स्तंभरचना : स्थापत्यशास्त्रात कोणत्याही उभ्या किंवा लंबांत असलेल्या वास्तूच्या आधारांचे वर्णन स्तंभाकार वास्तु-राशि-रचना, स्तंभ, खांब या संज्ञांनी करतात. स्तंभाचा वापर प्राचीन काळापासून आढळतो. खांबाचे जोते किंवा उथळी, त्यावरील स्तंभमध्य, स्तंभशीर्ष व प्रस्तर ह्या सर्वांची मिळून स्तंभयोजना होते. स्तंभाचा वापर सुरुवातीला छताच्या आधारासाठी म्हण्न मानवाने केला. तेव्हापासून स्तंभाचा आकार, वास्तूमधील त्याचा उपयोग व त्यावरील नक्षीकाम यांमध्ये सातत्याने बदल होत गेले. स्तंभाचे प्रासादिक किंवा कलापूर्ण असे स्वरूप अतिप्राचीन लाकूड, वेळूचे जुडगे, बांबू व इतर नैसर्गिक स्तंभप्रकारांतूनच निर्माण झाले. तसेच स्तंभाचे प्रादेशिक घटक व त्यावरील नक्षीकामाची विविधता तेथील भिन्न नैसर्गिक वस्तूंच्या वापरांतून निर्माण झाली आहे. चीन, जपान तसेच मंगोलिया येथील स्तंभरचनेवर तंबूच्या स्तंभरचनेचा परिणाम त्यातील नाजुक वेलबुट्टी, लाखेचे रंगकाम व बांबूसारख्या आकारांच्या वापरांतून दिसून येतो. याउलट ईजिप्तमधील स्तंभ परिघाच्या सहापटच उंच असलेले बडगे कमजोर अशा वेळूच्या जुडग्यांच्या वापरांतून निर्माण झाले आहेत. वेळूच्या या जुड्या एकत्र बांधावयास वापरल्या जाणार्‍या दोरांचे चित्रण दगडी खांबाच्या बांधणीतसुद्धा यथार्थपणे स्तंभमध्यावर आढळते. ईजिप्तमध्ये पपायरस यूरोपात ताड आणि कमळ ग्रीसमध्ये काटेरी पानांचा अकेंथस आणि पाइन वृक्ष भारत व जपानमध्ये बांबू या वनस्पती व वृक्षांच्या वापराचा परिणाम स्तंभांच्या बांधणीवर व एकंदर आकारमानावर झाला आहे. स्तंभाचा वापर सुरुवातीला वजन पेलण्यासाठी झाला तसेच वास्तुशिल्पज्ञांनी शोभेसाठी पडखांब, अर्धखांब, उथळ खोदीव कामांत निर्माण केलेले स्तंभांचे आभास यांचा वापर भारत, ईजिप्त, ग्रीस इ. देशांत केला.

  सर्व धर्मांत काही प्राण्यांचे महत्त्व विवक्षित देवतांशी जोडण्यात येते. त्यातून किंवा प्राण्यांची व मानवाची शिरे खांबावर टांगण्याच्या पद्धतींतून प्राण्यांच्या आकाराचा वापर स्तंभाशी निगडित झाला असावा. जपान आणि चीनमध्ये वापरले जाणारे व्याघ्र, काल्पनिक राक्षस व राक्षसी प्राणी यांचे आकार इराणमध्ये पर्सेपलिस येथील सिंह आणि बैलांच्या मुखाचे आकार भारतातील अश्व-व्याघ्र आणि यूरोपातील पक्षी, माकडे व इतर प्राण्यांचे आकार यांचा वापर स्तंभपादापासून स्तंभशीर्ष व प्रस्तरापर्यंत विविध ठिकाणी आढळतो. पशूंच्या धडाचा आकार वरील तुळयांना आधार व मोठी बैठक देण्यासाठी तसेच शक्तीचा आभास निर्माण करण्यासाठी होत असावा. भारतातील व्याघ्रस्तंभ, अश्वाकार स्तंभ, गॉथिक वास्तुकलेत वापरलेले सिंहाचे व गरुडाच्या आकाराचे स्तंभ यांतील प्राण्यांच्या शरीराच्या मांडणीमुळे आणि फुगलेल्या स्नायूंच्या आकारामुळे जणू काही स्तंभाचे वजन ते पाठीवर पेलून धरत असावेत, असा आभास निर्माण होतो.

  स्तंभाचा वापर जेव्हा मोठ्या सभागृहांतून किंवा वास्तूंमध्ये होऊ लागला, तेव्हा स्थापत्याच्या दृष्टीने स्तंभाची वाढती उंची व तुळयांची वाढती कक्षा यांची आवश्यकता निर्माण झाली. यासाठी वास्तुशिल्पज्ञांनी लाकडाऐवजी दगडाचा वापर सुरू केला व तुळयांना जास्त आधार देऊन  खांबांमधील अंतर वाढविण्याच्या दृष्टीने नासिकांचा वापर करण्यात आला. स्तंभनासिकांच्या वापरातून अनेक नव्या आकृती व स्तंभशीर्षांचे अनेक नवीन प्रकार देशपरत्वे निर्माण झाले. या नासिका जशा तुळयांना जास्त आधार देतात, तशाच नक्षीकामाच्या प्रदर्शनासाठी एक जागाही प्राप्त करून देतात. या लाकडांतील कोरीव कामाचा स्वैर वापर नंतरच्या दगडी बांधकामांतही दिसून येतो. ईजिप्त, भारत, इराण वगैरे देशांतील प्राचीन दगडी बांधकाम हे सर्वसाधारणपणे एकसंध दगडांमध्ये किंवा डोंगराच्या कडेला खोदून काढीत असत. या ठिकाणी लाकडी व स्वतंत्र बांध-कामावर परिणाम करणार्‍या गुरुत्वाकर्षणाचा जोर नसल्याने खांब, तुळया, प्रस्तर छत आणि छताच्या फासळ्या वगैरेंची आवश्यकता नव्हती पण मानवाची अनुकरणप्रियता व आधीच्या बांधणीच्या परिणामामुळे लाकडी भागांचे यथार्थ चित्रण भारतात अजिंठा, वेरूळ ईजिप्तमधील अबू सिंबेल इत्यादींतून आढळते.

कमानींचा वापर ज्यावेळी ग्रीक, रोमन, बायझंटिन, रोमनेस्क वगैरे वास्तुकलांमध्ये सुरू झाला, त्यावेळी स्तंभशीर्षाची व स्तंभअक्षाची वाढ होऊ लागली. बांधकामातील तुळया, कमानींचे आकार व प्रकार, अनेक पातळींवरील छतांचे रेटे ह्या सर्वांचा परिणाम काही स्तंभांवर होऊन त्यांचा परिघ व उंची अनेक पटीने वाढली. 

  स्तंभाचा वापर आलंकारिक व दर्शनी प्रकारांसाठी सुरू झाला आणि त्याबरोबर वास्तूंमध्ये एकाहून अधिक मजल्यांइतकी उंची असलेले व ऊर्ध्वच्छदांत वास्तूंच्या तोडीचे स्तंभ वापरात आले. स्तंभाच्या घडणीचे व रचनेचे अनेक स्थिर प्रादेशिक प्रकार आहेत. 

  पाश्चिमात्य स्तंभरचना : इजीअन वास्तुशिल्पज्ञांनी सुरूच्या झाडांपासून बनविलेले स्तंभ वापरण्यास सुरुवात केली. स्तंभशीर्षासाठी झाडाचा मोठा बुंधा वापरून वरचा निमुळता भाग खाली पायाशी घेता येत असे. त्यामुळे स्तंभाचा आकार सामान्य स्तंभप्रकाराच्या उलट, म्हणूजे वर जाड व खाली बारीक असा दिसतो. स्तंभाची उथळी लहान वर्तुळाकृती असून स्तंभशीर्ष मोठ्या वर्तुळाकृती तबकडीवर चौकोनी ठोकळ्याच्या आकाराचे असे. स्तंभशीर्षाची ही विसंगत जाडी वरील मोठ्या भिंतीचे वजन घेण्याच्या दृष्टीने आवश्यक होती. स्तंभमध्यावर व स्तंभशीर्षावर बारीक दिसणारे ताडाच्या झाडासारखे भूमिजन्य नक्षीकाम करीत. ग्रीक स्तंभपद्धतीवर इजीअन रचनेचा परिणाम दिसतो.

  ग्रीक स्तंभ व प्रस्तर दोन्ही आरंभी लाकडाची होती. नंतर ती दगडामध्ये घडविण्यास सुरुवात झाली. यामुळेच ग्रीक वास्तुकलेला दगडांतील सुतारकाम असे उपनाव प्राप्त झाले. ⇨ पार्थनॉनसारख्या वास्तूमध्ये ग्रीक वास्तुशिल्पज्ञांनी वास्तूमधील अनेक दृष्टिभ्रमांचे निवारण स्तंभ अंतर्गोल  व बहिर्गोल करणे तसेच स्तंभातील अंतर कमी-जास्त करणे यांनी साधले आहे. उभ्या खांबांची योजना ग्रीक लोक थोडासा अंतर्गत झुकाव देऊन करत व त्यामुळे बाहेर झुकले असल्याचा दृष्टिभ्रम दूर होई. यांकरिता दर्शनी स्तंभाची अक्षरेषा जवळजवळ ६—२५ सेंमी. आत झुकते, हे ध्यानात घेतले पाहिजे. निमुळत्या स्तंभाच्या मध्यभागास अंतर्वक्र बाक आल्याचा भास होऊ नये म्हणून मुद्दाम ठेवलेला फुगवटा पेईस्टमच्या बॅसिलिकेत तीन दशांश सेंमी.चा आहे. कडेच्या स्तंभामधील अंतर कमी करून वास्तूला जास्त भारदस्तपणा आणण्यात येत असे.

डोरिक व आयोनिक हे स्तंभरचनेचे प्रारंभीचे दोन प्रकार ग्रीकांच्या दोन शाखांनी एकाच वेळी निर्माण केले. त्यातूनच नंतर कॉरिंथियन व टस्कन हे प्रकार निर्माण झाले. शेवटी रोमनांनी एक संमिश्र ( काँपोझिट ) प्रकार कॉरिंथियन व आयोनिक या स्तंभरचनेतून निर्माण केला. हे स्तंभरचनेचे पाश्चात्त्यांचे पाच प्रमुख अभिजात प्रकार होत. 

  डोरिक स्तंभ सुरुवातीला तासलेल्या लाकडांपासून बनविला जात असे. स्तंभावर वीस उभ्या रेषा किंवा नक्षीच्या  उभ्या पन्हळी हे या स्तंभाचे वैशिष्ट्य होते. डोरिक स्तंभाला उथळीचा किंवा पादबंधाचा वापर नसे व एकंदर उंची परिघाच्या ४ ते ६ पट असल्यामुळे स्तंभरचना इतर रचनांहून फार ढोबळ वाटत असे. डोरिक स्तंभरचनेचा वापर करून बांधलेली मंदिरे ग्रीस, सिसिली, दक्षिण इटली इ. ठिकाणी आढळतात. यांपैकी कॉरिंथ येथील अपोलोचे, ऑलिंपिया येथील झ्यूसचे, अथेन्स येथील पार्थनॉन इ. देवालये ग्रीक स्तंभरचनेची उत्तम उदाहरणे होत.

  कागदी भेंडोळ्याच्या आकाराचे किंवा एडक्याच्या शिंगाच्या आकाराचे स्तंभशीर्ष हे आयोनिक स्तंभरचनेचे खास वैशिष्ट्य. ह्याचा उगम ईजिप्तमधील कमलाकारापासून झाला असावा, असे एक मत आहे. आयोनिक स्तंभरचना डोरिकप्रमाणेच लाकडी बांधणीनेच प्रेरित झाली आहे तथापि याची उंची डोरिक प्रस्तरापेक्षा पुष्कळच कमी असे व यामुळे आधीच उंच असलेले आयोनिक स्तंभ फारच नाजूक दिसत. 

  आयोनिक स्तंभ स्तंभाच्या खालच्या परिघाच्या ९ पट उंच असतो व त्यावर २४ अर्धवर्तुळाकृती पन्हळ किंवा खाचा असून त्यांच्या टोकास सपाट पट्ट्यांनी उठाव दिलेला असे. सुरुवातीच्या काळात ह्या पन्हळांची संख्या ४४ — ४८ असे. स्तंभाच्या उथळीची घडण दोन बहिर्गोल वर्तुळा-कृती चकत्यांमध्ये आडव्या पट्ट्या व अंतर्गोल वर्तुळाकृती चकती वापरून केलेली असे. आशिया मायनर व मध्य ग्रीसमध्ये हे स्तंभप्रकार आढळतात. कॉरिंथियन ही स्तंभरचना आयोनिक रचनेचाच एक उप-प्रकार म्हणून प्रसृत झाली. ग्रीकांनी या रचनेचा वापर इ. स. पू. पाचव्या शतकात केला. पुढे रोमन वास्तुकलाकारांनी ह्या रचनेची पूर्ण वाढ केली. कॉरिंथियन स्तंभाची उंची परिघाच्या दहा पट असे. तसेच स्तंभशीर्षाची उंची इतर कोणत्याही स्तंभशीर्षाहून जास्त म्हणजे परिघाच्या एक षष्ठांश इतकी असे.

  कॉरिंथियन स्तंभप्रस्तराचे आयोनिक प्रस्तराशी ग्रीक कालखंडात फार साम्य होते परंतु नंतरच्या रोमन कालखंडात वरती जास्त नक्षीदार अशी पट्टी प्रस्तरगोलावर काढण्यात येत असे. या रचनेचा वापर डाल्फी येथील थोलोसचे, मिलटस् येथील अपोलोचे व बासी येथील अपोलो इपिक्युरच्या देवालयांत दिसून येतो ( इ. स. पू. ४५ ते इ. स. ४८).


ग्रीकांच्या डोरिक रचनेतून टस्कन स्तंभरचना निर्माण झाली. स्तंभाची उंची परिघाच्या सात पट असून प्रमुख फरक म्हणजे डोरिक किंवा आयोनिक प्रकारांसारख्या उभ्या पन्हळांचा व स्तंभशीर्षावर बारीक नक्षीकामाचा वापर नसतो. इट्रस्कन लोकांनी याची वाढ रोमन कालखंडात केली.

संमिश्र स्तंभरचनेचा वापर इ. स. ८२ मध्ये टायट्सच्या विजय-कमानीत झाला. कॉरिंथियन व इतर स्तंभरचनेच्या काही भागांचा वापर किंवा एकत्रीकरण केल्यामुळे याला संमिश्र रूप प्राप्त झाले. स्तंभावर उभे पन्हळ असून स्तंभशीर्ष कॉरिंथियन रचनेप्रमाणे दिसते. वरच्या भागांत प्रस्तरपादावर व कंगणीवर दंतुर अकेंथस पानांचे, अंडे व बाण यांचे नक्षीकाम आढळते. प्रस्तरगलावर बारीक कोरीवकाम असे. या रचनेचा वापर विशेषतः विजय तोरणे किंवा कमानींच्या बाजूला होत असे.

  अथेन्स येथील एरिचथियानमध्ये सहा वस्त्रप्रावरण ल्यालेल्या व डोक्यावर फुलांची परडी धरणार्‍या स्त्रियांच्या आकृतीचा वापर छताला आधार म्हणून करण्यात आला. यांनाच कारिएट्रिडस म्हणतात. या आकृतींची उंची दोन मीटर असून संगमरवराच्या २.३० मी. उंचीच्या कठड्यावर यांची मांडणी केली आहे. मानवी आकृतींचा वापर स्तंभासाठी केल्याचे हे एक पाश्चिमात्य उदाहरण आहे पण हर्क्यूलीझसारख्या पुरुषी आकृतींचा वापर नंतरच्या काळात आढळतो. 

  जयस्तंभाचा वापर लढाई जिंकल्यावर विजयाचे चिन्ह म्हणून केला जातो. ट्रोजनचा स्तंभ ( ट्रेजन्स कॉलम ) हे त्याचे उत्तम उदाहरण होय. इतरत्रही अशा प्रकारचे जयस्तंभ आढळतात. रोमनेस्क, गॉथिक या काल-खंडांत रोमन व ग्रीक स्तंभांचे संमिश्रण व इस्लामी नक्षींचा वापर करून अनेक नवे रचनाप्रकार निर्माण झाले. जोडखांब, पिळाचे खांब, तिरकस खांब, पडखांब व भिंतीवरील अर्धवर्तुळाकृती शोभेचे खांब असे स्तंभांचे अनेक विचित्र प्रकार पॅलड्लियो, व्हिग्नेला वगैरे वास्तुशिल्पज्ञांनी प्रबोधन कालखंडात बांधले [⟶ विजयकमानी व कीर्तिस्तंभ ]. 

पौर्वात्य स्तंभरचना : स्तंभाला जंधा, चरना, स्ताली, अंगरिका अशी अनेक नावे भारतात आहेत. भारतीय स्तंभाची उंची परिघाच्या चौपट असे. स्तंभाचे सहा बाजूंचा ब्रह्मकांत, आठ बाजूंचा विष्णूकांत, पाच बाजूंचा शिवकांत असे अनेक प्रकार भारतात आढळतात. मानसार या ग्रंथात स्तंभाचे पाच रचनाप्रकार सांगितले आहेत. भारतातील स्तंभाचा उगम लाकडी खांबाच्या रचनेतूनच झाला असावा. वैदिक यज्ञासाठी समंत्रक उभारण्यात येणारा लाकडी स्तंभ ( यूप ) अष्टकोनी असावा, असा उल्लेख शतपथऐतरेय ब्राह्मणांत आढळतो. त्यावरून अष्टकोनी स्तंभपरंपरा वास्तुशिल्पात प्रस्थापित झाली असावी. गुहांतून वापरण्यात आलेले स्तंभ आधारासाठी असलेला कलश व त्यावरील लाकडी खांबाचा वापर यांवरून शिल्पकारांनी कोरले. शोभेसाठी भारतीय वास्तुकलाकार अनेक शिल्पांचा वापर वास्तूवर करतात व तशीच शिल्पयोजना स्तंभावर आढळते. स्वतंत्र स्तंभयोजना हे अशोककालीन स्थापत्याचे वैशिष्ट्य असून त्यावर सिंह, बैल, हत्ती, घोडा, गरुड वगैरे प्राणी व पक्ष्यांची शिल्पे कोरण्यात येत. सर्वांत उंच जागी स्तंभाग्रावर अशोकचक्र असे. हे स्तंभ धर्मस्तंभ मानले जातात. अशोकाने सु. ३० स्तंभ निर्माण केले असून त्यांतील दहा स्तंभांवर त्याच्या आज्ञा कोरलेल्या आहेत. राजा हेलिओडोरस याने बेसनगर ( विदिशा ) येथे उभारलेला गरुडस्तंभ अशोकस्तंभासारखाच आहे. [⟶ अशोकस्तंभ ]. कालांतराने ग्रीक लोकांशी संबंध आल्यामुळे भारतीय स्तंभरचनेवर — विशेषतः उत्तर भारतात — कोरीव काम व नक्षीच्या दृष्टीने काही फरक आढळतो.

महाराष्ट्रातील ⇨ कार्ले येथील स्तंभशीर्षावर पुरुष, स्त्रिया व प्राण्यांचे समूह कोरलेले असून भित्तिचित्रांचा वापर स्तंभाची शोभा वाढविण्यासाठी केला आहे. गुहेच्या द्वाराशी एक सिंहस्तंभ आहे. कान्हेरी येथील चैत्या-समोरही सिंहस्तंभ आहेत. नासिक येथील बौद्ध गुहांमधून वृषभ व गजारूढ मानवी आकृतींची योजना स्तंभशीर्षासाठी केली आहे.

गुप्तकालात पूर्णकलश स्तंभशीर्षाची कल्पना वापरात आली. पूर्णकलश किंवा पाण्याने भरलेल्या पात्रांतून बाहेर लोंबणार्‍या वाढत्या वेलींची कल्पना कलश व फुलांच्या स्तंभशीर्षाच्या वाढीस कारणीभूत ठरली. बादामी येथील स्तंभ किंवा अजिंठा येथील प्रवेशद्वाराजवळ वापरलेले कलशयुक्त व स्तंभमध्यावर पन्हळांची नक्षी असलेले स्तंभ ही बौद्ध स्तंभरचनेची उदाहरणे होत. याच सुमारास चौकोनी स्तंभावर ऐहोळे येथे यक्षकिन्नर व नर्तिकांच्या आकृतीचा वापर करण्यात आला आहे. मामल्लपुरम् ( महाबलीपुर ), येथे  स्तंभाच्या पायाशी बसलेल्या सिंहाकृतींचा वापर केला आहे. अशा प्रकारच्या द्राविड स्तंभरचनेचे सिंहाकार बैठक स्तंभमध्य, कलश, गळ,  कुंभ, कमल व स्तंभशीर्ष फलक हे भाग होत. मराठवाड्यातील यादव-कालीन मंदिराचे दगडी स्तंभ चौकोनी स्तंभपादाचे, अष्टकोनी मध्यभाग आणि शीर्षभागी गोल असलेले आहेत मात्र कलाकुसर भिन्न स्वरूपाची आहे. यांवरील मधल्या चौकोनी भागात कीर्तिमुखे वा रामायण -महाभारत यांतील प्रसंग कोरले आहेत. स्तंभशीर्ष कीचक, कमळ किंवा क्वचित पर्णाची आहेत. स्तंभातील कर्णिका किंवा कणी ही यादव मंदिर स्तंभांची एक वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे. दगडांत कोरलेल्या स्तंभाचे शेवटचे उदाहरण विजयानगर ( हंपी ) येथील विठ्ठलस्वामी देवालयात दिसते. 

सोळाव्या शतकातील या देवालयात अत्यंत सुबक कोरीवकामाचा व बाहेर आलेल्या लहान मध्यस्तंभांचा वापर स्तंभयोजनेची शोभा वाढविण्यासाठी केला आहे. वेल्लोर येथील कल्याण मंडप, श्रीरंगम् येथील अश्व सभामंडप या ठिकाणी मागील पायांवर उभ्या राहिलेल्या घोड्यांचा वापर स्तंभशीर्षाला आधार देण्यासाठी केला आहे.

मोढेराच्या सूर्यमंदिरात ( अकरावे शतक ) नक्षीदार तोरणांचा व प्रस्तरांचा वापर आहे. बाराव्या शतकात बेलूर येथे चन्नकेशव मंदिरात पन्हळांचा उपयोग स्तंभासाठी केला आहे. मोगल काळात स्तंभाचे आकार सरळ, नाजूक व शिल्पविरहित होऊन फक्त कमळाच्या आणि इतर फुलांच्या पाकळ्या, कळ्या यांच्यासारखी साधी नक्षी  वापरलेली आढळते. दिवाण–इ-खास, दिवाण-इ-आम, मोती मशीद या वास्तूंत महिरपदार कमानींसह खास इस्लामी स्तंभांचा वापर भारतात झाला. संगमरवरी स्तंभावर निमग्न कोरीवकाम करून मोत्याच्या शिंपल्यांच्या खपल्या, मौल्यवान खडे वापरून फळे, फुले, वेलपत्री यांची ज्ञापके स्तंभांवर वापरण्यात आली. पेशवे काळातील सुरूचे स्तंभ नक्षीदार, मध्यभागी वर्तुळाकार आणि स्तंभपाद चौकोनी असत.

लाकडी व बांबूच्या स्तंभांचा वापर जपानमध्ये भूकंपाचा परिणाम वास्तूवर होणार नाही, या दृष्टिकोनातून केला जाई. तुळयांना आधार देण्यासाठी अनेक फांद्यांच्या आकाराचे स्तंभशीर्ष वापरले जात. चौकोनी स्तंभांवर लहान उथळ कोनाड्याचे आकार आणि वर्तुळाकृती स्तंभांवर वेताच्या आकाराच्या उभ्या रेषांची नक्षी व लाखेचे रंगकाम वापरत असत. चिनी स्तंभरचना जपानी स्तंभरचनेसारखीच असे. याव्यतिरिक्त इतर पौर्वात्य देशांतील स्तंभरचना भारतीय स्तंभरचनेवरच आधारित असल्याने त्यांमध्ये फक्त नक्षीकामांत बदल आढळतो. श्रीलंकेतील पोलेन्नरुव येथील स्तंभ वेलबुट्ट्यांनी युक्त असून स्तंभालाच वेलीच्या खोडाचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळे स्तंभ रोकोको किंवा बरोक स्तंभांसारखे पीळ भरलेल्या पट्टीसारखे दिसतात. जावा, बाली, सयाम येथील स्तंभांवर भारतीय तसेच चिनी व जपानी स्तंभरचनेचा प्रभाव होऊन एक संमिश्र स्तंभरचना दृष्टीस पडते. आधुनिक काळात लोखंड, ॲल्युमिनियम, पोलाद यांचा वापर स्तंभात होऊ लागला आणि स्तंभाची उंची, दोन स्तंभांतील अंतर यांत वाढ झाली. आधुनिक स्तंभाची योजना वास्तूमध्ये स्तंभाची आवश्यकता नसतानाही केवळ शोभेसाठी केली जाते. 

पहा : अशोक स्तंभ ग्रीक कला वास्तुकला विजयकमानी व कीर्तिस्तंभ.

संदर्भ : 1. Fletcher, Banister, History of Architecture, London, 1961. 

            2. Percy, Brown, Indian Architecture, Vol. II ( Islamic Period ), Bombay, 1942.            

कान्हेरे, गो. कृ.