गृह : गृह म्हणजे निवासासाठी बांधलेली वास्तू. मानवी संस्कृतीमध्ये गृहसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तू ही संज्ञाही गृहासाठी वापरतात. संस्कृत वस् धातूवरून (अर्थ-राहणे) ही संज्ञा बनली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीप्रमाणेच वास्तुकलेतही गृहविचार केला जातो. परंतु अभियांत्रिकीय विचार अधिक तांत्रिक स्वरूपाचा [→ इमारती व घरे] व वास्तुकलेतील विचार अधिक कलात्मक, सांस्कृतिक स्वरूपाचा असतो. प्रामुख्याने या दुसऱ्या प्रकारचा विचार येथे केलेला आहे. 

भारतीय परंपरेनुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थांची साधना करता यावी, अशा दृष्टिकोनातून वास्तूची विवक्षित प्रकारे रचना केली जाते. उदा., धार्मिक साधनेसाठी देवघराची योजना, संपत्तीच्या वा धान्याच्या संचयासाठी विशिष्ट व्यवस्था, पतिपत्नींसाठी शयनगृहे इत्यादी. सर्व वास्तूंचा परस्परसंबंध मार्गांद्वारे जोडला जातो व त्यातून नगररचना अस्तित्वात येते. वस्तीच्या धारणेमागे सर्वांगीण दृष्ट्या संरक्षणाचा विचार अभिप्रेत असतो. त्यामुळे घरांना निवासाच्या दृष्टीने स्थैर्य प्राप्त होते. ही व अशा प्रकारची विचारसरणी प्राचीन काळापासून गृहनिर्मितीमागे असल्याचे आढळून येते.

गृहनिर्मितीवर हवामान, भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधनांची उपलब्धता तसेच धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय इ. बाबींचा आणि त्यांयोगे नियंत्रित झालेल्या मानवी जीवनाचा परिणाम होतो : उदा., उष्ण कटिबंधातील घरांची रचना चौकाभोवती केलेली असते. घरांच्या भिंती जाड असून खिडक्या लहान असतात. घरांच्या आतील भागांची रचना प्रशस्त असते. भूकंपग्रस्त तसेच उंच डोंगराळ भागातील घरे हलकी आणि एकमजली अथवा क्वचित दुमजली असतात. दलदलीच्या अथवा पूरग्रस्त भागांतील घरे लाकडी खांबांवर व उंचावर बांधलेली असतात. याउलट वरील प्रतिकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांतील घरे विटा-मातींची असल्याचे आढळून येते. धार्मिक वा सामाजिक कल्पनांचाही प्रभाव गृहरचनेवर पडलेला दिसतो. कित्येकदा भिन्न भिन्न धर्मांच्या, वंशांच्या, वर्णांच्या वा पंथांच्या व्यक्तींची घरे वस्तीच्या निरनिराळ्या भागांत असतात व त्यांत रचनाभिन्नत्वही दिसून येते. आर्थिक दृष्टीने पाहता, श्रीमंतांची घरे कित्येकदा कुटुंब लहान असूनही प्रशस्त असतात, तर गरिबांची घरे कुटुंब मोठे असूनही लहान असतात. नगररचनेमुळेही गृहरचना नियंत्रित होते. घरांची उंची, लांबी व रुंदी यांवर नगररचनेचे निर्बंध असतात. घरासाठी योजलेल्या जागेचे क्षेत्रफळ आणि घरबांधणीसाठी वापरावयाचे क्षेत्रफळ यांचेही प्रमाण ठरलेले असते. रस्त्याची रुंदी व घराची उंची यांतही प्रमाण निश्चिती असावी लागते. या संदर्भात भारतीय स्थापत्यशास्त्रातील भृगू व वराहमिहिर यांचे विचार लक्षणीय आहेत. 

गृहप्रकार : गृह ही संज्ञा कित्येकदा व्यापक अर्थाने वापरली जाते. तीमध्ये राहत्या घरांबरोबरच राजप्रासाद, देवप्रासाद आदींचा तसेच उद्यान-वाटिकागृहे, पथिकगृहे, आरामस्थाने, नाट्यगृहे इ.नागरी वास्तुप्रकारांचा अंतर्भाव केला जातो. राहत्या घरांचे आराखडे कुटुंबपद्धतींवर आधारित असतात. देवप्रासाद, राजप्रासाद यांवर धार्मिक, राजकीय विचारसरणींचा पगडा असतो. नागरी वास्तुप्रकारांची रचना सामाजिक उपयुक्ततेच्या अनुषंगाने केली जाते.

राहत्या घरांचे अनेक प्रकार संभवतात : एकमजली, कौलारू घरे वा शाकारलेल्या झोपड्या एकमजली वा दुमजली घरे वा बंगले अनेकमजली हवेल्या, वाडे अथवा चाळी रानांमध्ये तसेच उद्यानांमध्ये बांधलेली विश्रामगृहे शहरांपासून दूरवर बांधलेले ‘व्हिला’ (उद्यानगृहे), ‘शातो’ (फ्रेंच खेड्यातील मोठ्या हवेल्या), ‘शॅले’ (स्वित्झर्लंडमधील धनगरी कुट्या) उपनगरांतील ‘टेरेस’ (एकमेंकाना जोडून अशी दहा ते पंधरा घरे) पद्धतीची घरे भव्य राजप्रासाद अथवा राजवाडे इत्यादी.

सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील शेतकरी वा गरीब लोक पुरेशा पैशाच्या अभावी लहानशी झोपडी बांधतात. त्याहून थोडा अधिक सधन असलेला वर्ग एकमजली वा दुमजली घर बांधतो. अत्यंत धनिक व्यापारी अथवा जमीनदार वर्ग अनेकमजली वाडे वा हवेल्या बांधतो. पूर्वीच्या काळी असा धनिक वर्ग स्वतःसाठी व आश्रितांसाठी स्वतंत्र वाडे बांधत असे. अलीकडे शहरी भागात अशा वाड्यांची जागा चाळींनी घेतली आहे. पूर्वी शिकारीचा छंद असलेला सरदारवर्ग रानात विश्रामगृहे बांधत असे. शहरातील गजबजाटापासून काही काळ दूर राहण्यासाठी प्रशस्त व्हिले, शातो, शॅले इ. बांधण्यात येत. यंत्रयुगात शहरांतील लोकसंख्या बेसुमार वाढल्याने घरांची टंचाई निर्माण झाली. त्यांतून सर्व सुखसोयींनी युक्त अशा वेश्मगृहांची (अपार्टमेंट) बांधणी जगातील सर्व प्रमुख शहरांतून होत असलेली आढळते. उपनगरांत जमिनींच्या किंमती तुलनात्मक दृष्टीने कमी असल्याने व स्थानिक नियमांमुळे ‘टेरेस’ पद्धतीची घरे बांधलेली दिसतात. हा गृहप्रकार प्रामुख्याने पाश्चिमात्त्य देशांत आढळतो. राजवाडा हा गृहप्रकार पूर्वापार चालत आलेला आहे. आज लोकशाहीप्रधान देशांतही लोकनियुक्त राष्ट्रपतींसाठी अशा भव्य वास्तू बांधलेल्या आढळतात.

इतिहास : प्राथमिक गृहरचना : अश्मयुगीन आदिमानव हा गुहामानव होता. दिवसा तो वन्य प्राण्यांची शिकार करून माध्यान्ही व रात्री गुहांचा आश्रय घेत असे. वन्य पशूंपासून संरक्षण व्हावे, म्हणून गुहेच्या तोंडाशी तो मोठी शिळा अथवा झडप ठेवीत असे. काही आदिम गुहांच्या भिंतीवर व छतांवर प्राण्यांची तसेच शिकारीची वगैरे चित्रे रंगवलेली आढळतात. उदा., यूरोपमधील अल्तामिरा, लॅस्को इ. ठिकाणी असलेल्या गुहा. कालांतराने मानवाला उपजीविकेसाठी भटके जीवन व्यतीत करावे लागले. त्याचप्रमाणे तो गाई, शेळ्या, मेंढ्या वगैरेंची जोपासना करू लागला. या अवस्थेमध्ये त्याने बांबू व फांद्या यांचा सांगाडा करून व त्यावर कातड्याचे आवरण चढवून तंबू तयार केले. अशा तंबूंच्या बाहेर दगडामध्ये खोदलेल्या चित्रविचित्र शिल्पाकृती ठेवून तो वन्य प्राणिमात्रांना वस्तीपासून दूर ठेवत असे. या प्रकारच्या तंबूंमध्ये उत्तर अमेरिकेतील रेड इंडियन जमातीतील ‘विग्‌वॅम’ नामक तंबू उल्लेखनीय आहेत. यानंतरच्या काळात दगडावर दगड रचून तयार केलेल्या गोलाकार मधमाश्यांच्या पोळ्याच्या आकाराच्या झोपड्या, तसेच झाडाच्या फांद्यांची वा बांबूंची मोठी टोके जमिनीत रोवून व निमुळती टोके वरच्या बाजूस बांधून त्यांवर पालापाचोळ्याने शाकारलेल्या झोपड्या वापरात आल्या. नंतरच्या काळात वेताच्या अथवा कुडाच्या भिंतीवर मातीचे थर लेपून वर तशाच प्रकारचे धाब्याचे छप्पर असलेली झोपडी निर्माण झाली. अशा झोपडीच्या भिंतींवर आतून आणि बाहेरून नाना प्रकारची चित्रे कोरलेली वा रंगवलेली असत. आजही जगाच्या मागासलेल्या भागांत अशा तऱ्हेच्या झोपड्या आढळतात. सयाम, बोर्निओ इ. प्रदेशांतील पूरग्रस्त विभागांत लाकडी खांबांवर आधारलेल्या झोपड्या आढळतात तर एस्किमोंच्या बर्फमय प्रदेशात बर्फाचे चिरे एकमेंकावर रचून बनविलेल्या घुमटाकार ‘इग्लू’ नामक गृहांची रचना आढळते. या प्राथमिक गृहरचनेस मानवी समूहवृत्तीचे अधिष्ठान आहे. सरोवरे, विहिरी, तळी अशा पाणीपुरवठ्याच्या भोवती त्या वस्त्या असत. 

(१) विन्नेबागो जमातीचा ‘विग्‌वॅम’ तंबू, उत्तर अमेरिका. (२) मोन्‌व्हू जमातीची गोलाकार झोपडी, काँगो. (३) बुशमन जमातीची मधाच्या पोळ्यासारखी झोपडी, दक्षिण आफ्रिका.


प्राचीन ईजिप्शियन गृहरचना

प्राचीन काळ : ईजिप्तमध्ये सु. पाच हजार वर्षापूर्वी विटांनी अथवा मातीने लिंपलेल्या कुडांची घरे बांधीत. उष्ण हवामान व थोडा पाऊस यांमुळे त्यांवर धाब्याचे छप्पर असे. एकूण बांधणी मोकळ्या हवेशीर जागेसाठी योग्य अशी असे. अशा घरांत धान्यादी सामानासाठी कोठारेही असत. भिंतींना खिडक्यांऐवजी लहान झरोके असत. धनिकांची घरे सु. २० चौरस मी. असून, त्यांभोवती संरक्षणार्थ उंच भिंती असत. भिंतीलगत ओवऱ्या असून मध्यभागी अर्धाच्छादित बगीचा असे. अशा तऱ्हेची घरे अरुंद रस्त्यांच्या दुतर्फा बांधलेली होती. प्रासादसदृश्य भव्य घरात पाण्याचे हौद असत. घरांच्या भिंतीवर गडद रंगात चित्रे काढत. प्राचीन ईजिप्तमधील गृहरचना पिरॅमिड, थडगी, मंदिरे यांच्या तुलनेने वास्तुदृष्ट्या दुय्यम दर्जाची होती. ह्याचे कारण, ईजिप्शियनांमध्ये मृतांची निगा आणि ईश्वरोपासना यांच्या तुलनेने व्यक्तिनिवासाची कल्पना गौण ठरत असावी. थडगी, मंदिरे यांचे बांधकाम दगडाचा वापर करून स्थायी स्वरूपात केले जाई, तर घरांच्या बांधकामात प्रायः भाजलेल्या विटांचा वापर केला जात असे. पुनर्जन्माविषयीच्या धार्मिक समजुतीतूनच पिरॅमिड अथवा ‘मस्ताबा’ नामक थडगी आपल्या हयातीतच बांधण्यात धनिकवर्ग अधिक पैसा खर्च करीत असे.

सुमेरिया, पर्शिया (इराण) इ. मध्यपूर्वेतील देशांत सु. तीन हजार वर्षांपूर्वी गरिबांच्या घरांना विटांच्या भिंती व घुमटाकार छप्पर असे. अशा झोपड्यांमध्ये सहसा एकच खोली असे. मध्यम वर्गीयांत अनेक मजली चाळीवजा घरे व धाब्याचे छप्पर असलेली छोटी घरे असे दोन प्रकार बहुधा आढळतात. राजवाड्यांची बांधणी सु. १५ मी. उंच चौथऱ्यावर करीत. त्यांत चौकांभोवती लहानमोठ्या लांब व अरुंद अशा अनेक खोल्यांची योजना असे. दर्शनी भागांवर चिनी मातीच्या रंगीत लाद्यांचे (एन्‌कॉस्टिक टाइल्स) नक्षीकाम केलेले असे. भिंतींच्या खालच्या भागावर दगडी कोरीवकाम असून त्यात शिकारीची व लढाईची दृश्ये असत. राजवाड्यांभोवती प्रचंड भिंती असून, प्रवेशमार्गी मानवशीर्षधारी सिंहाची प्रचंड दगडी शिल्पे असत.

ग्रीसमध्ये ख्रिस्तपूर्व काळात शेतकरीवर्ग प्रायः विटांची लहान घरे बांधीत असे. अशा घरांना एकच खोली असे व तिच्यावरील उतरत्या छपरात मध्यभागी धुराडे असे. मध्यमवर्गीय लोक अनेकमजली चाळीवजा घरांत वास्तव्य करीत. धनिकवर्गाच्या घरांना अनेक चौक व विभाग असत. घरांच्या दर्शनी भागांवर देवालयासमान दगडी खांब असत. आतील भिंतीवर चित्रे असत. संगमरवरी पुतळे आणि पडदे यांचीही ते योजना करीत.

ख्रिस्त शकाच्या सुरुवातीस रोममध्ये गरीब वस्तीत सात मजल्यांच्या इमारती असून त्यांत अरुंद व अंधाऱ्या खोल्या असत. श्रीमंतांच्या घरांत प्रवेशमार्गानंतर दोन चौक असत व त्यांभोवती निरनिराळ्या खोल्यांची रचना केलेली असे. आतील चौकाभोवती शयनगृहादी खाजगी भागांची रचना केलेली असे. दोन्ही चौकांच्या मध्ये जलकुंड असे त्यामुळे सभोवतालचा भाग थंड राहत असे. इतरत्र संगमरवरी पुतळे ठेवलेले असत. पाँपेई येथील उत्खननात सापडलेल्या एका घरात सुरेख भित्तिचित्रे आढळली आहेत. 

मध्य अमेरिकेतील माया व मेक्सिकोच्या खोऱ्यातील ॲझटेक या प्राचीन संस्कृती विशेष प्रगत होत्या. त्यांची गृहरचनाही वैशिष्ट्यपूर्ण होती. माया समाजात घरांना ‘ना’ म्हणत. ही घरे एकमजली, साधी व आटोपशीर असत. त्यांचा आकार चौरस किंवा गोलाकार असे. त्यांचे बांधकाम दगडी चौथऱ्यावर केलेले आढळते. त्यावरील भिंती लाकडी वाशांच्या चौकटीत मातीचा गिलावा करून बांधीत. त्यांवर पालापाचोळ्याने अथवा झावळ्यांनी शाकारलेली उतरती छपरे असत. घरांच्या भिंती आतून व बाहेरून आकर्षकपणे रंगवीत असत. अशा घरांना बहुधा एकच मोठी खोली असे. तीत एका बाजूस झोपण्याची व दुसऱ्या बाजूस स्वयंपाकाची सोय असे. कधीकधी मधोमध एखादी भिंत असे. घराला फक्त एकच प्रवेशद्वार असे पण त्याला बहुधा झडप लावीत नसत. ही घरे साधारणतः पाचव्या शतकाच्या सुमारास आढळतात. ॲझटेक घरे बहुधा एकमजली व क्वचितच दुमजली असत. ती चौरस असून त्यांची रचना मध्यवर्ती चौकांभोवती केलेली असे. त्यांत कुटुंबियांच्या निवासाखेरीज धान्याची कोठारे तसेच गुलामांसाठी खोल्या असत. बांधकाम बहुधा दगडी चौथऱ्यावर आधारलेले असे. त्यावर कच्च्या विटांच्या भिंती बांधीत. या घरांना सामान्यतः खिडक्या नसत. स्वयंपाकघराला धूर जाण्यासाठी दरवाजाखेरीज अन्य साधन नसे. स्वयंपाकघराशेजारीच सोपा अथवा पडवी असे. घरांवर छपरासाठी लाकडी तुळयांची योजना केलेली आढळते. त्यांवर चुन्याचा गिलावा पसरीत. हवा व उजेड येण्यासाठी एकाला लागून एक अशा दोन खोल्यांची रचना करीत. ही घरे चौदाव्या-पंधराव्या शतकांत आढळून येतात. 

मध्ययुग : मध्ययुगीन यूरोपमध्ये रानटी टोळ्यांच्या उपद्रवामुळे असुरक्षिततेचे वातावरण होते. त्यामुळे गृहरचनेमध्ये संरक्षणव्यवस्थेस अधिक महत्त्व प्राप्त झाले. अशा पद्धतीच्या घरांमध्ये एकांताचा पूर्ण अभाव असे. सर्वसामान्य लोक दगडी भिंतींवर शाकारलेले छप्पर असलेल्या अरुंद झोपड्यांतून वास्तव्य करीत. जमीनदार व सरदार वर्ग मजबूत दगडी भिंती असलेल्या किल्लेवजा घरांत राहत असत. या घरांना मध्यभागी एक रुंद दिवाणखाना असे. त्याच्या मध्यभागी शेकोटी असे. अवतीभोवती जमीनदारांचे आश्रित राहत. जमीनदार व त्यांचे कुटुंबीय एका उंच चौथऱ्यावर जेवत व स्वतंत्र खोलीत झोपत. इंग्लंडमध्ये तेराव्या शतकात समप्रमाण काष्ठरचनेची (हाफटिंबरिंग) घरे निर्माण झाली. ती दोन अथवा तीन मजली असून त्यांत लाकडी सांगाड्यामध्ये विटांचे बांधकाम करीत. अशा गृहांचे बाहेरील लाकूडकाम उभ्या, आडव्या, तिरकस अथवा कमानीच्या आकाराच्या चौकटीचे असे. त्यानंतरच्या शतकात तेथे ‘मॅनॉर हाउस’ नामक गृहप्रकार रूढ झाला. त्याच्या मध्यभागी प्रशस्त अंगण व त्यासमोर मोठा महाल असे. त्याच्या एका बाजूस खाजगी चर्च असे. महालाच्या भिंतीवर शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी, शिंगे इ. तसेच ढाल, तलवार, भाले आदी शस्त्रे यांची मांडणी केलेली असे. छपरांच्या कैच्यांवर अप्रतिम नक्षीकाम आढळते. अशा प्रकारच्या छपरांच्या गृहप्रकारांत ताणतुळईविरहित कैचीच्या (हॅमरबीम) छपराचा प्रकार लक्षणीय होता. अशा गृहांच्या सभोवती खंदक खणलेले असत व रहदारीसाठी उचलपुलाची (ड्रॉ ब्रिज) योजना असे.


प्रबोधनकाळ : प्रबोधनकाळात इटलीमधील फ्लॉरेन्स, व्हेनिस इ. शहरांत प्रासादसदृश गृहरचना निर्माण झाली. फ्लॉरेन्ससारख्या शहरांत शत्रुप्रतिकारार्थ अरुंद रस्त्यांची योजना केलेली असे. व्हेनिस शहरातील प्रासाद अरुंद कालव्यांच्या दुतर्फा बांधलेले असत. त्यांच्या दर्शनी भागांमध्ये कोरीव खांब व अर्धवर्तुळाकार कमानी यांची सुरेख सांगड घातलेली असे. वरच्या मजल्यावर प्रशस्त सज्जे असत. कालव्यातील जलाशयात पडणाऱ्या प्रतिबिंबामुळे हे प्रासाद अतिशय विलोभनीय दिसत. ह्या काळातच व्हिर्चेत्सा येथे आन्द्रेआ पाललाद्यो (१५०८–८०) या वास्तुशिल्पज्ञाने बांधलेला ‘व्हिला काप्रा’ किंवा ‘रोतोंदा’ (१५६७) हा प्रासाद विशेष उल्लेखनीय आहे. या प्रासादाची रचना अत्यंत साधी व प्रमाणबद्ध होती. त्याच्या चारी बाजूंस प्रशस्त ओट्या असून मध्यभागी गोलाकार महालावर घुमटाकार छप्पर असे. याच धर्तीवर फ्रान्स, इंग्लंड इ. देशांतही प्रासाद बांधले गेले. रोम शहराच्या परिसरातही व्हिल्याच्या धर्तीवर अनेक प्रासाद बांधलेले आढळतात. बहुधा दुमजली असलेल्या ह्या प्रासादांच्या आसमंतात विस्तीर्ण बगीचा असे. त्यात संगमरवरी पुतळे, कारंजी, रुंद चौथरे व फुलांचे सुबक ताटवे असत.

सतरावे-अठरावे शतक : इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात विस्तीर्ण जागेमध्ये प्रासादसदृश घरे वा गढ्या (कंट्री मॅन्शन्स) बांधण्याची प्रथा होती. अशाच प्रकारचा एक प्रासाद ‘ब्लेनम पॅलेस’ (१७०५–३५) हा मार्लबरोच्या ड्यूकना, फ्रान्सवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ इंग्लिश जनतेने भेट दिला होता. सर जॉन व्हॅनब्रू (१६६४–१७२६) या वास्तुशिल्पज्ञाने बांधलेल्या या प्रासादाला तीन प्रमुख दालने होती. त्यांपैकी मधल्या दालनात एक मोठा दिवाणखाना असून त्याच्या दोन्ही बाजूंस चौकाभोवती अनेक खोल्यांची योजना केली होती. डाव्या बाजूच्या दालनात एक छोटे चर्च, घोड्यांची पागा, गुरांचे गोठे वगैरे होते. त्याचप्रमाणे स्वयंपाकगृह व नोकरवर्गाच्या राहण्याची सोय होती. शिवाय त्याच्या परिसरात बगीचा होता. आजमितीस हा प्रासाद संग्रहालय म्हणून पहावयास मिळतो. फ्रान्समधील शातोही ह्याच धर्तीवर बांधलेले दिसतात. त्यांपैकी ‘शातो दी शाँबॉर’ या प्रासादाची वास्तुरचना मध्ययुगीन असून दर्शनी भाग मात्र प्रबोधनकालीन आहे. सतराव्या-अठराव्या शतकांतील फ्रेंच राज्यकर्त्यांचे पॅरिस व त्याच्या आसमंतातील, लूव्ह्‌र ट्‌वीलरीझ, व्हर्साय इ. प्रासाद विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी लूव्ह्‌रचे बांधकाम तेराव्या शतकाच्या सुमारास सुरू झाले व पुढे तीन-चार शतके ते चालू होते. त्याचे निरनिराळे भाग अनेक फ्रेंच राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत दहा वास्तुशिल्पज्ञांच्या देखरेखीखाली झाले. त्याचा विस्तार १८·२१ हे. क्षेत्रामध्ये असून, त्यात अनेक दालने व असंख्य खोल्या आहेत. अठराव्या शतकात फ्रेंच राज्यक्रांतीनंतर या राजप्रासादाचे रूपांतर कलासंग्रहालयात झाले. सध्या त्या ठिकाणी जागतिक चित्रकलेचे उत्कृष्ट नमुने पहावयास मिळतात.

चौदाव्या लुईने (१६३८–१७१५) व्हर्साय येथे ह्या काळातच बांधलेला राजप्रासाद कला दृष्ट्या विशेष लक्षणीय आहे. झ्यूल आर्दवॅं मांसार (१६४६–१७०८) या वास्तुकाराने लनोत्र ह्या स्थलशिल्पज्ञाच्या साहाय्याने या प्रासादाची वास्तुरचना पूर्ण केली. प्रासादाची लांबी सु. अर्धा किमी. असून त्याच्या भव्य आकारमानाप्रमाणेच, आतील व बाहेरील नक्षीकाम, प्रशस्त बगीचा, रुंद कालवे, संगमरवरी कारंजी, पुतळे इ. गोष्टी तत्कालीन फ्रेंच वैभवाची साक्ष देतात.

आधुनिक गृहरचना : विसाव्या शतकातील गृहांची रचना परंपरागत गृहांपेक्षा खूपच वेगळी आहे. आधुनिक गृहांमध्ये प्रामुख्याने प्रबलित सिमेंट-काँक्रीटची (आर्. सी. सी.) बांधणी असते. या बांधणीतील भिंतींच्या रचनेत उष्णता, थंडी, ध्वनी,उजेड, हवेचे संचलन, रंगसंगती इ. घटकांची सांगड घातली जाते व त्यासाठी काच, पोकळ विटा, प्लॅस्टीक, ॲस्बेस्टस इ. आधुनिक इमारत-साहित्यांचा वापर केला जातो. फ्रँक लॉइड राइट यांचे ‘फॉलिंग वॉटर’, पेनसिल्व्हेनिया (१९३६–३८) ‘टॅलिएसिन वेस्ट’, स्कॉट्सव्हिल (१९३८) ल कॉर्ब्यूझ्ये यांच्या ‘Villa Savoye’ ‘प्वासी’, (१९२९), ‘Unite’d Habitation’, मार्से (१९४७–५२) ह्या गृहरचना बकमिन्स्टर फुलरचा ‘डायमॅक्सिअन हाउस’ चा (१९२७) रचनाकल्प फिलिप जॉन्सनचे न्यू केनन येथील संपूर्णतः काचेचे बाह्य आवरण असलेले, ‘जॉन्सन हाउस’ (१९४९) ही आधुनिक गृहवास्तूंची काही उदाहरणे होत. यांखेरीज रिचर्ड नूट्र, आल्व्हार आल्तॉ, लूइस कान इ. वास्तुशिल्पज्ञांच्या आधुनिक गृहरचना वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

पौर्वात्य गृहरचना : मध्ययुगीन चीनमध्ये घरांची बांधणी बव्हंशी पॅगोडासारखी आढळते. ही घरे सर्वसाधारणपणे एकमजली असत व त्यांची बांधणी लाकडी सांगाड्यांत विटांच्या भिंती बांधून करीत. त्या काळी घरबांधणीसाठी नियम असत. राजप्रासाद नऊ विभागांचा असे, तर राजपुत्रांसाठी सात विभागांचे प्रासाद असत. सरदारांसाठी पाच विभागांचे प्रासाद बांधण्याची मुभा असे. सामान्य नागरिकांना फक्त तीन विभागांचीच गृहे बांधता येत. अशा घरांची छपरे खूप उतरती असून, त्यांवर रंगीबेरंगी कौले असत. काही ठिकाणी इमारतींवर विचित्र आकृत्या कोरलेल्या असत. नागरी विभागात प्रामुख्याने घराचे तीन भाग असत : पहिल्या भागात रस्त्यासमीप प्रवेशद्वार व ओसरी असे. त्यानंतर दिवाणखाना व खाजगी विभाग असत. शेवटी स्वयंपाकघर व नोकरांसाठी राहण्याची सोय असे. घराभोवतालच्या आसमंतात बागबगीचे वगैरे असत. 

जपानी घरांची बांधणी भूकंपाच्या सततच्या धोक्यामुळे एकमजली व अत्यंत हलक्या वजनाची असे. मोठ्या घरांत निरनिराळे विभाग असत. बहुतेक घरे लंबचौरस असून मध्यभागी चौक असे. या चौकात वैशिष्ट्यपूर्ण उद्यानरचना करीत असत. घरांची बांधणी लाकडी खांबांवर केलेली असे. छप्पर लाकडी सांगाड्याचे असून, ते गवताने शाकारलेले असे. खोल्यांची विभागणी सरकत्या लाकडी अथवा कागदी भिंतींनी करीत. जमिनीवर गवताच्या चटयांचे आच्छादन असे. ही घरे अंतर्बाह्य सजविलेली असत. जपानी घरबांधणीमध्ये साधारणतः १·८२ मी. X ०·९१ मी. ह्या आकाराची चटई हे रचनापरिणाम वापरले जाते. आधुनिक काळात फ्रँक लॉईड राइट यांनी टोकिओ येथे ‘इंपीरियल हॉटेल’ (१९१५ –२२ १९६८ मध्ये नामशेष) ही भूकंपास तोंड देऊ शकेल अशी वास्तू उभारली. आधुनिक तंत्राचा वापर करून जपानमध्ये गगनचुंबी हवेल्या, उपाहारगृहे वगैरे बांधली जात आहेत. जपानमधील गृहांभोवतीची उद्यानमांडणी विशेष उल्लेखनीय आहे. 

आशियातील मध्ययुगीन इस्लामी घरांची रचना बहुतांशी पौर्वात्य घरांप्रमाणेच मध्यवर्ती चौकांभोवती केलेली आढळते. या चौकांभोवती महत्त्वाच्या खोल्या असत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल्यांना लहान खिडक्या असून भक्कम गज असत. वरच्या मजल्यांवर मात्र मोठ्या खिडक्या असत. जनानखान्याची योजना आतील भागात असून तो इतर विभागांपासून अलग असे. उन्हाळ्यात बैठकीसाठी एक प्रशस्त महाल असून, त्याभोवती कारंजी असत. या प्रासादांतून संगमरवरी फरशी व जाळ्या वापरीत. 


भारतीय गृहरचना : वैदिक काळात वास्तुरचना हा एक धार्मिक विधी मानला जात असे. वास्तोष्पती ही वास्तूची अधिष्ठात्री वैदिक देवता असून, गृहरचनेच्या वेळी तिला आवाहन करण्याची प्रथा होती. अथर्ववेदात गृहस्वामिनी या देवतेचा निर्देश केलेला आढळतो. वास्तुपुरुष हे वास्तोष्पतीचेच एक रूप मानले जाते. वास्तुपुरुषास प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच घरातील यजमान व अन्य कुटुंबियांना दीर्घायुष्य, आरोग्य, निर्विघ्नता, संपत्तीइ. दृष्टींनी घर लाभदायक ठरावे म्हणून वास्तुशांतीसारखे धार्मिक विधी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतागायत चालत आलेली आहे. 

वैदिक वाङ्‌मयात गृह या संज्ञेशी समानार्थी अशा ‘आयतन’ (निवासस्थान), ‘हर्म्य’ (भव्य प्रासाद), ‘दुरोण’ (यज्ञगृह) इ. संज्ञा आढळतात. ऋग्वेदात वास्तुरचनेतील मोजमापांचे तसेच उंच व प्रशस्त घरांचे निर्देश आले आहेत. त्यांवरून तत्कालीन गृहरचना खूपच प्रगत असावी असे दिसते. प्राचीन गृहरचनेत द्वारांना विशेष महत्त्व असून द्वारपूजा रूढ होती. वास्तू स्तंभांवर अधिष्ठित असल्याने स्तंभांनाही प्राधान्य होते. घराच्या मध्यवर्ती एक स्तंभ असून तिथेच सर्व गृहविधी केले जात. गृहरचनेच्या वेळी म्हणावयाची काही सूक्ते अथर्ववेदात आहेत. त्यांत वास्तुशास्त्रातील अनेक पारिभाषिक शब्द आढळतात. तत्कालीन घरे विविध आकारांची असल्याचेही उल्लेख आढळतात. प्राचीन काळी लाकूड विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने, त्याचा वापर वास्तुरचनेत अधिक प्रमाणात होत असावा. त्या काळी घरे बांधण्यासाठी भाजलेल्या विटा वापरीत असल्याचेही उल्लेख ब्राह्मणग्रंथांत आढळतात. वेद व ब्राह्मणे यांतील वर्णनांवरून तत्कालीन वास्तुकलेचे प्रगत रूप जाणवत असले, तरी त्या काळी वास्तुशास्त्र असे निर्माण झाले नव्हते. गृह्यसूत्रांत वास्तुविषयक अनेक सिद्धांत आढळतात त्यांतूनच पुढे वास्तुशास्त्र उदयाला आले. वास्तुरचनेच्या संदर्भातील धार्मिक विधींचे वर्णन तसेच गृहरचनेसंबंधीची सामान्य तत्त्वे गृह्यसूत्रांत सांगितली आहेत. घरबांधणीसाठी योग्य जागा, पायाभरणी, घरबांधणीचा शुभकाल, गृहप्रवेशावेळचे विधी व मंत्र, ह्याचप्रमाणे घराला खोल्या कशा व किती असाव्यात, दारे कोणत्या दिशांना असावीत, घराभोवती कोणते वृक्ष लावावेत इत्यादींसंबंधीची माहिती त्यात आली आहे. घराचे दार कोणत्या दिशेला असावे, ह्या गोष्टीला त्या काळी विशेष महत्त्व होते. त्यात उजेड, हवा भरपूर असावी ही वास्तुशास्त्रीय दृष्टी होतीच शिवाय त्यामागे काही धार्मिक संकेतही होते. दार पूर्वाभिमुख ठेवल्यास कीर्ती व शक्ती यांचा लाभ, उत्तराभिमुख ठेवल्यास संतती व पशुधन यांची प्राप्ती, दक्षिणाभिमुख असल्यास सर्व चांगल्या गोष्टींची प्राप्ती व पश्चिमाभिमुख ठेवल्यास हानी, असे संकेत रूढ होते. रामायण, महाभारत  या ग्रंथांमध्येही तत्कालीन गृहप्रकारांचे निर्देश आढळतात. रामायणात सात-आठमजली प्रासाद आणि तोरणे, स्तंभ, शिखरे, गवाक्षे आदींच्या उपयोजनाने केलेले त्यांचे सुशोभन ह्यांसंबंधीचे उल्लेख आढळतात. महाभारतकाळात वास्तुरचनेच्या वेळी होमहवन करण्याची प्रथा होती. शांतिपर्वात घरे व प्रासाद यांचे विविध प्रकार वर्णिले आहेत. वास्तुरचनेतील विविध पारिभाषिक शब्द तसेच वास्तुशोभनाची वर्णनेही त्यात आढळतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात घरे, घरांची जागा, आराम-भवने अशा अनेक अर्थांनी वास्तू हा शब्द वापरलेला दिसतो. त्याचप्रमाणे राजप्रासाद कुठे असावा, घरे कशी बांधावीत यांचे तसेच स्तंभ, द्वारे इत्यादींविषयीचे विवेचन त्यात आले आहे. याखेरीज मत्स्यपुराण, बृहत्संहिता, गरुडपुराण, मानसार, समरांगणसूत्रधार  इ. ग्रंथांतून प्राचीन काळातील विविध गृहप्रकारांचे वर्णन आढळून येते. 

भारतामध्ये विभिन्न हवामान व प्राकृतिक भेद यांमुळे भिन्न भिन्न गृहप्रकार आढळून येतात. त्यांतील सर्वांत जुना, ख्रि. पू. ३००० वर्षांच्या काळातील गृहप्रकार सिंधू नदीच्या खोऱ्यातील मोहें-जो-दडो येथे आढळला. ही घरे दुमजली व सु. ९ ते १० मी. लांब-रुंद होती. त्यात भुयारी गटारांचीही सोय होती. प्राचीन काळी बौद्ध भिक्षू डोंगरकपारींतील ‘विहारां’तून वास्तव्य करीत. सु. ५ ते १५ मी. चौरस गुहेच्या दर्शनी भागात एक विस्तृत सज्जा असे. त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या भव्य आकृत्या असत. गुहेच्या दोन्ही बाजूंस निवासासाठी लहानलहान खोल्या असत. गुहेच्या मध्यभागी भगवान बुद्धाची मूर्ती असे. नालंदा येथील बौद्धविहार अनेकमजली होते. 

सर्वसाधारणपणे भारतीय लोक विटांच्या अथवा मातीच्या भिंती असलेल्या एकमजली अथवा दुमजली घरांत राहत असत. घराच्या आतील रचना लाकडी खांब व तुळया यांच्या सांगाड्याची होती. त्यांच्यामधील भिंतीत जिने, कपाटे यांची योजना असे. धान्य वगैरे साठविण्यासाठी जमिनीखाली बळदे बांधलेली असत. गृहांच्या आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी आड अथवा विहीर व इतर कामासाठी दुसरी विहीर यांची योजना असे. प्राणवायूच्या पुरवठ्यासाठी अंगणात कडुनिंबाचा वृक्ष लावत असत. घरांच्या भिंतींवर आणि दरवाज्यांवर गणपती, चंद्र, सूर्य, अश्वमुख यांची रंगीत चित्रे अथवा कोरीवकाम आढळते. छपरे धाब्याची असून ती उतरती असत. ही घरे अत्यंत आटोपशीर असून, त्यांची रचना बहुधा मध्यवर्ती चौकांभोवती केलेली आढळते. हिंदूंच्या घरांत तुळशीवृंदावनांची योजना असे. धनिकांची घरे प्रशस्त असून त्यांची बांधणी दुमजली वा अनेकमजली असे. त्यांत दोन अथवा तीन मध्यवर्ती चौक असत. प्रवेशस्थानी एक भव्य कमान असे. या कमानीत दिंडीदरवाजा असलेले भव्य प्रवेशद्वार असे. प्रवेशद्वाराजवळच दिवाणखाना व कचेरी अथवा पेढी असे. खाजगी विभाग वरच्या मजल्यांवर असत. मागील भागात स्वयंपाकघर, धान्यकोठार व शस्त्रागार तसेच नोकरांसाठी खोल्या असत. तळमजल्यावर प्रशस्त पूजागृह असे. अशा घरांभोवती संरक्षणार्थ उंच व मजबूत कोट असे. उत्तरेकडे काश्मीर, कुलू, कांग्रा आदी भागांत दुमजली लाकडी घरे आढळतात. त्यांतील खांब, तुळया व दरवाजे यांवर अप्रतिम कोरीवकाम केलेले आढळते. ग्रामीण विभागात तऱ्हेतऱ्हेच्या झोपड्या आढळतात. त्यांत निलगिरी पर्वतराजीतील तोडा जमातीच्या गोल झोपड्या विशेष उल्लेखनीय आहेत. मध्ययुगीन मदुरेतील तिरुमल नायक या राजाचा प्रासाद वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात भव्य दालने व खोल्या यांची योजना आढळते. तसेच भव्य लाकडी खांब व दगडी कमानीही आढळून येतात. राजपूत व मोगल सम्राटांचे भव्य दगडी प्रासाद भारतीय वास्तुवैभवाची साक्ष देतात. हे प्रासाद बहुधा नदीकिनारी बांधलेले असत. काही प्रासाद तलावाच्या भोवती व मध्यभागीही आढळतात. त्यांची बांधणी संगमरवरी अथवा लाल दगडांत केलेली असून, त्यांत राजनीतीस अनुसरून राज्यकारभारासाठी तसेच खाजगी निवासासाठी अनेक प्रशस्त दालने असत. जयपूर, उदेपूर येथील राजपूत प्रासाद तसेच आग्रा, दिल्ली येथील मोगल प्रासाद ह्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. यांखेरीज फतेपुर-सीक्री येथील राजा बिरबलाचे लहानसे निवासस्थान व मिरिअमचे घर, जोधाबाईचा राजवाडा ही साध्या प्रमाणबद्ध गृहरचनेची खास उदाहरणे होत. 


महाराष्ट्रात अठराव्या शतकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी वाड्यांची उभारणी झाली. अशा वाड्यांत पुण्यातील शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा ही पेशव्यांची निवासस्थाने तसेच रास्ते, चिपळूणकर आदी सरदारांचे वाडे उल्लेखनीय होत. अशाच तऱ्हेचे वाडे नासिक, सातारा, कोल्हापूर इ. ठिकाणीही बांधण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील महादजी शिंदे यांचा वाडा, मेणवली येथील नाना फडणीसांचा वाडा इ. प्रसिद्ध आहेत. अशा वाड्यांची रचना धनिकांच्या हवेल्यांसारखी मध्यवर्ती चौकाभोवती केलेली असे. बहुतेक चौकांच्या मध्यभागी पुष्करणी असत. या वाड्यांचा विस्तार बराच मोठा असे. त्यांत वेगवेगळ्या चौकांभोवती महालांची रचना केलेली असे. सभोवती उंच कोट असत. त्यांत सर्वसाधारणपणे चार दिशांना  चार महत्त्वाची प्रवेशद्वारे असत. अशाच प्रकारची रचना लहान वाड्यांतही आढळते. लहान वाड्यांत बहुधा दोन चौक असत. त्यांभोवती रुंद विटांच्या भिंतींवर लाकडी तुळया ठेवून, त्यांवर लाकडी छप्पर बांधीत असत. विटांच्या भिंती इतक्या रुंद असत, की अनेकदा त्यांतच जिन्याची सोय केलेली असे. दर्शनी भागात लाकडी कोरीवकाम केलेले सज्जे असत. यातील चौकांत शोभिवंत लाकडी खांब असत. या खांबांना आग्रा पद्धतीची, सुरूच्या झाडांच्या आकाराची शोभिवंत घडण दिलेली होती. खांबांच्या मध्ये महिरप टाकून त्यांस आगळी शोभा आणली जात असे. त्यांपैकी काही वाडे आजही अस्तित्वात आहेत.

ब्रिटिश काळात भारतात त्या काळी यूरोपात रूढ असलेली प्रबोधनशैलीची घरे प्रामुख्याने बांधली गेली. भारतातील सधन व्यापारी, संस्थानिक यांसारखे लोक गृहरचनेचे आराखडे फ्रान्स, इंग्लंड या देशांतून मागवीत असत तसेच त्या देशांतून प्रवास करताना वास्तुकलेवरील पुस्तके खरेदी करीत व त्यांना अनुसरून घरे बांधीत. ब्रिटिश काळात भारतातून जे वास्तुविशारद वास्तुकलेचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स या देशांत गेले, त्यांनी भारतात परतल्यावर प्रबोधनशैलीची घरे बांधली. घराच्या स्तंभरचना, दारे, खिडक्या, जिने, छपरे इत्यादींना ग्रीक, रोमन, गॉथिक या वास्तुशैलींनुसार घाट देण्यात येई. ब्रिटिश सरकारने बँका, कचेऱ्या यांसारख्या सार्वजनिक इमारतींच्या बांधकामासाठी इंग्लंडमधून वास्तुविशारद आणले. त्यांनी यूरोपात त्या काळी प्रचलित असलेली वास्तुशैली भारतात रूढ केली. अशा शैलीच्या इमारती भारतातील मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास या मोठ्या शहरांत तसेच बडोदे, म्हैसूर, हैदराबाद यांसारख्या संस्थानी राजधान्यांत उभारण्यात आल्या. मुंबईतील मलबार हिल, खंबाला हिल, फोर्ट, भायखळा, परळ, बॅलार्ड पिअर इ. भागांत अव्वल इंग्रजीतील वास्तुरचना आजही पहावयास मिळतात. बोरीबंदरनजीक असलेले ‘टाटा पॅलेस’ हे अशा वास्तूंचा एक नमुना होय. कालांतराने अशा भव्य घरांच्या जागी अनेक मजली वेश्मगृहांची निर्मिती झाली व आजही ती बव्हंशी प्रचारात आहेत. वैज्ञानिक प्रगतीमुळे विजेचा वापर सर्वत्र होऊ लागला त्यामुळे वातानुकूलित सदनिका (फ्लॅट्‌स) अलीकडच्या काळात निर्माण होऊ लागल्या आहेत. गेल्या शतकातील चाळींच्या जागी आता सहकारी पद्धतीने बांधलेल्या सदनिका येऊ लागल्या आहेत. जमिनीच्या वाढत्या किंमती आणि अफाट लोकवस्ती यांमुळे शहरांतून गलिच्छ वस्त्यांची व झोपडपट्ट्यांची वाढ होऊ लागली आहे. नगररचनेच्या नव्या योजनेत या वस्त्यांचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

पहा : इमारती व घरे गृहनिवसन, कामगारांचे. 

संदर्भ : 1. Bemis, Albert FarWell Burchard, John, The Evolving House, 3. Vols., Cambridge,      Mass., 1936.  

           2. Cantacuzino, Sherban, Modern Houses of the World, New York, 1964.  

           3. Creighton, T. H. Ford, K. M. Contemporary Houses, New York, 1961.  

           4. Kennedy, R. W. The House and the Art of its Design, New York, 1953. 

देवभक्त, मा. ग.

आद्य वेश्मगृहाचे अवशेष, प्यूब्लो संस्कृती, न्यू मेक्सिको, ख्रि.पू. १ ले सहस्रक

एस्किमोंचे ‘इग्लू’, कॅनडा

‘शाती दी शाँबॉर’, फ्रान्स, सु. १५१९–३७


‘व्हिला काप्रा’ किंवा ‘रोतोंदा’, व्हिचेंत्सा (१५६७)–आंद्रेआ पाललाद्यो

समप्रमाण काष्ठरचनेच्या घराचा नमुना (शेक्सपिअरचे जन्मस्थान, स्ट्रॅटफर्ड ऑन ॲपव्हन) – १६ वे शतक.

जपानी खेड्यातील पारंपरिक गृहरचना

‘व्हिला सव्हॉय’, प्वासी (१९२९) – ल कॉर्ब्यूझ्ये

‘ब्लेनम पॅलेस’, ऑक्सफर्डशर (१७०५-३५) – सर जॉन व्हॅनब्रू

जयपूरचा राजवाडा

विश्रामबाग वाडा, पुणे

‘लेक पॅलेस’, उदयपूर

कोकणातील घर

औद्योगिक कामगारांचे गाळे, इलचकरंजी

भोर येथील राजवाड्याचा दर्शनी भाग

‘निसेन हट’: पानशेत प्रलयग्रस्तांच्या तात्पुरत्या झोपड्या, पुणे.

प्राचीन रोमन घराचे मध्यदालन (एट्रिअम) पाँपेई, इ.स. १ ले शतक.

‘उषाकिरण’ : मुंबईतील एक उत्तुंग गृहवास्तू.