रंगमंडल : (अँफिथिएटर). गोलाकार वा लंबगोलाकार वा अर्धगोलाकार वास्तू. मध्यभागी रंगण (ॲरीना) व त्याच्या सभोवताली बैठकी असलेले प्रेक्षागार, अशी ह्याची रचना असे. ‘अँफिथिएटर’ या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ ‘ज्याच्या सर्व बाजूंनी बैठका आहेत, असे गोलाकार रंगमदिर’ असा होतो. प्राचीन रोममध्ये द्वंद्वयुद्धाचे प्रकार [⟶ रोमन ग्लॅडिएटर] रानटी पशूंच्या परस्परांतील व गुलामाबरोबरच्या झुंजी इ. तत्कालीन करमणुकींचे रानटी व क्रूर प्रकार अशा खुल्या रंगमंडलामध्ये सुरूवातीला चालत. ग्रीक व रोमन समाजांप्रमाणेच ईजिप्शियन, भारतीय, चिनी, जपानी समाजामध्येही प्राचीन काळी रंजनगृहे म्हणून रंगमंडलांचा वापर होत असल्याचे उल्लेख आढळतात. तथापि ह्या देशोदेशींच्या रंगमंडलाचे आराखडे किंवा अवशेष आज उपलब्ध नाहीत. ग्रीक व रोमन संस्कृतींत रंगमंडलांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. तिथे झुंजी व द्वंद्वयुध्दे यांप्रमाणेच नाटके, वाद्यवृंद, काव्यगायन आदी रंजनाचे कार्यक्रम होत असत.

सर्वांत आद्य अवशिष्ट रंगमंडल हे पाँपेई येथे (इ. स. पू. सु. ८०) होते. हे १३६×१०४ मी. (४४५×३४१ फूट) आकाराचे भव्य व दगडी बांधकामात होते. त्यात सु. २०,००० प्रेक्षक बसू शकत. प्राचीन रोममधील ⇨कॉलॉसिअम हे सर्वात भव्य व प्रसिद्ध रंगमंडल होय (इ. स. ७०–८०). त्याची क्षमता सु. ५०,००० प्रेक्षकांची होती. पाश्चात्त्य रंगमंडलांची वाढ ग्रीक वास्तुकारांनी केली. ग्रीकांनी डोंगरांच्या कडेला उताराचा फायदा घेऊन टप्पे निर्माण केले व प्रेक्षकांच्या बसण्याची सोय केली. एपिडॉरस रंगमंडलात टप्प्यांवर सु. सहा हजार लोकांच्या बसण्याची सोय होती. परंतु अशा रंगमंडलाच्या बाबतीत ध्वनिक्षेपणाचा प्रश्न मोठा असावा. सर्व प्रेक्षकांपर्यत आवाज पोहोचण्यासाठी उंच रंगमंचाचा वापर आवश्यक झाला असावा. रंगमंचाच्या मागील भिंती शक्यतो सरळ ठेऊन आवाज परत प्रेक्षकांकडे परावर्तित होईल, याची काळजी घेण्यात येत असे. तसेच रंगमंडलातील मंचावर नट वापरीत असलेले मुखवटे मोठे व खास पद्धतीचे बनवून त्यामागून बोलल्यावर आवाज एखाद्या कर्ण्याप्रमाणे लांबवर ऐकू जाईल, अशी योजना असे. रंगमंडलाभोवती मोकळी व शांत जागा असल्यामुळेही सामान्य प्रेक्षकास नाटक किंवा काव्य आस्वादणे सुलभ जाई.

ग्रीक व रोमन रंगमंडलांत वाद्यवृंदासाठी मध्यवर्ती मोठी वर्तुळाकृती जागा पायऱ्‍यांच्या तळापाशी योजण्यात येत असे. अशा वर्तुळाकृती वाद्यवृंदाच्या जागेमुळेच रंगमंडलाचा आकार चौकोनी न होता गोलाकार झाला. मोठ्या रंगमंडलावर सुरुवातीला कापडी छत वापरण्यात येत असे उत्तरकालीन रंगमंडलात कायम स्वरूपाची छते वापरलेली दिसतात. रंगमंडलांच्या मंचाचा काही भाग भिंतीविरहीत ठेवून स्तंभावलीचा वापर केला गेल्यामुळे प्रेक्षकांना नट स्पष्ट दिसण्यास व नैसर्गिक उजेड मिळण्यास मदत होत असे.

प्रारंभीच्या काळात (साधारणपणे इ. स. पू. सु. ४०० ते ८०) संपूर्ण वर्तुळाकृती रंगमंडले वापरली जात. यात मुख्यतः नर्तक व वादक मध्यभागी असत. कालांतराने ऐकण्या-दिसण्याच्या सुलभतेसाठी वास्तु-स्थापत्यकारांनी तीन-चतुर्थांश वर्तुळाचा भाग उतरता करून उरलेल्या पाव भागात खोलगट वाद्यवृंदाची जागा व जवळच रंगमंचाची योजना केली. हीच योजना पुढे ग्रीक साम्राज्यानंतर रोमन साम्राज्यकाळातही वापरण्यात आली. यात रंगमंचाचा भाग वाढून मोठा झालेला दिसतो तर मोकळे सभागृह अर्ध्याच भागात समाविष्ट केलेले आहे.

भारताप्रमाणेच जपान, कंबोडिया (विद्यमान ख्मेर प्रजासत्ताक), जावा येथेही नृत्य व इतर कार्यक्रमांसाठी वर्तुळाकृती रंगमंडले होती. परंतु त्यांचा पुढे मोठ्या प्रमाणात प्रसार झाला नाही. राजे-महाराजे, सरदार व श्रीमंत व्यापारी वर्ग यांनी इतर कलांबरोबर नाट्य, संगीत व कळसूत्री बाहुल्या वगैरे दाखविण्यासाठी रंगमंडलाची बांधणी केली व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे दगडी कमानींवर आधारित असा खुल्या अर्धवर्तुळाकृती सभागृहाचा आराखडा वास्तु-स्थापत्यकारांनी निर्माण केला. रंगमंडलासाठी सुरुवातीला नेपथ्य, पडदे वगैरेंची गरज नव्हती. पुढे या गोष्टी, तसेच अनेक प्रकारचे उत्कृष्ट लाकडी सामान रंगमंडलावर आणण्यात येऊ लागले.

अठराव्या शतकानंतर रंगमंडलांची फारशी वाढ झाली नाही. कारण उत्तरोत्तर रंगमंडलांचा वापर कमी होत जाऊन त्यांची जागा ऑपेरा व इतर मोठ्या वाद्यवृंदासाठी सोईस्कर अशा रंगमंदिरांनी घेतली. असे असले, तरी नट व प्रेक्षक यांना जास्त समीप आणून त्यांच्यात परस्परसंबंध व सुसंवाद साधण्यासाठी सोईची अशी सु. सहाशे ते सातशे प्रेक्षकांसाठी खास रंगमंडले निर्माण केली जात. आधुनिक काळात ‘अँफिथिएटर’ही संज्ञा रंगमंदिर वा संगीतसभागृह यांच्या विशिष्ट वास्तूरचनेस अनुलक्षून वापरली जाते. या वास्तूमध्ये मध्यवर्ती रंगमंच व त्याच्या सभोवताली बैठका असतात (उदा., लंडन येथील ॲल्बर्ट हॉल). खुल्या रंगमंडलांचा (स्टेडिअम) वापर हल्लीही विविध क्रिडास्पर्धा व रंजन कार्यक्रमांसाठी केला जातो.

भारतात ब्रिटिश राजवटीत अनेक ठिकाणी रंगमंडले बांधण्यात आली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये असे एक रंगमंडल आहे. छप्पराने आच्छादित असलेल्या या वास्तूच्या एका कडेला रंगमंच असून त्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र दारे आहेत. प्रेक्षकांसाठी वेगळ्या दरवाजाची सोय असून प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था वर्तुळाकृती लाकडी पायऱ्‍यांवर केलेली असते. रंगमंचासमोर वाद्यवृंदाची किंवा समारंभाच्या वेळी खास निमंत्रितांची सोय करण्यात येते. अशा प्रकारची रंगमंडले मुंबई, दिल्ली इ. शहरांत असली, तरी त्यांची संख्या एकूण रंगमंदिरांच्या तुलनेने फार कमी आहे. मुंबईच्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम’समोर ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे वर्तुळाकृती रंगमंडल असून, ते त्यावरील अर्धगोलाकार घुमटामुळे प्रसिद्ध आहे.

अत्याधुनिक रंगमंडले वातानुकूलित असून रंगमंडलाची वाद्यवृंद बसण्याची जागा व रंगमंचही खाली-वर नेण्याची खास सुविधा पाश्चात्य देशांतील रंगमंडलात करण्यात येते. त्याबरोबरच तळघरात अनेक खोल्या व पडदे बदलून तो रंगमंच किंवा नवा वाद्यवृंद परत वर सरकवला जातो.यामुळे बदलात वेळ न जाता प्रेक्षकापुढे भराभर अनेक कार्यक्रम दाखविणे सुलभ होते. अशा प्रकारची रंगमंडले लहान नाट्यसंस्था आणि वाद्यवृंद यांना सोईची असल्याने ती आता पुन्हा प्रचारात येऊ लागली आहेत.

कान्हेरे, गो. कृ.