कारंजे : पाण्याचा उंच उडणारा शोभादायक फवारा. कारंज्याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे प्रकार संभवतात. नैसर्गिक कारंजे भूगर्भातील उष्णतेच्या दाबाने जमिनीतून वर उंच उडते. भूगर्भातील पाणी जितक्या उंचीपर्यंत साठलेले असते, तितक्या उंचीपर्यंत नैसर्गिक कारंजे उडते. ðगायझर  किंवा अशा नैसर्गिक गरम पाण्याच्या कारंज्यातून एका वेळी हजारो लि. पाणी जोराने आकाशात फेकले जाते व त्याचे तपमान सु.९४ अंश से. इतकेही असू शकते. अमेरिका, फ्रान्स येथील नैसर्गिक कारंजी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील ‘द ओल्ड फेथफुल’ हा यलोस्टोन राष्ट्रीय उपवनातील (वायोमिंग संस्थान) फवारा तसेच, ‘इंपीरियल’, ‘जायंट’, ‘एक्सलसियर’ (मिसूरी संस्थान) हे इतर फवारे सु.५२ मी. उंच उडतात व एका वेळेला काही मिनिटांपासून अनेक तासांपर्यंत त्यांचे पाणी आकाशात उडत राहते.

प्रेक्षणीय तुषारनिर्मिती, पाण्याचा सुमधुर ध्वनी, शीतलता, जलाशयाचे सौंदर्य, श्रमपरिहार व मनोरंजन इ. हेतूंनी कारंजे उभारण्यात येते. त्यात शोभेसाठी पाण्याचा फवारा उंच उडविणे, कृत्रिम रीतीने प्रपाताप्रमाणे जलौघ निर्माण करणे व फवारा किंवा जलौघ यांसाठी आकर्षक पुष्करिणी बांधणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यासाठी पंप, नळ्या, तोट्या यांचा व इतर यांत्रिक क्लृप्त्यांचा उपयोग केला जातो.

अनेक तोट्या आणि त्यांचे तबकांसारखे किंवा कंगोरे असलेल्या शिंपल्यांसारखे आकार वापरून जलधारांचे अनेक प्रकार निर्माण करतात. जलपृष्ठावर विविध जलतरंगनिर्मिती व तुषारनिर्मिती व्हावी, म्हणून टप्प्याटप्प्याने पडणाऱ्या किंवा एकमेकांविरुद्ध दिशेला उडणाऱ्या जलधारांची योजना केली जाते.

कारंज्याच्या पुष्करणींचे किंवा पात्रांचे आकार विविध प्रकारचे असतात. चौकोनी, गोल असे भौमितिक किंवा नैसर्गिक वा स्वाभाविक असे हे प्रकार होत.

कारंज्याची आकृती : फोंताना देल्ले तार्तारुघे, रोम.

कारंज्याची शोभा त्यातून उडणाऱ्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी जास्त उंच व अनेक दिशांना फेकण्यासाठी नळ्यांची व छिद्रांची विविध प्रकारे योजना केलेली असते. या नळ्या बाहेरून दिसू नयेत, म्हणून कारंज्याच्या शिल्पामध्ये खास खोबणी व इतर नळ्या यांची व्यवस्था असते. मध्यभागी सर्वांत उंच उडणारा फवारा व बाजूला अनेक कमी उंचीचे फवारे, एकापुढे एक रांगेत उडणारी कारंजी किंवा मोठ्या उथळ जलाशयात असलेली अनेक कारंजी, असे कारंज्यांच्या मांडणीचे अनेक प्रकार आहेत. कारंज्याला शोभा देण्यासाठी कोरीव नक्षीकाम, मासे, सिंह व इतर श्वापदांच्या आकृती आणि अन्य प्रकारचे शिल्पांकन यांचा वापर केला जातो. विटा, संगमरवर किंवा इतर दगड, नैसर्गिक दरडी यांचाही उपयोग केला जातो.

कारंज्यांचा उपयोग चौक, उद्याने, उपवने, वाड्यांचे अंतर्गत चौक, रस्ते व इतर वास्तू यांना शोभा देण्यासाठी केला जातो. वास्तुशिल्पज्ञ व शिल्पकार या दोघांच्या कलेचा समन्वय येथे आढळतो.

बॅबिलोनियात इ.स.पू.३००० च्या सुमाराची कारंज्याची कोरीव पुष्करिणी आढळली आहे.

कारंज्याची आकृती : फोंताना पाओला, रोम

प्राचीन मेसोपोटेमिया, ॲसिरिया येथील कारंज्यांचे अवशेष आढळून येतात. ग्रीक आणि रोमन लोकांनी कारंज्याची कोरीव पुष्करिणी आढळली आहे. प्राचीन मेसोपोटेमिया, ॲसिरिया येथील कारंज्यांचे अवशेष आढळून येतात. ग्रीक आणि रोमन लोकांनी कारंज्यांचा खरा वापर केला. कृत्रिम रीतीने कुंडांत वा पुष्करिणींत उंचावरील झऱ्यांचे पाणी सोडण्यात येत असे. देवळे, सार्वजनिक सभास्थाने, घरांचे चौक यांमध्ये कारंजी असत. जलपऱ्या, जलचर इत्यादींच्या शिल्पाकृती तसेच विविध प्रकारचे स्तंभ यांचा वापर करुन कारंजी सुशोभित करण्यात येत. रोमन नगरांत रस्त्यांवर पाणपोयांसारखी कारंजी बांधत. रोमन कारंज्याची योजना पुष्कळदा अर्धवर्तुळाकृती कोनाड्यातून (एक्सेड्रा) करण्यात येई. कुट्टिमचित्रणचा वापर जमिनीवर शोभिवंत नक्षी काढण्यासाठी करण्यात येई. मध्ययुगाच्या उत्तरार्धात गिल्डने (कामगार-संघटना) अनेक कारंजी बांधली. यांव्यतिरिक्त टेबलांवर ठेवण्यासाठी खेळण्याच्या स्वरूपात कारंजी तयार करण्यात आली. बायझंटिन दरबारात मसाल्याच्या दारूची कारंजी टेबलांवर ठेवत परंतु त्यांचे नमुने उपलब्ध नाहीत.

यूरोपीय प्रबोधनकाळात, विशेषतः इटलीमध्ये, कारंज्याच्या रचनेत शिल्पकलेला महत्व प्राप्त झाले. लिओनार्दो दा व्हींची, जोव्हान्नी बेर्नीनी, नीक्कोलो साल्वी वगैरेंनी उभारलेली कारंजी उल्लेखनीय आहेत. साल्वीने रोम येथील प्रसिद्ध ‘द ट्रेव्ही फाउंटन’ उभारण्यास सुरुवात केली (१७३२) व पुढे ते जूझेप्पे पान्निनीने पूर्ण केले (१७६२). प्यात्सा नाव्होना येथील बेर्नीनीने बांधलेले ‘फाउंटन ऑफ द रिव्हर्स’ (१६४८— ५१) उल्लेखनीय आहे. तसेच टिव्होली येथील व्हिल्ला देस्तेचे ‘वॉटर ऑर्गन’ (१५४९) हे कारंजे प्रसिद्ध आहे. त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून त्याच्या विशिष्ट पायऱ्यांवर पाय दिल्यावर त्यातून ऑर्गनचे सूर येतात. लनोत्र याने बांधलेली व्हर्साय बागेतील कारंजी प्रसिद्ध आहेत. तसेच लंडनच्या ट्राफल्गार स्क्वेअरमधील सर चार्ल्स बॅरी याने बांधलेले कारंजे प्रसिद्ध आहे. भारतात काश्मीरमधील शालीमार उद्यानात व आग्राच्या ताजमहालाच्या परिसरात मोगलांनी बांधलेली कारंजी प्रेक्षणीय आहेत. आधुनिक काळात जगातील सर्व लहानमोठ्या शहरांत कारंजी बांधलेली दिसून येतात.

द ट्रेव्ही फाउंटन, रोम.

संदर्भ : Pfannschmidt, Ernst Erich, Fountains and Springs, New York, 1969.

कान्हेरे, गो.कृ.