औद्योगिक वास्तुकला : उत्पादनादी औद्योगिक घटकांस अनुसरून वास्तुयोजन करण्याच्या हेतूने आधुनिक काळात प्रगत झालेली वास्तुकलेची एक शाखा. उद्योगधंद्यांना सोईस्कर ठरणाऱ्‍या गिरण्या, कारखाने, संशोधनशाळा, प्रयोगशाळा, कचेऱ्‍या यांसारख्या वास्तूंची उभारणी करण्यास औद्योगिक क्रांतीनंतर विशेष चालना मिळाली. यंत्रांचे आकार, त्यांची कारखान्यातील प्रत्यक्ष मांडणी, यंत्रास लागणाऱ्‍या शक्तीची पुरवठा करण्याची योजना, कामगारांचे कारखान्यातील कार्य व सुरक्षितता इ. गोष्टी विचारात घेऊन तसेच उत्पादनास पोषक अशा वातावरणावर – उजेड, रंगसंगती, शांतता इ. – भर देऊन औद्योगिक वास्तू निर्माण केली जाते. कच्च्या मालाची कोठारे, यंत्रविभाग, पक्क्या मालाचे उत्पादन व सुरक्षितता, कार्यालये, कामगारांच्या सोयी, मालवाहतुकीची केंद्रे इ. औद्योगिक वास्तूचे महत्त्वाचे घटक होत.

औद्योगिक वास्तुकलेच्या उत्क्रांतीची रूपरेषा : पूर्वी सर्वसामान्य घरातच कारखाने किंवा रसायनशाळा असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या वास्तूंची आवश्यकता नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीमुळे विपुल प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे कारखाने निर्माण झाले. अठराव्या शतकात पाणचक्क्या, लहान कारखाने इत्यादींची उभारणी फारशी वैशिष्ट्यपूर्ण नव्हती. एकोणिसाव्या शतकात गॉथिक, ग्रीक, रोमन इ. शैलींतील वास्तू निर्माण झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व या शतकाच्या सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी विशिष्ट प्रकारची वास्तूनिर्मिती आवश्यक ठरली व म्हणून साध्या, अकृत्रिम व वास्तुकलेच्या कोणत्याही रूढ शैलीत न बसणाऱ्‍या, परंतु उद्योगधंद्यास सुयोग्य, अशा वास्तू बांधण्यात आल्या. धान्याची कोठारे. मालाची गुदामे, गोद्या, धक्के, पूल, मोठी स्थानके इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होता. पहिल्या महायुद्धापूर्वी अभिव्यक्तिवादी वास्तुकलेचा उदय झाला. पीटर बेरेन्स (१८६८ — १९४०) ह्याचा एईजी (जर्मन जनरल इलेक्ट्रिकल कंपनी) टर्बाइन इलेक्ट्रिक कारखाना, बर्लिन (१९०९) तसेच त्याचे फ्रँकफुर्ट येथील गॅस-केंद्र (१९१२), हॅन्स पल्टसिख (१८६९ — १९३६) याचा लूबान्य (पोलंड) येथील रसायनांचा कारखाना (१९११) व मॅक्स बर्ग याची प्रदर्शनातील पाण्याची टाकी, ब्रेस्लौ (१९१२) या सर्व वास्तू प्रारंभीच्या औद्योगिक वास्तुकलेचे उत्तम नमुने होत. या व्यक्तींच्या प्रभावामुळे अनेक तरुण जर्मन वास्तुशिल्पज्ञांवर या अंलकरणविरहित वास्तुकलेचा खोल परिणाम झाला. याच वेळी ब्रूनो टॉट (१८८० – १९३८) याचे प्रयत्‍न वास्तुशिल्पाच्या वैचारिक अंगापेक्षा त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्‍या नव्या सामग्रीचा शोध घेण्याकडे होते. त्याने सिमेंट, काँक्रीट, काच, लोखंड, पोलाद आणि जोडलेले किंवा तयार केलेले सिमेंटचे व पोलादाचे सांगाडे यांचा वापर प्रचारात आणला. लाइपसिक येथील औद्योगिक प्रदर्शनातील (१९१३) जर्मनीचे दालन बांधताना लोखंड, काच यांचा केलेला वापर हा आकार, मांडणी, अंतर्गत दृश्ये इ. कसोट्यांना पूर्ण उतरला. या प्रयोगामुळेच पोलाद-सिमेंटसारख्या नव्या साहित्याचे सामर्थ्य वास्तुशिल्पज्ञांना समजले. यानंतर हलकी, खुली,  विशाल, कमीत कमी आधारांवर विसावलेली योजनाबद्ध औद्योगिक वास्तू यूरोपात निर्माण होऊ लागली.

या शतकात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे औद्योगिक समूह यूरोपात निर्माण झाले. तसेच औद्योगिकीकरणाच्या सामाजिक प्रश्नांमुळे औद्योगिक नगरे व वसाहती स्थापून औद्योगिक व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. १८५१ साली सर टायटस सॉल्ट याने सॉल्टेअर (इंग्‍लंड) हे नगर कामगारांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजित केले. त्यानंतर कॅडबेरी या गृहस्थाने १८९५ साली बोर्नव्हिल (इंग्‍लंड) व १८८७ साली लीव्हर याने पोर्ट सनलाइट (इंग्‍लंड) अशी नगरे वसविली. या सर्व नगरांत औद्योगिक वास्तू व शहरांतील इतर वास्तू यांची योग्य सांगड घातली असल्यामुळे या रचनाप्रकारास महत्त्व प्राप्त झाले. न्यू लॅनर्क (स्कॉटलंड) येथे १८१६ साली ⇨ रॉबर्ट ओएन (१७७१ — १८५८) यानेही कामगारांसाठी अशा प्रकारची नगररचना केली होती. कमी काम, जास्त पगार व उत्तम घरे हे त्याचे ब्रीदवाक्य होते.

औद्योगिक वास्तुकलेवर परिणाम करणाऱ्‍या गोष्टी : औद्योगिक वास्तुकलेवर औद्योगिक समाजातील सर्व घटकांच्या सुरक्षिततेच्या व संवर्धनाच्या विचारांचा जसा परिणाम झाला, त्याहून अधिक परिणाम उत्पादनास आवश्यक अशा वास्तुविषयक गरजांचा झाला. पूर्वी बाष्पशक्तीचा वापर करीत अलीकडे त्यात विद्युत्‌शक्ती, अणुऊर्जा, नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) इत्यादींची भर पडत आहे. त्यांसाठी विवक्षित आकाराचे, विवक्षित ठिकाणी योजलेले पोलादी हंडे, नळ्या, पिंपे इ. आवश्यक असतात व म्हणून विशिष्ट प्रकारचे वास्तुयोजन करावे लागते. तसेच इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण होणारा धूर व दूषित हवा बाहेर सोडण्यासाठी खास धुराडी व इतर साधने व सोयी आवश्यक असतात. याव्यतिरिक्त कारखान्यात निर्माण होणारा कचरा, घाण, टाकाऊ माल यांची वासलात लावण्यासाठी योग्य ती सोय आवश्यक असते. रंगाच्या कारखान्याला किंवा कापडाच्या गिरणीला फार मोठ्या प्रमाणावर पाणी लागते व विवक्षित आर्द्रता व तपमानाची आवश्यकता असते. हे सर्व प्राप्त करण्यासाठी पाण्याच्या टाक्या, पंपघरे, मोठे पंखे, पाणी थंड करण्याची कारंजी अशा अनेक साधनांची मांडणी आवश्यक असते. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मोठे औद्योगिक समूह असणे योग्य नाही. म्हणून अशा समूहांना ‘मायावरण’ (संरक्षणदृष्ट्या वास्तू आहे त्यापेक्षा वेगळी भासविण्यासाठी करावयाची योजना) देणे किंवा त्यांची मांडणी अलग अलग विखरून करणे, हे उपाय अवलंबिले जातात. तसेच प्रदर्शनकक्ष किंवा दर्शकपाट यांसारख्या खास योजना करून उत्पादित वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन करण्यासाठी औद्योगिक वास्तूत सोय केली जाते. प्रदर्शनाचे असे खास दालन हा औद्योगिक वास्तुकलेचा एक कलात्मक विशेष होय.

औद्योगिक वास्तुयोजन : औद्योगिक वास्तूंचे आयोजन हे एक प्रगत शास्त्र झाले आहे. ज्या वस्तूंचे उत्पादन करावयाचे असेल, त्याप्रमाणे वास्तुशिल्पज्ञ कच्चा माल, कामगार, यंत्रयोजना, मालाचे संयोजन, तयार मालाची बांधणी या सर्व क्रियांना लागणारी जागा व त्यासाठी होणाऱ्‍या विविध हालचालींचा आलेख (फ्लो डायग्रॅम) काढून त्याप्रमाणे वास्तूचे नियोजन करतो. प्रसन्न वातावरणाचा उत्पादनावर इष्ट तो परिणाम होतो त्यामुळे रंगसंगती, प्रकाशाची व्यवस्था, उत्तरेकडील प्रकाश देणारी छतयोजना इ. घटकांकडे औद्योगिक वास्तुकलेत लक्ष दिले जाते. सिमेंट, काँक्रीट, पोलाद ,काच, रबर, प्लॅस्टिक यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारखान्यात उत्पाद्य वस्तूंची हालचाल जर खालून वर अथवा वरून खाली व्हावयाची असेल (उदा., कापडाच्या गिरणीत कापसाचा गठ्ठा वरच्या मजल्यावरून खाली आणणे अथवा धान्य दळण्याच्या कारखान्यातील धान्याची ने-आण), तर अनेक मजल्यांचे वास्तुयोजन करतात. उत्पाद्य वस्तूंची हालचाल मागून पुढे अथवा पुढून मागे असेल (उदा., मोटार तयार करण्याच्या कारखान्यातील निरनिराळ्या अवयवांची साखळीजुळणी अथवा ओतशालेची रचना), तर त्या कारखान्यासाठी क्षितिजसमांतर वास्तुयोजन करतात.

आडोल्फ मायर, ⇨ वॉल्टर ग्रोपिअस, ॲल्बर्ट कान, ⇨ फ्रँक लॉइड राइट  या वास्तुशिल्पज्ञांनी अनेक आधुनिक वास्तू नियोजित केल्या. अमेरिकेत विस्कॉन्सिन येथील जॉन्सन वॅक्स, मिशिगन येथील जनरल मोटर्स, पिट्सबर्ग येथील हेंझ कारखाना, जर्मनीतील क्रप कारखाना, प्येर लूईजी नेर्वी यांनी योजलेले बोलोन्या येथील तंबाखूचे गुदाम तसेच दक्षिण अमेरिकेत फेलीक्स कँडेला याची प्रासाना सूतगिरणी अशा अनेक वास्तू आधुनिक औद्योगिक वास्तुकलेचे उत्तम नमुने आहेत.

अलीकडे जागतिक औद्योगिक प्रदर्शने भरविली जातात. अशा प्रदर्शनांतून प्रत्येक देशाची दालने मोठ्या कलात्मक रीतीने तयार केली जातात. औद्योगिक वास्तुकलेतील नव्या प्रयोगांचे दर्शनही त्यांतून घडते.

संदर्भ: 1. Dunham, C. W. Planning Industrial Structures, New York, 1948.

     2. Michaels, Leonard, Contemporary Structure in Architecture, New York, 1950.

     3. Munce, J. F. Industrial Architecture, London, 1961.

     4. Whittick, Arnold, Modern Architecture in the 20th Century, London, 1950.

कान्हेरे, गो. कृ.