भुलभुलैया : (लॅबरिन्थ). एक वास्तुप्रकार. अत्यंत गहन व गुंतागुंतीची वाटा-वळणे आणि खोल्या-दालने यांची रचना असलेली वास्तू म्हणजे भुलभुलैया वा मयरचना होय. आत गेलेल्या व्यक्तीच्या मनात गोंधळ होऊन तिला सहजासहजी बाहेर पडण्याचा मार्ग सापडू नये, हा या रचनेमागील उद्देश होय.

भुलभुलैया, बडा इमामबारा, लखनौ.

ईजिप्तमध्ये बाराव्या राजवंशातील तिसरा आमेनेमहेत (कार. इ. स. पू. सु. १८४९-१८०१) याने मीरिस सरोवराजवळ अशा प्रकारच्या मोठ्या भुलभुलैयाची रचना अंत्यविधी-मंदिर म्हणून केली असल्याचे उल्लेख सापडतात. ग्रीक पुराणात डेडलस या कारागिराने ‘मिनोटॉर’ ला (बैलाचे शिर व माणसाचे शरीर असलेला राक्षस) कोंडण्यासाठी भुलभुलैया रचल्याची आख्यायिका आहे. भारतीय पुराणातील पांडवांच्या मयसभेचे उदाहरण सर्वश्रुत आहेच. थोरल्या फ्लिनीने (इ. स. २३-७९) ईजिप्शियन धर्तीच्या लेम्नॉसच्या भुलभुलैयाचा निर्देश केला आहे. रोमच्या आसपास भुलभुलैयाची प्राचीन उदाहरणे आढळतात.

चवथ्या शतकात ख्रिश्चन साम्राज्यात कमालीची अस्थिरता व अशांतता असल्याने संकटकाळी आश्रय घेण्यासाठी शेकडो मैल लांबीची भूमिगत भुयारे खोदल्याचे उल्लेख सापडतात. त्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि चक्रावून टाकणारी असल्यामुळे त्यांनाही भुलभुलैया म्हणून संबोधले गेले. त्यातून मार्गक्रमण करताना आपण नक्की कोणत्या दिशेने जातोय, हे जाणाऱ्याला समजणे शक्य नव्हते. कारण विविध वळणे एकसारखी असल्यामुळे संभ्रमात टाकणारी होती. शत्रूपासून बचाव करणे आणि वेळ आलीच तर शत्रूला त्याच भुयारात अडकवून त्याचा पाडाव करणे, असा दुहेरी उद्देश या वास्तूप्रकाराच्या निर्मितीत आढळतो. भारतात लखनौ येथे भुलभुलैया वास्तू पाहावयास मिळते. काही किल्ले, राजवाडे वगैरेमध्ये आकार-पुनरुक्ती, अवकाश-साधर्म्य इ. तत्त्वांच्या आधारे भुलभुलैयासदृश निर्मिती करून त्यामागील उद्देश साधलेला आढळतो. आधुनिक काळात उद्यानांमध्येही वनस्पतिरचनेचे वेगवेगळे प्रकार करून मनोरंजनार्थ भुलभुलैया साधल्याची उदाहरणे आढळतात. लंडनजवळ ‘हॅम्प्टन कोर्ट’ प्रासादाच्या उद्यानात अशी व्यूहरचना तिसऱ्या विल्यमच्या कारकिर्दीत (१६८९-१७०२) करण्यात आली.

दीक्षित, विजय