‘व्हाइस्-रॉय हाउस’, नवी दिल्ली, १९१३-३०.लट्येन्झ, एडविन लँड्सीर : (२९ मार्च १८६९ – १ जानेवारी १९४४). प्रख्यात ब्रिटिश वास्तुशिल्पज्ञ. जन्म लंडन येथे. त्याचे वडील चित्रकार होते. त्याचे शिक्षण ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’, लंडन येथे झाले. तत्कालीन प्रसिद्ध वास्तुकार सर अर्नेस्ट जॉर्जकडे त्याने सुरुवातीला वास्तुकलाविषयक अनुभव घेतला. त्याच कार्यालयातील सहकारी हर्बर्ट बेकरशी त्याची घनिष्ट मैत्री झाली. त्याला वयाच्या अठराव्या वर्षीच उद्यानवास्तुशिल्पज्ञ गर्ट्रड जेकील या स्त्रीचे खेड्यातील घर बांधण्याची पहिले काम मिळाले. येथील कार्यानुभव व जेकीलचे मार्गदर्शन यांमुळे लट्येन्झच्या शैलीला वेगळे वळण लाभले. त्या धर्तीवर त्याने काही छोटेखानी टुमदार बंगले बांधले.  त्यांची रचना ‘निओ-जॉर्जियन’ या ब्रिटिश शैलीत होती. १९०७ ते १९०९ च्या दरम्यान लट्येन्झने हॅम्पस्टीड गार्डन सबर्ब येथे दोन चर्चवास्तू, एक संस्थावास्तू आणि अनेक घरे बांधली. लंडन शहरात ‘ब्रिटॅनिक हाउस’ (१९२६), ‘फिन्सबरी सर्कस’, ‘मिडलँड वँके’ची प्रमुख कचेरी इ. शासकीय वास्तूंची रचना केली. ऑक्सफर्डमध्ये त्याने ‘कॅम्पियन हॉल’ची (१९३४) रचना केली. तसेच १९१० मध्ये रोम येथील प्रदर्शनात ब्रिटिश दालनाची रचना केली. या दालनाचाच नंतर रोममधील ब्रिटिश स्कूलच्या वास्तूमध्ये दर्शनी भागासाठी उपयोग करून घेण्यात आला. लट्येन्झची वास्तुनिर्मीती विदेशांतही अनेक ठिकाणी पहावयास मिळते. त्यापैकी द. आफ्रिकेतील जोहॅनिसबर्ग येथील कलावीथी (१९११) आणि भारतातील नवी दिल्ली येथील ‘व्हाइस्‌-रॉय हाउस’ची (सध्याचे राष्ट्रपती भवन) वास्तुरचना (१९१३-३०) या उल्लेखनीय प्रमुख वास्तू होत. त्याने १९२० मध्ये लंडनमधील ‘व्हाइट हॉल’च्या प्रांगणात, पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारकाची रचना केली. आकारातील साधेपणा आणि प्रमाणबद्ध भारदस्तपणा यांद्वारे या स्मारकरचनेचा प्रभाव पुढे जगभरच्या अशा प्रकारच्या वास्तूंवर पडलेला आढळतो. 

नवी दिल्ली येथे व्हाइस्‌-रॉय हाउस बांधताना लट्येन्झने भारतीय वास्तुकला, साहित्य, इतिहास अशा अनेक क्षेत्रांचा अभ्यास केला. त्याचा परिणाम त्या वास्तुरचनेवर दिसून येतोय बौद्ध वास्तुशैलीच्या वैशिष्ट्यांचा आधार घेऊन स्थानिक वास्तुसाहित्याद्वारे लट्येन्झने ही अतिशय भारदस्त वास्तुनिर्मिती केली आहे. स्तंभ, घुमट, कमानी इ. अनेक घटकांच्या रचनेतील भारतीयत्व नजरेत भरणारे आहे. १९३८ ते १९४४ या काळात लट्येन्झने ‘रॉयल अकॅडमी’चे अध्यक्षपद भूषवले तर १९२१ मध्ये त्याला ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्‌स’चे (आर्‌.आय्‌.बी. ए.) सुवर्णपदक बहाल करण्यात आले. १९१८ मध्ये त्याला ‘सर’ हा किताब देण्यात आला. लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Hussey, Christopher, The Architecture of Edwin Lutyens, New York, 1950.

दीक्षित, विजय