सासबहु मंदिर : ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील अकराव्या शतकातील दोन समरूप मंदिरांची जोडी. दोन एकसारख्या दिसणाऱ्या पण मोठ्या व लहान वास्तू एकमेकांशेजारी असल्यास त्यांना ‘सासबहु’ (सासू-सून) असे म्हटले जाते. ग्वाल्हेरच्या किल्ल्यातही मोठे व छोटे अशी दोन एकसारखी दिसणारी मंदिरे सासबहू या नावाने ओळखली जातात. नागदा (मध्य प्रदेश) येथेही अशीच दोन मंदिरे सासबहू या नावाने प्रसिद्घ आहेत. सांचीला दोन एकसारखे पण लहानमोठे स्तूप आहेत, त्यांनाही सासबहू असे म्हटले जाते.

सासबहु मंदिरे, ग्वाल्हेर, अकरावे शतक.ग्वाल्हेर येथील किल्ल्यातील सासबहू मंदिरे ही मानसिंहाच्या प्रासादाच्या दक्षिणेस आहेत. शिल्पकला व वास्तुकला या दृष्टीने ही दोन्ही मंदिरे लक्षणीय आहेत. मोठे सासबहू मंदिर हे मध्यभागी असलेल्या विस्तीर्ण चौरस दालनाने युक्त आहे. दालनाच्या तीन बाजूंना द्वारमंडप आहेत. चौथ्या बाजूला गर्भगृह होते, ते आता रिकामेच आहे. त्याच्या मध्यभागी एक चौरस व्यासपीठ असून त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर मध्यवर्ती छताला आधार देणारे भरभक्कम दगडी स्तंभ आहेत. छत अत्यंत समृद्घ कोरीव काम असलेल्या घुमटरचनेने युक्त आहे. प्रवेशद्वारही विपुल व भरगच्च शिल्पालंकरणाने सजवलेले असून, कोरीव कामाविना मोकळी सोडलेली यत्किंचित जागा दिसत नाही. हे विष्णूचे मंदिर असून त्याच्या प्रवेशद्वारावर ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरावर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा व सुंदर नक्षी कोरलेली आहे. येथील नर्तकींचा समूह व विष्णुमूर्ती हे उत्कृष्ट शिल्पाकृतींचे नमुने आहेत. या मंदिरातील एका शिलालेखावरून हे मंदिर कछवाहा वंशातील राजा महीपाल याने १०९३ मध्ये बांधले. ही मंदिरे हिंदू आहेत, हे या शिलालेखावरून तसेच शिल्पांवरून स्पष्ट होते. हे स्थापत्य राजपूत शैलीचे आहे. हे मंदिर खजुराहो येथील मंदिरसमूहाच्या शैलीशी साधर्म्य दर्शवते. कृष्ण पॅगोडाप्रमाणेच त्याला फक्त मंडप आहे, गर्भगृह नामशेष झाले असावे. ओडिशातील मंदिरांपेक्षा जास्त गुंतागुंतीची रचना येथे दिसते. मंदिररचनेतून आडवा, क्षितिज समांतर भाव विशेषत्वाने प्रतीत होतो. उंच उभ्या शिखराच्या विरोधाभासात हे जास्त प्रकर्षाने जाणवते. पिरॅमिडसदृश ठेंगणी शिखररचना हे येथील वैशिष्ट्यच म्हणता येईल. खजुराहो येथील मंडपीयुक्त सज्जाचे विकसित रूप येथे दिसते.

छोटे सासबहू मंदिर हे आकारमानाने व क्षेत्रफळाने लहान आहे. हे मंदिर म्हणजे मध्ययुगीन भारतातील अलंकरणसमृद्ध मंदिर-वास्तुशैलीचा उत्तम नमुना मानता येईल. मूळ वास्तूचा काही भागच आता अवशिष्टरूपात उरला आहे. गर्भगृह तर पूर्णतः नामशेष झाले आहे.

नागदा येथील सासबहू मंदिर हे अकराव्या शतकातील असून ते सुंदर शिल्पालंकरणासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

इनामदार, श्री. दे.