शिखर : भारतीय ⇨ मंदिर-वास्तुकलेचा एक प्रमुख घटक. ⇨ देवालयातील गर्भगृहावर उंच व वर निमुळता होत गेलेला मनोरेवजा वास्तुघटक म्हणजे शिखर होय. बहुधा त्यात अनेक मजले वा थर योजलेले असतात. शिखर हा देवालय-वास्तूचा उच्च बिंदू होय. देवमूर्ती असलेल्या पवित्रम गाभाऱ्याचे द्योतक म्हणजे शिखर होय. भारतात शिखराच्या धारणेच्या विविध शैली असल्या, तरी त्याचे कार्य मुख्यत्वे गाभाऱ्यातील मूर्तिस्थान दर्शनी भागावर सहेतुकपणे दर्शविणे वा सूचित करणे हे आहे. गाभारा व शिखर मिळून होणाऱ्या वास्तुविशेषास विमान म्हणतात.

बृहदीश्वर मंदिराचे शिखर, तंजावर

गाभऱ्यावरील शिखरसंकल्पनेचा उगम मूलतः पर्वताचा आकार, रथावरील लघुशिखर यांसारख्या आकारांतून झाला. ईश्वराचे स्थान दर्शवणारा ऊर्ध्वगामी आकार असे सूचनही त्यातून होते. शिखराची रचना निरनिराळ्या प्रकारे करण्यात येते परंतु ‘उरुशृंग’ (पर्वताच्या उंच शिखरांप्रमाणे) आणि मुख्य शिखरपृष्ठावरील अलंकरणासाठी सर्वत्र वापर केलेला अढळतो. दगडाच्या उपलब्ध प्रकारानुसार अशा अलंकरणाचे स्वरूप ठरते. उदा. जैन मंदिरांतील (मुख्यतः ⇨ दिलवाडा मंदिर-समूह, राजस्थान, रणकपूर इ.) शिखररचनेत अंतर्बाह्य पृष्ठभाग अगदी लहान लहान शिल्पांनी मढविलेला आढळतो तर दक्षिणेकडील मंदिरांच्या शिखररचनेत त्या मानाने मर्यादित अलंकरण आढळते.

उत्तर व मध्य भारताचे शिखरशैलीचे उगमस्थान प्राचीन गुप्तकाळात बांधलेल्या देवालयांत आढळते. गाभाऱ्याचे हे छप्पर देवाचे सामर्थ्य, वैभव, अनंतत्व दर्शविण्यासाठी मेरू पर्वताच्या शिखराचे रूप धारण करते. शिखराचा मुकुटालंकार म्हणजे कळस होय. या मुकुटरचनेत ‘आमलक’ (आवळा) याची बैठक असून त्यावर श्रीफल व आम्रपर्णयुक्त असे जलकुंभ असते. उत्तर भारतीय शिखररचना म्हणजे कंगोऱ्याचा घनत्रिकोणी (पिरॅमिडल) घुमट होय. गाभाऱ्याच्या बाह्य भिंतींची रचना शिखराच्या कंगोऱ्याना साथ देणारी असते. ठरावीक उंचीवर या भिंतीतून पुष्पपाकळ्यांच्या समूहाप्रमाणे उमलत शिखर साकार होते. शिखररचनेतील दगड अगर विटा यांच्या ओळी चोहोबाजूंनी क्रमाक्रमाने गाभाऱ्याच्या मध्यबिंदूकडे झुकत येऊन कळसाशी एकत्र येतात. शिखराच्या बाह्य अंगावर उभ्या-आडव्या पट्ट्यांचा पोत देऊन त्यावर भौमितिक आकार, जलकुंभ, पुष्पे, पाने, वानर, पक्षी इत्यादींचे शिल्पांकन करतात. त्यामुळे छायाप्रकाशाचे विलोभनीय पोत साकार होऊन शिखर सुंदर दिसते. या रचनेमुळे सूऱ्याच्या उष्णतेचे दाहक परिणामही सौम्य होतात व शिखर टिकाऊ होते. उभ्या-आडव्या पट्ट्यांच्या छेदांनी ठरावीक अंतरावर महिरपी कोनाडे तयार करून त्यांत देवादिकांच्या मूर्ती बसवितात, त्यांतून प्रामुख्याने दशावताराच्या कथा प्रदर्शित केल्या जातात. शिखराची निर्मिती गुप्तकाळी, इ. स. सहाव्या शतकात झाली असावी, असे एक मत आहे. मेरू शिखर शैलीचा विकास प्रामुख्याने आठव्या ते दहाव्या शतकांत ओरिसामधील भुवनेश्वर, जगन्नाथ-पुरी, बुद्धगया तसेच खजुराहो, ग्वाल्हेर येथील मंदिरवास्तूंमध्ये झाल्याचे दिसून येते. ⇨ खजुराहो येथील मंदिरांची शिखरे त्यांच्या माथ्यापेक्षा जास्त उंचावलेल्या कोपऱ्याच्या पट्ट्यांमुळे विसावलेल्या गरुडपक्ष्याच्या पंखांप्रमाणे भासतात. पेशवे काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा संचार वाढला. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पेशवेकालीन मेरू शिखर शैलीतून दृग्गोचर होतो. उदा., महागणपती (वाई), श्रीराम (पुणे) इत्यादी.

दक्षिण भारतातील मंदिरांची शिखरे बहुमजली हवेलीच्या धाटणीची आहेत. गाभाऱ्याच्या बाह्य अंगावर शिखराच्या खांबोळ्यांनुसार (खांबांसाठी भिंतीत ठेवलेल्या जागा) स्तंभाकृतीचे विभाजन केलेले असते. हे बहुमजली शिखर क्रमाक्रमाने एकेका खांबोळीने कमी होत कळसाच्या स्थानी फक्त एक चौरस छत्रीवजा घुमटीत पूर्ण होते. या घुमटीवर अष्टकोनी स्तूपिका असून त्यांवर कळस स्थापन होतो. या शिखरात प्रत्येक मजल्याच्या शिरोभागी झोकदार आडवी पट्टी असते, त्यामुळे स्थिरभाव (रीपोझ) द्विगुणित होतो. खांबोळ्यांच्या मधल्या दर्शनी पृष्ठभागांवर कोनाडे योजून त्यांत देवादिकांची शिल्पे बसविली जातात. हे शिल्पांकन मोकळ्या अंगाचे (तीनचतुर्थांश खुले) असल्याने जास्त परिणामकारक वाटते. तंजावर, मदुराई, रामेश्वरम, श्रीरंगम येथील मंदिरशिखरे ही याची उत्तम उदाहरणे होत.

म्हैसूर, सोमनाथपूर, हळ्ळेबीड इ. ठिकाणची मंदिरशिखरे ‘अष्टभद्रा’ या गाभाऱ्याच्या आलेखातून उगम पावतात. गाभऱ्याची भिंत बाह्यांगी ताऱ्याचा आकार धारण करते आणि ताऱ्याचे त्रिकोणी भाग कलत्या सरळरेषेत कळसास जाऊन मिळतात. या शिखराच्या पृष्ठभागावर याच शिखरशैलीच्या छोट्या प्रतिमा योजून पोत साधला जातो.

घुमटाकार शिखरे काही देवालयांवर आहेत. घुमटाच्या शिरोभागी कळसाचा मुकुट असतो. मशिदी, कबरी यांवर या धाटणीचे कळस थोड्याफार फरकाने आढळतात. जैनांची देवालये प्रादेशिक हिंदू देवालयांच्या धाटणीची असल्यामुळे त्यांच्या शिखररचनेत विशेष असे नावीन्य आढळत नाही. विटांनी बांधलेली शिखरे चुन्याच्या गिलाव्याच्या अस्तराची असतात. गिलाव्यास साजेसे नक्षीकाम व रंगकाम शिखरास आगळीवेगळी शोभा प्राप्त करून देते. शिखररचनेत ध्वजारोहणासाठी खोबण्या असतात. काही विशिष्ट उत्सवप्रसंगी सूर्योदयसमयीचे किरण मूर्तीवर येण्यासाठी शिखरास विशिष्ट आकाराचे झरोके ठेवलेले असतात. आधुनिक मंदिरवास्तूंमध्ये कवची सलोह काँक्रीटच्या रचनेत त्रिकोणी तसेच अंतरबाह्य वक्रांकित आकारांची शिखरे उभारतात. त्यांवर शिल्पयोजना नसते. फक्त आकारसंवेदनेला प्राधान्य दिले जाते. तथापि दर्शनी भागावर गाभाऱ्याचा ठसा साकार करणे, हे त्यांचे परंपरागत वैशिष्ट्य टिकून आहे.

गटणे, कृ. ब.