पाललाद्यो, आन्द्रेआ : (३० नोव्हेंबर १५०८ – १९ ऑगस्ट १५८०). प्रख्यात प्रबोधनकालीन इटालियन वास्तुशिल्पज्ञ. मूळ नाव आन्द्रेआ दी प्येत्रो देल्ला गोन्दोला. त्याचा जन्म पॅड्युआ येथे झाला. आयुष्याच्या सुरुवातीस त्याने पाथरवट म्हणून काम केले. लवकरच त्याच्या कुटुंबाने व्हिचेंत्सा येथे स्थलांतर केले. पाललाद्योची महत्त्वाची वास्तुनिर्मिती त्याच ठिकाणी झाली. तिथे त्यास तत्कालीन मानवतावादी लेखक विचारवंत त्रीस्सिनोचा आश्रय लाभला. त्रीस्सिनो यानेच पाल्लास या ग्रीक देवतेवरून त्याचे नाव पाललाद्यो (ज्ञानाचे प्रतीक) ठेवले. त्रीस्सिनोने त्याला वास्तुकलेच्या अधिक अभ्यासासाठी रोमला पाठवले. रोमन वास्तुशिल्पातील मूलभूत घटकांचा अभ्यास करून पाललाद्योने प्रबोधनकाळात नवी वास्तुशैली निर्मिली. सोळाव्या शतकातील इटालियन वास्तुकलेवर त्याच्याच शैलीचा प्रकर्षाने ठसा उमटला आहे. त्याने जे नगरप्रसाद (पालात्सी) व ग्रामहवेल्या (व्हिला) उभारल्या, त्यांमुळे त्यास कीर्ती लाभली. वास्तुशिल्पज्ञ म्हणून त्याच्या कारकिर्दीचा प्रारंभ लोनेडो येथील ‘व्हिला गोदी’ (१५४०) व बान्यॉलो येथील ‘व्हिला पिसानी’ ह्यांच्या वास्तुकल्पांनी झाला. ‘व्हिला मालकॉन्तेंता’ (१५५८), मासेर येथील ‘व्हिला बार्बारो’, ‘व्हिला कोर्नारो’ (१५५६) इ. त्याच्या उल्लेखनीय वास्तू होत. व्हिचेंत्सा येथील ‘रोतोंदा’ अथवा ‘व्हिला काप्रा’ ही वास्तू (१५६७) म्हणजे पाललाद्योच्या निर्मितीचा प्रकर्ष होय. (पहा : मराठी विश्वकोश : ५, चित्रपट २१). त्या त्याच्या वास्तुशैलीची सर्व वैशिष्ट्ये एकवटलेली आहेत. या प्रासादाची रचना अत्यंत साधी व प्रमाणबद्ध होती. वास्तू चौरसाकार असून त्याची चारी बाजूंस प्रशस्त ढेलजा, मध्यभागी गोलाकार दालन व त्यावर घुमटाकृती छप्पर होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने काही धार्मिक वास्तू उभारल्या. उदा., कास्तेल्यो येथील ‘सान प्येत्रो चर्च’ (१५५८).

अलंकरणाच्या अतिरिक्त वापराविषयी असमाधान वाटून त्याने आपल्या वास्तूंना अगदी साधे व सुबक रूप दिले. चिरेबंदी आणि विटांचे बांधकाम यांत त्याचा हातखंडा होता. भूमितीचा योग्य उपयोग करून निर्माण केलेले आकार, हे त्याच्या वास्तुशैलीचे वैशिष्ट्य होय. त्याची वास्तुशैली अठराव्या शतकात विशेषेकरून गौरवली गेली व तिच्या व्यासंगातून वास्तुकलेला नवे वळण मिळाले. प्रामुख्याने त्याने लिहिलेल्या पुस्तकांमुळेच त्याची शैली लोकांपुढे आली व तिची छाप इंग्लंड, अमेरिका येथील वास्तुरचनांवर पडली. अठराव्या शतकातली वास्तुरचनेचा पाया त्याने सोळाव्या शतकातच घातला होता. त्याचे I Quattro Libri Dell Architettura (१५७० इं.भा. द फोर बुक्स ऑन आर्किटेक्चर ) हे पुस्तक रोममधील प्राचीन वास्तूंच्या त्याच्या सखोल व्यासंगाची प्रचीती घडवते. त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्याने अनेक वास्तूंचे बांधकाम विटांनी केल्याने त्या दीर्घकाळ टिकू शकल्या नाहीत, ही त्याची मर्यादा म्हणावी लागेल. व्हिचेंत्सा येथे त्याचे निधन झाले. उत्तरकालीन नामवंत वास्तुशिल्पज्ञ ⇨इनिगो जोन्स  (१५७३-१६५२) व ⇨सर क्रिस्टोफर रेन  (१६३२-१७२३) ह्यांच्यावर पाललाद्योच्या वास्तुशैलीचा प्रभाव दिसून येतो.

 संदर्भ : Ackerman, J.S. Palladio, London, 1966.

पेठे, प्रकाश.