नेमिनाथाचे मंदिर : बाजूचे गर्भगृह, दिलवाडा, तेरावे शतक.

दिलवाडा : राजस्थान व गुजरात यांच्या सीमेवरील अबूनजीक चंद्रावती हे प्राचीन जैन तीर्थ होते. इ. स. १००० नंतर तेथून जवळच, अबू पर्वतावरील दिलवाडा येथे काही जैन मंदिरे बांधण्यात आली व हे स्थानही तीर्थयात्रेचे स्थान म्हणून प्रसिद्धी पावले. या ठिकाणची चार मंदिरे प्रसिद्ध आहेत : विमल–वसही (आदिनाथ, इ. स. १०३२), लूण–वसही (नेमिनाथ, १२३०), आदिनाथ (चौदावे शतक) आणि खडतर–वसही (चौमुख, पंधरावे शतक). यांपैकी बहुतेक मंदिरांचा नंतरच्या काळात जीर्णोद्धार झालेला असला, तरी जीर्णोद्धार करणाऱ्या कलावंतांनी मूळ शैलीबरहुकूम काम केलेले असल्याने फारशी कलात्मक हानी झालेली नाही. या मंदिरांच्या छतांवरील शिल्पकाम फारच सुंदर आहे. जगातील अप्रतिम अशा वास्तु–छतांमध्ये या छतांची गणना केली जाते. नाजूक व गुंतागुंतीची शिल्परचना व भौमितिक परिपूर्णता साधण्याचा प्रयत्न ही त्याची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. या मंदिरांपैकी विमल–वसही व लूण–वसही ही मंदिरे अत्यंत सौष्ठवपूर्ण व अप्रतिम शिल्पांनी युक्त आहेत. गुजरातमध्ये प्रचलित असणाऱ्या सोळंकी वास्तुशैलीचे हे उत्तम नमुने मानले जातात. दोन्ही मंदिरे पांढऱ्या संगमरवरी पाषाणात बांधलेली असून दोन्हींतही वास्तुशिल्पापेक्षा मूर्तिशिल्पालाच अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे. विमल–वसही हे मंदिर राणा भीमदेवाचा मंत्री विमलशा याने बांधविले तर लूण–वसही हे मंदिर वीरधवलाचे मंत्री तेजपाल व वास्तुपाल यांनी बांधविले. दोन्हींची रचना इतकी सारखी आहे, की वरवर पाहताना लूण–वसही ही विमल–वसहीची प्रतिकृतीच वाटावी परंतु शिल्पातील चैतन्य आणि जोम या दृष्टीने विमल–वसहीच अधिक लक्षणीय ठरते. त्याचेच थोडे सविस्तर वर्णन पुढे दिले आहे : मंदिराचे विधान परंपरागत स्वरूपाचे आहे. गाभारा, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप या सर्वांभोवती प्राकार आहे. मंदिराची वास्तू २९·८७ मी. लांब आणि १२·८० मी. रुंद आहे, तर आवार ४२·६७ मी. X २७·४३ मी. आहे. प्राकाराच्या भिंतीला लागून आतल्या बाजूला छोट्या बावन्न देवळ्या असून त्या प्रत्येकीत आदिनाथाची मूर्ती बसविलेली आहे. प्रवेशाद्वारासमोर एक ‘हस्तिशाला’ उभारलेली असून तीमध्ये विमलशा व त्याचे दहा पूर्वज यांचे गजारूढ पुतळे आहेत. मंडपाची आखणी फुलीच्या आकाराची आहे. मधला चौक मोठा असून त्याच्या तिन्ही बाजूंना ओवऱ्यांसारखा भाग आहे. मंदिराचा सर्वच अंतर्भाग–स्तंभ, तुला, द्वारशाखा इ. –कोरीवकामाने मढविलेला आहे. मधील चौकात आठ मोठे स्तंभ, त्यांवर छोटे स्तंभ व तुलाभार आणि त्यांना जोडणारे कर्ण तसेच छताचा घुमट या सर्वांवर बारीक मूर्तिकाम आहे. कोरीवकामात वेलपत्ती किंवा भौमितिक नक्षी यांच्यापेक्षा मानवी आकृतीला प्राधान्य आहे. ती अनेक रूपे लेऊन अवतरली आहे कोठे नर्तकीचे तर कोठे वृक्षदेवीचे. पण सर्वाधिक सापडतात, त्या जिनमूर्ती. नर्तकीच्या व इतर सुट्या मूर्तीच्या जोडीला जिनचरित्रातील प्रसंगांचेही चित्रण केलेले आहे. एक एक मूर्ती जोरकस व लालित्यपूर्ण आहे, पण त्यांची संख्या इतकी अफाट आहे, की त्या संख्येच्या भारानेच प्रेक्षक दबून जातो. तपशिलाचा अतिरेक हे या देखण्या शिल्पाचे फार मोठे वैगुण्य समजावे लागते.

माटे, म. श्री.