमारतीच्या आकारात ठरीवपणा येतो. ज्या यांत्रिक युगामुळे त्यांची गरज निर्माण झाली त्याच यांत्रिक युगाने त्यांसाठी लागणारे बांधकामाचे साहित्य– पोलाद, सिमेंट, काच वगैरे–उपलब्ध करून दिले. उदा., वातशक्तिचलित गिरमिट (न्यूमॅटिक ड्रिल), काँक्रीट-मिश्रक, उद्‌वाहक (लिफ्ट), वातानुकूलनाची यंत्रसामग्री इत्यादी. यापूर्वीच्या काळातील इमारतीत तिच्या छपराचे व आतील भागांचे वजन प्रामुख्याने बाहेरील भिंती आणि आतील खांब यांवर पडत असे. त्यामुळे अधिक उंचीच्या आणि मजल्यांच्या इमारती बांधणे शक्य होत नसे. अधिकाधिक तांत्रिक प्रगतीमुळे प्रथम पोलादी खांब व तुळया यांचा सांगाडा उभा करून त्यावर आतील व बाहेरील भिंती, इमारतीचे इतर भाग वगैरेंचे वजन टाकणे शक्य झाले व त्यामुळे अधिक मजले वाढविता येऊ लागले. अशा इमारतींचे वजन जमिनीवर योग्य तऱ्हेने पसरण्यासाठी अनेक वेळा भूगर्भात खोलवर पाया घ्यावा लागतो. आजकाल पोलादी सांगाड्यांप्रमाणे प्रबलित काँक्रीटचे (आर्.सी.सी.) सांगाडे वापरतात परंतु पंचवीस ते तीस मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींसाठी असा सांगाडा योग्य नाही. एकोणिसाव्या शतकात शिकागो शहरात हा वास्तुप्रकार ॲड्लर (१८४४–१९००) व सलिव्हन (१८५६–१९२४) या वास्तुशिल्पज्ञांनी निर्माण केला. त्यानंतर न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन या विभागात अशा इमारतींचा लवकरच प्रसार झाला. एकोणिसाव्या शतकातील इमारतींत न्यूयॉर्क येथील ‘मेट्रोपॉलिटन लाइफ’ इमारत (१८९३) २१३·३६ मी. उंचीची (५० मजली) आहे. ह्या इमारतीत १९६१ पर्यंत अनेक बदल केले गेले. शिखरावरील टॉवरची रचना १९०९ मध्ये झाली. नेपोलियन लिब्रन अँड सन ह्यांनी तिची वास्तुरचना केली. विसाव्या शतकातील उल्लेखनीय इमारतींत ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ (१९३०–३२) ही वास्तू १०२ मजली असून ती जगातील एक अत्यंत उंच इमारत आहे. श्रीव्ह, लॅम व हार्मन हे तिचे वास्तुशिल्पज्ञ होत. तिची एकूण उंची ४४८·९६ मी. असून तीत ६५ उद्‌वाहक आहेत. त्याशिवाय ही इमारत दुकाने, बँका, पोहण्याचे तलाव, क्लब आदी सोयींनी सुसज्ज केलेली आहे. नयूयॉर्क येथेच ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ च्या ११० मजली, ४११·४८ मी. उंचीच्या जुळ्या इमारतीचे बांधकाम १९६७ मध्ये सुरू झाले. मिनोरू यामासाकी हे तिचे वास्तुशिल्पज्ञ होत. यांखेरीज न्यूयॉर्कमध्ये ६०–७० मजल्यांहून अधिक उंचीच्या इमारती आहेत : ‘क्रायस्लर’ (७७ मजली, उंची ३१८·८२ मी.), ‘आर्.सी.ए.’ (७० मजली, उंची २७३·७१ मी.), ‘सिटीज सर्व्हिस’ (६६ मजली, उंची २८९·५६ मी.), तसेच ‘पॅन ॲम बिल्डिंग’, ‘जनरल मोटार बिल्डिंग’ इत्यादींचा ह्या संदर्भात उल्लेख करता येईल. न्यूयॉर्क येथेच स्किडमोर (१८९७ – ), ओविंग्ज (१९०३ – ) आणि मेरिल (१८९६ – ) या वास्तुशिल्पज्ञांनी बांधलेल्या ‘लिव्हर हाउस’ (१९५२) या इमारतीपासून काचेचे आवरण असलेल्या पडदींच्या नवीन प्रकाराच्या इमारतींचे युग सुरू झाले आहे. हे वास्तुशास्त्रज्ञ या तऱ्हेच्या इमारती बांधण्यात अग्रगण्य असून त्यांनी अलीकडे बांधलेल्या इमारतींत न्यूयॉर्क येथील ६० मजली ‘चेस मॅनहॅटन बँक’ (१९५७–६१) इमारत व सॅन फ्रॅन्सिस्को येथील ‘आल्को’ इमारत या विशेष उल्लेखनीय आहेत. ‘आल्को’ इमारत फक्त २५ मजली असली, तरी तिच्या दर्शनी भागावर भूकंपापासून संरक्षणासाठी तुळयांची फुल्यांच्या आकाराची केलेली योजना प्रेक्षणीय आहे. अशाच धर्तीची ‘जॉन हॅनकॉक’ इमारत (१९६०) त्यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथेच उभारली आहे. ही इमारत १०० मजली असून ती वरती निमुळती होत गेलेली आहे. शिकागो येथे ११० मजली, ४४१·९६ मी. उंचीच्या, सिअर्स रोबक कंपनीच्या इमारतीचे बांधकाम स्किडमोर, ओविंग्ज व मेरिल ह्या वास्तुशिल्पज्ञांनी हाती घेतले आहे. तेथील लेक शोअर ड्राईव्हवर मी एस व्हान डेर रोअ (१८८६ – ) या जर्मन वास्तुशिल्पज्ञाने बांधलेल्या इमारती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या इमारतींसाठी त्याने काँक्रीट आवरणरहित पोलादी सांगाडा व काचेचे आवरण ह्यांची सुरेख सांगड घातली आहे. फ्रँक लॉइड राइट (१८६९–१९५९) या विख्यात वास्तुशिल्पज्ञाने १,६०० मी. उंचीच्या इमारतीचा आराखडा बनविला होता. पण ही इमारत मूर्त स्वरूपात आली नाही. ल कॉर्ब्यूझ्ये (१८८७–१९६५) या फ्रेंच वास्तुशिल्पज्ञाने रीओ दे जानेरो येथे शिक्षण मंत्रालयासाठी बांधलेल्या इमारतीने ब्राझीलमध्ये एक नवीन युग निर्माण केले. त्यात त्याने सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी प्रबलित काँक्रीटच्या पट्ट्यांची (लूव्ह्‌र्स) योजना सर्वप्रथम केली आणि आज हा प्रकार सर्वसामान्य झालेला आढळतो. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे सु. १८० मी. उंचीची, ५० मजली गोलाकार इमारत असून तिचा बाहेरील व्यास ४१ मी. आहे. रशियातील सर्वांत उंच इमारत मॉस्को येथील ‘स्टेट युनिव्हर्सिटी बिल्डिंग’ ही होय. ती ३७ मजली असून तिची एकूण उंची २३५·६१ मी.  आहे. जपानमध्ये सहसा १५–२० मजली इमारतींपेक्षा अधिक उंच इमारती आढळत नाहीत. तथापि तेथील सगळ्यांत उंच इमारत ४० मजली असून ती टोकिओ येथे आहे.

अशा तऱ्हेच्या गगनचुंबी इमारतींची आवश्यकता आता भारतातील प्रमुख शहरांतही भासू लागली आहे. त्याची प्रमुख कारणे वाढती लोकसंख्या व जमिनीचा अभाव ही होत.

मुंबईमध्ये ‘एअर इंडिया बिल्डिंग’ (१९७१) ही गगनचुंबी इमारत २६ मजली असून तिची उंची १०५·१५ मी. आहे. हॉलोबार्ड रूट व फिरोझ कुडी अनवाला ह्यांनी तिची वास्तुरचना केली आहे. त्याचप्रमाणे ‘ओबेरॉयशेरेटन’ हॉटेल(१९७३) ही वास्तू ३२मजली असून तिची उंची सु. १२०मी. आहे. बाजपेयी, मदन पत्की व राझदान हे तिचे वास्तुशिल्पज्ञ होत. ह्यांखेरीज ‘उषाकिरण’ (२३ मजली), ‘मीनाक्षी’ (२१ मजली), ‘एक्स्प्रेस टॉवर्स’ (२१ मजली) इ. गगनचुंबी इमारती मुंबईमध्ये आहेत. तसेच कलकत्ता, दिल्ली, मद्रास इ. प्रमुख शहरांतही अशा इमारती बांधल्या जात आहेत.

   देवभक्त, मा. ग.