लूइस हेन्री सलिव्हन

सलिव्हन, लूइस हेन्री : (३ सप्टेंबर १८५६-१४ एप्रिल ९२४).आधुनिक अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ तसेच आधुनिक वास्तु रचना बंध या संकल्पनेचे एक प्रवर्तक. त्याचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. त्याने ‘मॅसॅचूसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ’ येथे काही काळ तांत्रिक शिक्षण घेतले. १८७४ मध्ये तो पॅरिसला गेला व तेथे ‘एकोल दी  बोजार्त’  या  कलासंस्थेत त्याने अल्पकाळ शिक्षण घेतले. शिकागो येथे त्याने डंकमार ॲलर (१८४४-१९००) या स्थापत्य अभियंत्यासमवेत भागीदारीत व्यवसाय केला (१८८१-९५). त्याने डंकमार  ॲड्लरबरोबर सु. शंभर ख्यातनाम वास्तूंचे अभिकल्प बनविले आणि आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेले. येथे त्याला विविध कल्पनांना आकार देण्याची संधी लाभली व अनेक उत्कृष्ट वास्तुरचना त्याने केल्या. हा त्याच्या कारकीर्दीतील अत्युच्च सर्जनशील कालखंड मानला जातो. याच काळातील भव्य ‘ऑडिटॉरिअम बिल्डिंग’च्या (१८८६-८९) अभिकल्पात एक वास्तुशिल्पी म्हणून त्याची परिपक्वता जाणवते. तसेच या इमारतीच्या अंतरंग सजावटीत सलिव्हनेस्क अलंकरणाचेवैपुल्य आढळते. ⇨गगनचुंबी इमारतीं चा पाया त्याने घातला व ह्या वास्तुप्रकारास कलात्मक रूप दिले. आधुनिक वास्तुनिर्मितीत  सलिव्हन याने आकार आणि कार्य यांच्या संवादी अधिष्ठानावर गगनचुंबी इमारतींमधील दुकाने, कचेऱ्या तसेच शेवटच्या मजल्यावरील वीज, गॅस, पाणीपुरवठा आदि सुविधांची सुसंबद्ध जडणघडण केली. त्याच्या मते, निसर्गाच्या प्रत्येक कृतीला एक विशिष्ट आकार असतो. या आकारामुळे त्या कृतीचा अर्थ स्पष्ट जाणवतो. या दृष्टीने आधुनिक वास्तुनिर्मितीत आकार व कार्य यांची एकात्मता साधण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या दोन गगनचुंबी वास्तू-सेंट लूइस येथील ‘ वेनराइट बिल्डिंग’ (१८९०-९१) व बफलो येथील  ‘ गॅरंटी बिल्डिंग’ (१८९४-९५) – विशेष उल्लेखनीय आहेत. शिकागो येथे ‘ शिलर बिल्डिंग’ (१८९१-९२ नामशेष ) ही सतरा मजली मनोरासदृश वास्तू त्याने उभारली. शिकागो येथील ‘ ऑडिटॉरिअम बिल्डिंग’ शिकागोच्या जागतिक मेळ्यातील ‘ ट्रान्स्पोर्टेशन बिल्डिंग’ (१८९३) तसेच शिकागो व सेंट लूइस येथे उभारलेल्या अनेक बँका, वखारी, व्यापारी वास्तू इ. त्याच्या अन्य उल्लेखनीय वास्तू होत. पूर्वकालीन ऐतिहासिक वास्तुनिर्मितीच्या साचेबंद कल्पना व शैली अव्हेरून त्याने सर्वस्वी नवे आकार वास्तूरचनांमध्ये संकल्पिले व त्यांची उपयुक्ततेशी सांगड घालून लालित्यपूर्ण वास्तुनिर्मिती केली. त्याने वास्तुसजावटीत अलंकरणात्मक घटकांची जे प्राचुर्याने उपयोजन केले, त्यातील गोडवा आजही मोह पाडण्याइतका कलात्मक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीचा आढावा घेणारे किंडरगार्टन चॅट्स (१९०१-०२), ॲन ऑटोबायॉगफी ऑफ ॲन आयडिया (१९२४) व अ सिस्टम ऑफ आर्किटेक्चरल ऑर्नमेंट अकॉर्डिंग वीथ अ फिलॉसॉफी ऑफ मॅन्स पॉवर्स (१९२४) ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांतील वास्तुशिल्पविषयक विचार अमेरिकन जीवनविषयक तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकतात. पुढे ॲडलरशी मतभेद झाल्याने त्यांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर सलिव्हनच्या कारकीर्दीस उतरती कळा लागली. ॲल्बर्ट या सधन भावापासून ताटातूट झाली. त्याने मार्गारेट डॅव्हिस हटबो या महिलेबरोबर विवाह केला (१८९९), पण १९०६ मध्ये ते विभक्त झाले आणि १९१७ मध्ये त्यांनी विधिवत घटस्फोट घेतला. त्यांना संतती नव्हती. आर्थिकदृष्टया हतबल झालेल्या सलिव्हनने घरातील चीजवस्तू आणि गंथ विकले. अखेर शिकागो येथे त्याचे दारिद्रयावस्थेत निधन झाले. फँक लॉइड राइट हा जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ त्याचा शिष्य होता. सलिव्हनचा प्रभाव निधनोत्तर वाढत गेला, तो प्रामुख्याने ह्या शिष्यामुळे व त्याच्या गंथसंपदेमुळे.

संदर्भ : Morrison, Hugh, Louis Sullivan : Prophet of Modern Architecture, 1971.

पेठे, प्रकाश