आयफेल टॉवर: जगप्रसिद्ध उंच मनोरा. पॅरिसमधील ही वास्तू आलेक्सांद्र ग्यूस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुविशारदाने उभारलीत्यामुळे ती आयफेल टॉवरत्याच्याच नावाने ओळखली जाते. हा मनोरा १८८७ – ८९ या काळात ‘पॅरिस एक्सोझिशन’ (१८८९) या जागतिक प्रदर्शनासाठी उभारला. त्याची किंमत१०,००,००० डॉलरपेक्षाही अधिक होती. न्यूयॉर्कमधील ‘क्रायस्लर’ (१९२९), ‘एम्पायर स्टेट’ (१९३०-३२) इ. इमारती बांधल्या जाण्यापूर्वी हा मनोरा जगातील सर्वांत उंच वास्तू म्हणून ओळखला जाई. मनोऱ्याची उंची ३०४·८ मी. असून त्याचा पाया १०० मी. औरसचौरस आहे. घडीव लोखंडी जाळीकाम असलेला हा मनोरा सापेक्षत: वजनाने (अंदाजे ७,३०० टन) हलकाच आहे. वास्तुममाध्यम म्हणून घडीव लोखंड, पोलाद यांसारख्या धातूंचा केलेला वापर हे या मनोऱ्याच्या बांधणीचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. प्रत्येकी २६ चौ. मी. क्षेत्रमर्यादा असलेल्या चार इष्टकास्तंभांच्या (मेसन् री पिअर्स) आधारावर मनोरा  उभा आहे. या इष्टकास्तंभांपासून लोखंडी जाळीकाम असलेले चार कलते स्तंभ उभारले आहेत. ते अंदाजे १८९ मी. उंचीवर परस्परांत मिसळून त्यांना एकाच कांडाचा आकार येतो. मनोऱ्यात प्रत्येकी त्रेसष्ट माणसांची वाहनक्षमता असलेल्या तीन उद्वाहकांची तसेच जिन्यांचीही व्यवस्था केलेली असून त्यामार्गे मनोऱ्याचे शिखर, मधली स्थानेक व सज्जे यांच्यापर्यंत जाता येते. स्थानकांमध्ये उपाहारगृहे, प्रयोगशाळा, हवामानकेंद्र वगैरेंचा समावेश होतो. मनोऱ्याच्या शिखरावरून सु. १३६ किमी. चा परिसर दिसू शकतो. पहिल्या महायुद्धात या मनोऱ्याचा वापर एक महत्त्वाचे सैनिकी-निरीक्षण केंद्र म्हणून करण्यात आला होता. १९५३ पासून मनोऱ्याचा वापर दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या क्षेपणासाठी केला जातो.

इनामदार, श्री. दे.